पाच दिवसांनंतर जलसेवा पूर्ववत ; गेटवे- एलिफंटा, मोरा- भाऊचा धक्का मार्गावरील प्रवाशांना दिलासा

मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस या मार्गावरील  जलवाहतूक सुरू झाल्याने या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. 

पाच दिवसांनंतर जलसेवा पूर्ववत ; गेटवे- एलिफंटा, मोरा- भाऊचा धक्का मार्गावरील प्रवाशांना दिलासा
(संग्रहित छायाचित्र)

उरण : वादळी वाऱ्यामुळे बंद असलेली जलसेवा सहा दिवसांनंतर तीन नंबरचा बावटा उतरविण्यात आल्याने पूर्ववत सुरू करण्यात आली असून गेटवे-एलिफंटा, गेटवे-जेएनपीए, मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस या मार्गावरील  जलवाहतूक सुरू झाल्याने या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. 

मागील आठवडय़ात वादळी हवामान, खराब हवामानामुळे समुद्रात उठणाऱ्या  लाटा व सुमारे ६५ ते ७० कि.मी. वेगाने वाहणारे वारे, जोरदार पाऊस यामुळे हवामान विभागाने रेडअ‍ॅलर्ट जारी केला होता. त्यामुळे विविध बंदरात खबरदारीची उपाययोजना म्हणून धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला होता. या धोक्याच्या इशाऱ्यानंतर मागील पाच दिवसांपासून गेटवे-एलिफंटा प्रवासी सेवा खंडित झाल्याने या सागरी मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवासी, पर्यटकांची गैरसोय झाली. या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. धोक्याच्या इशाऱ्यानंतर या सागरी मार्गावरील प्रवासी, पर्यटक वाहतूक कोलमडली होती.  वादळी, खराब हवामानामुळे मासेमारीवरही विपरीत परिणाम झाला होता. धोक्याच्या इशाऱ्यानंतर स्थानिक मासळी बाजारात मासळी मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे मागील पाच-सहा दिवसांपासून मासळी खवय्यांचे हाल झाले आहेत.

गेटवे-एलिफंटादरम्यान पर्यटक वाहतूक कोलमडली होती. पर्यटकांअभावी बेटावरील व्यावसायिक व पर्यटक आधारित रहिवाशांवर आर्थिक नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ आली.

प्रवासी सेवा खंडित झाल्याने  गेटवे-जेएनपीए, मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस या सागरी मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवासी, पर्यटकांची गैरसोय झाली आहे.  मात्र तीन नंबरचा बावटा उतरविण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारपासून सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. तसेच मासेमारी बोटीही मासेमारी करण्यासाठी रवाना होऊ लागल्याची माहिती मोरा बंदर विभागाचे अधिकारी प्रकाश कांदळकर यांनी दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Water transport service restored after five days in navi mumbai zws

Next Story
नव्या कंटेनर टर्मिनलच्या नोकरीतून स्थानिकांना डावलले 
फोटो गॅलरी