नवी मुंबई : नवी मुंबई पालिका क्षेत्रातील पूर्व भागात एमआयडीसीच्या बारवी धरणातून होत असलेला पाणीपुरवठा कमी होऊ लागल्याने दिघ्यापासून शिरवणेपर्यंत असलेल्या झोपडपट्टी भागात ऐन उन्हाळय़ात पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. रहिवाशांनी पिंपातून पाणी साठवण करण्यास प्राधान्य दिले आहे.
बारवी धरणातून या औद्योगिक वसाहतीला तसेच रहिवाशांना ४५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होणे आवश्यक असताना तो आता ३० दशलक्ष होत आहे. नवी मुंबई पालिका या पाणीटंचाईवर उपाययोजना करीत आहे.
नवी मुंबई पालिकेच्या पूर्व भागातील औद्योगिक वसाहतीत ४१ झोपडय़ांमधून दोन लाखांपेक्षा जास्त लोकवस्ती राहात आहे. एमआयडीसी भागात उद्योगधंद्यांना देण्यात आलेल्या पाणीपुरवठय़ातून येथील लोकवस्तीलादेखील गेली अनेक वर्षे पाणीपुरवठा केला जात आहे. सार्वजनिक स्वरूपात होणारा हा पाणीपुरवठा पुरेसा आहे, मात्र मागील काही दिवसांपासून बारवी धरणातून मीरा भाईंदर आणि इतर शहरांना जास्त पाणीपुरवठा केला जात असल्याने नवी मुंबईतील या औद्योगिक क्षेत्राला तसेच येथील लोकवस्तीला कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून पाण्याची साठवण करून ठेवली जात आहे. पालिकने पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
‘एमआयडीसी’चा पाणी देण्यास नकार
‘एमआयडीसी’च्या पाण्यावर अवलंबून असलेल्या भागाला कमी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सोमवारी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता यांच्याबरोबर एक बैठक झाली. यात पालिकेचे उपअभियंता नीलेश मोरे व वसंत पडघन यांनी त्यांच्याकडे शहरात सध्या ‘एमआयडीसी’कडून ३० ते ३१ दशलक्ष लिटरच पाणी येत आहेत. आम्हाला आणखी किमान तीन दशलक्ष लिटर पाणी देण्याची मागणी केली. मात्र एमआयडीसीकडून नवी मुंबई महापालिकेचे स्वत:चे धरण असल्याचे कारण देण्यात आले. या वेळी पालिकेच्या वतीने आम्ही खारघरला ५ दशलक्ष लिटर पाणी देत असल्याने आम्हाला ३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असल्याचे या वेळी सांगण्यात आले आहे.