वादळाचा परिणाम; आणखी दोन दिवस पाणी नाही

पनवेल : गेल्या १० दिवसांपासून पनवेल महापालिका हद्दीतील सिडको वसाहतींना पाणी मिळत नसल्याने येथील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यात वादळामुळे वीजव्यवस्था कोलमडल्याने हा प्रश्न आणखी गंभीर झाला आहे. सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी आणखी दोन दिवस लागतील, अशी माहिती सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.

सिडकोने वसाहतींचा व नवीन गृहप्रकल्पांसाठी २०५० पर्यंतचे पाणी धोरण आखले आहे. मात्र सध्या सिडको वसाहतींना दिवसभरातून पिण्यासाठी अवघे अर्धा तासच पाणी येत आहे. करोनाकाळात पिण्यासाठी व हात धुण्यासाठी पाणी मिळत नसल्याची खंत येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.

सिडकोच्या पाणीपुरवठय़ाचे अधिकारी गजानन दलाल यांना याबाबत विचारणा केली असता, ‘तौक्ते’ वादळामुळे वीजव्यवस्था कोलमडल्यामुळे धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठय़ाला अडथळा झाल्याने अजून दोन दिवस तरी पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी लागतील, असे सांगितले. मात्र या दोन दिवसांमध्ये कोणतीही नवी अडचण निर्माण झाल्यास अजूनही काही दिवस लागू शकतील, असेही त्यांनी सांगितले.

घरात पाणी नाही. टँकरनेही पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. हा पाणीप्रश्न वादळ येण्यापूर्वीपासूनच आहे. वेळोवेळी नागरिकांनी सिडकोकडे तक्रारी केल्या आहेत. प्रसारमाध्यमांनी त्यांच्या व्यथा मांडल्या, मात्र हा प्रश्न कायम आहे. मे महिना संपत आला तरी सिडकोने टँकरने मोफत पाणीपुरवठा सुरू केला नाही. त्यामुळे येथील नागरिकांना खासगी पाण्याचे टँकर मागवावे लागत आहेत.