पाणीपुरवठा सुरू; तुटवडा कायम

नवी मुंबईचे स्वत:चे मोरबे धरण असून या धरणातून दररोज अंदाजे ४२४ दशलक्ष लीटर पाणी उचलले जाते. 

नागरिकांकडून संताप; कोपरखैरणे, घणसोली, दिघा, ऐरोलीत पाणीटंचाई

नवी मुंबई :  एमआयडीसीकडून होत असलेला पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने कोपरखैरणे, घणसोली, दिघा, ऐरोली एमआयडीसीत गेली पाच ते सहा दिवस पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे काही भागाला महापालिकेला टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. सोमवारपासून या भागात पाणपुरवठा  होत आहे, मात्र तुटवडा कायम असल्याने संताप व्यक्त होत आहे. महापालिका मोरबेतून २४ तास पाणी काही भागांना देत असताना आमच्याबाबत हा दुजाभाव का, असाही प्रश्न विचारला जात आहे.

नवी मुंबईचे स्वत:चे मोरबे धरण असून या धरणातून दररोज अंदाजे ४२४ दशलक्ष लीटर पाणी उचलले जाते.  मात्र शहरातील काही भागांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होत असून त्यांनी ८० दशलक्ष लीटर पाणी देणे अपेक्षित आहे. मात्र गेले काही दिवस ८० ऐवजी ६० ते ७० एमएलडी पाणीपुरवठा होत असल्याने कोपरखैरणे, घणसोली, दिघा, ऐरोली या भागांतील गावठाण व एमआयडीसी परिसरात पाणी कमी पडत आहे. गेल्या आठवड्यात दुरुस्ती व जलवाहिनी वारंवार फुटल्याने या परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे महापालिकेला शुक्रवारी व शनिवारी या दोन दिवस तुर्भे, दिघा परिसरात टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. गेले पाच दिवस हा प्रश्न या भागात होता.  सध्या पाणीपुरवठा होत असला तरी पुरेशा दाबाने पाणी येत नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. महापालिका प्रशासनाच्या नियोजनाबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. मोरबे नवी मुंबई शहराचे धरण असताना आम्हाला पाणी का मिळत नाही? असाही प्रश्न विचारला जात आहे.

या भागात पाणीटंचाई

मूळ गावठाणे, ऐरोली, राबाडा, दिघा, गवतेवाडी, यादवनगर, तुर्भे स्टोअर, चिंचपाडा, महापे, शिवाजीनगर आणि एमआयडीसीतील अनेक भागांत पाणीपुरवठा विस्कळीत आहे.

नवी मुंबई शहरात एमआयडीसीच्या विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे पाण्याची काही भागांत टंचाई जाणवत आहे. एमआयडीसीकडून दररोज ८० दशलक्ष लीटर पाणी मिळणे आवश्यक आहे; पण ते न मिळाल्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्या शहराचे पाणी दुसरीकडे दिले जात नाही. -अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका

नवी मुंबईत अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत आहे. नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत. एमआयडीसीकडून आवश्यक ते पाणी मिळालेच पाहिजे. आपल्या शहराला मिळणारे पाणी दुसऱ्या पालिकेकडे दिले जात आहे. मूलभूत सुविधा प्रशासक म्हणून देणे आवश्यक असून पालिकेचा पाणीपुरवठ्याबाबतचा कारभार नियोजनशून्य आहे. -संदीप नाईक, माजी आमदार, ऐरोली

कोपरखैरणे सेक्टर ८ परिसरात मागील सहा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. पाण्याबाबत पालिकेने योग्य पुरवठ्याबाबत काळजी घेण्याची आवश्यकता आहे. – दीपक सुर्वे, रहिवासी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Water problem water shortage in navimumbai akp

ताज्या बातम्या