खारघरमधील पाणीप्रश्न गंभीर; ठोस उपाययोजना होत नसल्याने संताप

पनवेल : सिडकोने वसाहती उभारल्या, मात्र पाणी कुठे आहे? असा प्रश्न येथील रहिवासी विचारत असून सिडको प्रशासन यावर ठोस उपाय करीत नसल्याने रहिवासी पर्याय शोधत आहेत. मात्र तेही निष्फळ ठरत आहेत. खारमधील काही गृहसंकुलाने टँकरचे पाणी दूषित असल्याने विंधन विहीरीचा पर्याय स्वीकारला. मात्र त्याचे पाणीही दूषित असल्याने ते पिण्यासाठी वापरता येत नाही.

त्यामुळे पाण्याअभावी रहिवासी त्रस्त आहेत. खारघर येथील सेक्टर ३४ या परिसरात पाणी समस्या भीषण झाली आहे. येथील नागरिकांनी विविध आंदोलने करून सिडकोचे या समस्येकडे लक्ष वेधले. मात्र पाणी समस्या सुटलेली नाही. खारघरमध्ये भोगवटा प्रमाणपत्र दिलेल्या सदनिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना सिडकोने या परिसरात लाखो घरांच्या निर्मितीचे काम हाती घेत असल्याने रहिवाशांकडून अगोदर भोगवटा प्रमाणपत्र दिलेल्यांना तरी पाणी द्या अशी मागणी होत आहे. ७ ते ११मजल्यांच्या इमारतींना पुरेशे पाणी मिळत नाही तर २० मजल्यांपर्यंतच्या इमारतींना पाणीपुरवठा कसा होणार असा प्रश्न येथील रहिवाशांचा आहे.

सिडको काहीही करीत नसल्याने पाणी समस्या सुटावी म्हणून रहिवासी टँकरने पाणी मागवत आहेत. एका सुकलात महिन्याला किमान दहा टॅंकर पाणी खरेदी करावे लागत आहे. एका टँकर पाण्यासाठी अडीच ते तीन हजार रुपये मोजावे लागतात. मात्र ते पाणीही दूषीत आहे. त्यामुळे अखेर वैतागून येथील नागरिकांनी विंधन विहिरींचा पर्याय निवडला. सेक्टर ३४ या परिसरात १५ विविध विंधन विहिरींचा पर्याय गृहनिर्माण संस्थांनी निवडला आहे. यामधील एका गृहनिर्माण संस्थेने नुकतीच विंधन विहीर घेतली आहे, मात्र त्यांची पाणी समस्या कायम आहे. सुमारे एक लाख रुपये खर्च करून विंधन विहीर घेण्यात आली आहे. मात्र पाणी दूषित असल्याने ते फक्त स्वच्छतागृह व शौचालयासाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे किमान पिण्याचे पाणी तरी उच्च दाबाने पुरवो अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. विशेष म्हणजे विंधन विहिरीतून मिळणारे दूषित पाणी सर्वच सदनिकांच्या स्वच्छतागृह आणि शौचालयांपर्यंत नेण्यासाठी २५ हजार रुपये खर्च करून संबंधित गृहनिर्माण सोसायटीला वेगळी जलवाहिनी नव्याने टाकावी लागली. यानंतरही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही.

वसाहती बांधा पण, रहिवाशांना पाणी तरी द्या!

आमच्या सोसायटीत १७ सदनिका असून १३ युनिट पाणी मिळणे गरजेचे आहे. आम्हाला ३ ते ४ युनिट पाणीपुरवठा होतो. हे पाणी पुरत नसल्याने महिन्याला १० टँकर पाणी बाहेरुन खरेदी करावे लागते. नाइलाजास्तव विंधन विहीर गेल्या महिन्यात सदस्यांनी एक लाख रुपये खर्च करून मारली. त्यामधून येणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याने ते शौचालयासाठी आम्ही वापरतो. पाणी ही खारघरची मुख्य समस्या बनली आहे. सिडकोच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी नवीन गृहनिर्माण करण्यापूर्वी असणाऱ्या रहिवाशांना पाणी पुरेसे देणे गरजेचे असल्याचे खारघर सेक्टर ३४ अ  येथील   निवान सोसायटीचे अध्यक्ष  सचिन जाधव यांनी सांगितले.