ऐन दिवाळीत टंचाई टाळण्यासाठी महापालिकेचे एमआयडीसीला पत्र

नवी मुंबई : मागील अनेक दिवसापासून एमआयडीसीकडून होत असलेला पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. ८० दशलक्ष लिटर पाण्याऐवजी  फक्त ६० ते ६२ दशलक्ष लिटर पाणी दिले जात असल्याने शहरातील काही भागात पाणी समस्या कायम आहे. ऐन सणासुदीत पाणी तुटवडा भासणार असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने एमआयडीसीला पत्र देत नियमानुसार ८० दशलक्ष लिटर पाणी पुरवावे आशी मागणी केली आहे.

नवी मुंबईत मोरबे धरणातून होत असलेल्या भागात २४ तास पाणी मिळत आहे. मात्र शहरातील रबाळे, ऐरोली, ऐरोली नाका, गोठवली, तळवली व एमआयडीसी भागातील तुर्भे शिवाजीनगर परिसरापर्यंत एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. या भागासाठी दिवसाला ८० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करणे नियामानुसार अपेक्षित आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कमी पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे या परिसरात पाणी कमी पडत आहे.

मध्यंतरी हा पाणी पुरवठा होणारी जलवाहिनी फुटल्याने व दुरुस्ती कामामुळे या भागात टकरने पाणी पुरवावे लागले होते. त्यानंतर हा पुरवठा सुरळीत झाला असे एमआयडीसीचे म्हणणे आहे. मात्र आताही ८० ऐवजी ६० दशलक्ष लिटर इतकाच पाणीपुरवठा करण्यात येत आहेत. त्यामुळे काही भागात पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. पुढील सणाच्या दिवसांतही ही समस्या काय राहणार असल्याने या भागातील लोकप्रतिनिधींनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने एमआयडीसीला पत्र देत ८० दशलक्ष लिटर पाणी पुरवावे अशी मागणी केली आहे.

शहरात पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम पालिकेकडून करण्यात येत आहे. परंतु एमआयडीसीकडून  ६० ते ६२दशलक्ष लिटर पाणी मिळत आहे.त्यामुळे सणासुदीला पाणीटंचाई होऊ नये यासाठी एमआयडीसीला पत्रव्यवहार करुन नियमानुसार पाणीपुरवठा करण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. सणासुदीत पाणीटंचाई होणार नाही याबाबत खबरदारी घेतली जात आहे. -संजय देसाई, शहर अभियंता