उरण तालुक्यातील घारापुरी (एलिफंटा) बेटावर असलेल्या काळ्या पाषाणातील कोरीव शिवलेणी आणि शिवलिंग दर्शन घेण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भाविक येतात. या प्रवाशांच्या प्रवासासाठी उरणमधील मोरा बंदर ते घारापुरीदरम्यान महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून खाजगी बोटींची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या प्रवासासाठी ४२ रुपये दर आकारला जाणार असून मोरा बंदरातून जवळपास ७० हजारांच्या आसपास भाविक दर्शनासाठी जाणार असल्याची माहिती मोरा बंदर विभागाकडून देण्यात आली आहे. त्यासाठी कडक बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे.
महाशिवरात्रीला घारापुरी बेटावर उरण -मोरा, अलिबाग, मांडवा-रेवस, मुंबई, न्हावा,बेलापूर या ठिकाणांवरून जलमार्गाने लाखो भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा याकरिता मोरा बंदर विभागाने प्रवासी वाहतुकीसाठी बोटींची निविदा जाहीर केली आहे. यामध्ये एका फेरीसाठी ३८ रुपये तिकीट तर ४ रुपये अधिक कर असे ४२ रुपये तिकीट आकारण्यात येणार असल्याची माहिती मोरा बंदर विभागाचे अधिकारी ए.एन.सोनावणे यांनी दिली. तसेच या प्रवासाकरिता १४ ते १५ सहा सिलेंडरच्या बोटींचा वापर केला जाणार आहे. घारापुरी येथील वाहतूक व्यवस्था, सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांनी पोलीस, बंदर विभाग, मच्छीमार, घारापुरी ग्रामस्थ, बोट चालक यांची बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. तर महाशिरात्रीच्या दिवशी मोरा बंदरातून मोठय़ा प्रमाणात भाविक ये-जा करणार असल्याने पोलीस कुमकही वाढविण्यात येणार असल्याची माहिती मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.एस.पठाण यांनी दिली. मागील वर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी बेलापूर येथून आलेली भाविकांची बोट भरकटल्याने कोस्ट गार्डला प्राचारण करावे लागले होते. त्यामुळे या दिवशी प्रवास सुखकर होण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत.