scorecardresearch

उरणमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढणार?; दोन दिवसांच्या कपातीनंतरही सिडकोच्या पुरवठय़ात घट

रानसई धरणातील पाणी साठय़ाचे नियोजन केल्याने उरणमध्ये सध्या दोन दिवसांची पाणीकपात सुरू आहे. मात्र उन्हाच्या झळा वाढल्या असल्याने पाण्याची मागणी वाढत आहे.

उरण : रानसई धरणातील पाणी साठय़ाचे नियोजन केल्याने उरणमध्ये सध्या दोन दिवसांची पाणीकपात सुरू आहे. मात्र उन्हाच्या झळा वाढल्या असल्याने पाण्याची मागणी वाढत आहे. त्यात सिडकोकडून होत असलेल्या पाणीपुरवठय़ातही घट झाली आहे. त्यामुळे आणखी पाणीकपतीचे संकट उरणकरांवर आहे.
राज्यातील औद्योगिक तालुका म्हणून उरणची ओळख असून सध्या सिडकोच्या माध्यमातून नागरीकरणातही वाढ झाली आहे. त्यात रानसई धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने सिडकोच्या हेटवणे धरणातून देण्यात येणाऱ्या पाणीपुरवठय़ातही घट करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काळात पाणी समस्या गंभीर होणार आहे.
उरण तालुक्यात रानसई व पुनाडे ही दोन धरणे असली तरी यातील रानसई धरणाच्या पाणी साठय़ात धरणातील गाळामुळे घट झाली आहे. दहा दशलक्ष घन मीटर क्षमतेच्या धरणात सध्या अवघे ७ दशलक्ष घनमीटर पाणी क्षमता आहे. त्यात पाण्याची मागणी मात्र वाढू लागली आहे. तर पुनाडे धरणातून धरणाच्या परिसरातील आठ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच तालुक्यातील काही गावांना पेण येथील सिडकोच्या हेटवणे धरणाच्या जलवाहिनीवरून पाणीपुरवठा केला जात आहे. रानसई धरणाचा पाणीसाठा वाढावा याकरिता कोणतीच उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे उरणमधील पाणी समस्या गंभीर होऊ लागली आहे.
रानसईमधील पाणीसाठा कमी झाल्याने एमआयडीसी सिडकोकडून हेटवणे धरणातून दररोज १० दशलक्ष लिटर पाणी उसणे देण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून करीत आहे. मात्र त्यातील केवळ ६ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला
जात आहे. तर सध्या या पुरवठय़ातही घट करण्यात आली असून तो ३ ते ३.५ दशलक्ष लिटरवर आला असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे अभियंता रवींद्र चौधरी यांनी दिली. असे असले तरी एमआयडीसीकडून सुरळीत पाणीपुरवठा केला जात असून दोन दिवसांच्या पाणीकपातीत सुधारणा करून ग्रामपंचायतींना मंगळवारचेही पाणी सुरू केले असल्याची माहिती त्यांनी दिली.
एमआयडीसीकडून सुरळीत पाणीपुरवठा केला जात असून दोन दिवसांच्या पाणीकपातीत सुधारणा करून ग्रामपंचायतींना मंगळवारचेही पाणी सुरू केले आहे.-रवींद्र चौधरी, अभियंता ,एमआयडीसी

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Water scarcity intensify uran cidco supply declines two day cut ransai dam amy

ताज्या बातम्या