कचरा वर्गीकरण न केल्यास पाणीपुरवठा बंद?

नवी मुंबई पालिकेचा नवीन प्रस्ताव लवकरच; नियम पाळणाऱ्यांना मालमत्ता करात सवलत

कचरा वर्गीकरण बंधनकारक केल्यानंतरही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत कचरा न उचलण्याचे तसेच दोनशे रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काळात पालिका कचरा वर्गीकरण न केल्यास पाणीपुरवठा खंडित करण्याचा, तर वर्गीकरण करणाऱ्यांना मालमत्ता करात सवलत देण्याचा विचार करीत आहे. तसा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

नवी मुंबई पालिका गेली काही वर्षे स्वच्छ भारत अभियानात चांगले काम करीत आहे. गेल्या वर्षी शहराने या अभियानात देशात तिसरा क्रमांक पटकावला असून या वर्षी प्रथम क्रमांक मिळविण्याचे ध्येय ठेवले आहे. यासाठी शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

‘रस्त्यावर शून्य कचरा’ अशी मोहीम पालिकेने हाती घेतली असून यासाठी सोसायटय़ांना कचरा वर्गीकरण बंधनकारक केले आहे. स्वच्छतेमध्ये प्रामुख्याने कचऱ्याचे निर्मितीच्या ठिकाणीच वर्गीकरण केले जाणे व दररोज ५० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायटय़ांनी त्यांच्या आवारातच त्यावर प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. यासाठी पालिकेने सक्तीही केली आहे. असे असले तरी शहरात याची शंभर टक्के अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे आयुक्तांनी याबाबत ठोस कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पालिकेच्या घनकचरा विभागाने कचरा वर्गीकरण न केल्यास त्या घरमालकास दोनशे रुपये दंड आकारला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. आता पालिका यासाठी आणखी एक नवीन योजना आणण्याच्या विचारात असून यात कचरा वर्गीकरण न केल्यास त्या घरमालकाचा पाणीपुरवठा खंडित करणार असून ५० किलोपेक्षा जास्त कचऱ्यावर प्रक्रिया न केल्यास सोसायटीचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा विचार करीत आहे. तसेच जे सदस्य नियमित कचरा वर्गीकरण करतात त्यांना मालमत्ता करात काही सवलत देता येईल का? याबाबत प्रस्ताव तयार करीत आहे.

नागरिकांनी शहर स्वच्छतेबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे. ज्या सोसायटय़ा कचऱ्याचे वर्गीकरण करत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे तसेच जे नियमांचे पालन करत आहेत त्यांच्यासाठी काही सवलत देण्याबाबत विचार करीत आहोत. लवकरच याबाबत ठोस निर्णय घेतला जाईल असे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

शहरात संकलित होणारा कचरा

– ओला कचरा : ३१० टन
– सुका कचरा : २८७ टन
– एकत्रित कचरा : ९८ टन
– एकूण कचरा : ६९६ टन

कचरा डबे देणार

– सोसायटय़ांना यापूर्वीच पालिकेने कचऱ्याचे निळे व हिरवे डबे दिले आहेत. अनेक सोसायटींचे हे डबे
– खराब झाले आहेत, तर काहींचे तुटले आहेत. त्यांनाही पालिका पुन्हा नवीन कचरा डबे देणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Water supply cut off if waste is not sorted mppg

Next Story
उरणमध्ये एनएमएमटी बस पास वितरण सुविधा देण्याची मागणी
ताज्या बातम्या