फळे, फुले, पूजेच्या साहित्यावर पाणी!

करोनामुळे लहान व्यावसायिक डबघाईला आलेले असताना मंगळवारी सायंकाळनंतर झालेल्या जोरदार पावसाने त्यांचे प्रचंड नुकसान केले.

पावसामुळे नवी मुंबई शहरातील जनजीवन विस्कळीत; छोटय़ा व्यावसायिकांचे मोठे नुकसान

नवी मुंबई : करोनामुळे लहान व्यावसायिक डबघाईला आलेले असताना मंगळवारी सायंकाळनंतर झालेल्या जोरदार पावसाने त्यांचे प्रचंड नुकसान केले. गणेशोत्सव व हरतालिका असल्याने बाजारात फळे, फुले, पुजेचे साहित्य व्यावसायिकांनी विक्रीसाठी ठेवले होते, मात्र पावसामुळे ते पाण्यात भिजून गेले. त्यात ग्राहकही फिरकला नसल्याने नफा तर सोडाच भांडवल निघाले नाही. गणपती आगमन आणि हरतालिका या सलग दोन दिवसांच्या सणात कोटय़वधींची उलाढाल दरवर्षी होत असते. हरतालिका पूजेला

लागणाऱ्या वनस्पती आणि फुले याचा व्यवसाय करणारे या काळात दिवसभरात किमान ४० ते ५० हजार निव्वळ नफा कमावतात. त्यामुळे शिथिल झालेले निर्बंध पाहता त्यांनी मोठय़ा उत्साहाने आपली दुकाने थाटली होती. भांडवलापोटी पैसा कसातरी उभारला होता. यातून काही पैसै पदारात पडतील अशी आशा त्यांना होती, मात्र पावसाने त्यावर पाणी फेरले.

हरतालिकेत किमान २१ प्रकारच्या वनस्पतींची व फळांची पूजा मांडण्याची परंपरा आहे. वास्तविक निसर्ग पूजा हा त्यामागील हेतू आहे. नवी मुंबईत या सर्व वनस्पती मिळत नसल्याने बाहेर गावांतून खासकरून नाशिक, पुणे जिल्ह्यांतून मोठय़ा प्रमाणात आवक होती. या वनस्पतींचा एकत्रित मिळणारा वाटा अंदाजे २० ते ५० रुपयांचा असतो. मात्र या वर्षी दर वाढत असून ४० ते ८० रुपयांपर्यंत वाशी बाजारात हा वाटा ठेवण्यात आला होता.

मात्र मंगळवारी सायंकाळनंतर ऐन व्यवसाय होण्याच्या वेळेत

पाऊस सुरू झाला. तो इतका प्रचंड होता की या फेरीवाल्यांचे यात मोठे नुकसान झाले. त्यात ग्राहकही न आल्याने माल पडून होता. त्यामुळे ४० ते ८० रुपयांपर्यंत विकला जाणारा वाटा पावसात भिजल्याने मागेल त्या किमतीत तो विकावा लागला. तर उर्वरित माल फेकून द्यावा लागल्याची व्यथा व्यावसायिकांनी व्यक्त केली.

होत्याचे नव्हत झाले. चार पैसे जास्त मिळतील म्हणून थेट गावातून माल आणला. सगळे नुकसान झाले. मल्टी नॅशनल कंपन्यांचे नुकसान झाल्यावर सरकार त्यांचे कोटय़वधी रुपयांचे कर्ज माफ करत आम्ही पण माणसेच आहोत. आमच्याकडेही पाहा !

-इंदुबाई पाटील,  व्यापारी, घणसोली

काल पहाटे चढय़ा भावात आणलेला सर्व माल रात्री व आजच्या पावसात भिजला. त्यात जो माल भिजला नाही त्या फुलांच्या पाकळ्या गळून पडत असल्याने कोणी हातही लावायला तयार नाही.

सदानंद नार्वेकर, व्यापारी, वाशी सेक्टर ९ मार्केट

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Water on fruits flowers worship materials ssh

ताज्या बातम्या