पनवेल ः पनवेल महापालिकेने मागील वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये पालिका क्षेत्रातील माजी सैनिकांना मालमत्ता करातून सामान्य कर माफी जाहीर केली होती. परंतु वर्ष उलटले तरी याबाबतची अंमलबजावणी पालिका प्रशासनाने न केल्याने माजी सैनिकांनी संताप व्यक्त केला आहे. ही अंमलबजावणी होण्यासाठी गेली वर्षभर माजी सैनिक पालिका मुख्यालयात खेटे मारत आहेत. कधी मिळणार करमाफी असा प्रश्न पालिका क्षेत्रातील सुमारे अडीच हजार माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना पडला आहे.

गुरुवारी पनवेलच्या माजी सैनिक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी पालिकेत आयुक्तांची भेट घेण्यासाठी आले होते. मात्र आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ पालिकेत उपलब्ध नसल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. भाजपचे पनवेल पालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या योजनेचा लाभ माजी सैनिकांना मिळावा यासाठी पालिका आयुक्तांना ऑगस्ट २०२३ मध्ये निवेदन दिले होते. पालिका प्रशासनाने माजी सैनिकांची थट्टा करत या महत्वपूर्ण शासन निर्णयाची अंमलबजावणी का केली नाही असा प्रश्न संतापलेले माजी सैनिक गुरुवारी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशव्दारावर विचारत होते. माजी सैनिकांना आदर देऊन यापूर्वी तत्कालिन आयुक्त गणेश देशमुख यांनी पालिकेतर्फे विविध कार्यक्रमात मानाचे स्थान दिले होते. मात्र सध्याचे पालिका प्रशासन माजी सैनिकांसाठी दिलेली सवलत जाहीर करत नसल्याने सैनिकांची थट्टा केली जात असल्याची भावना यावेळी माजी सैनिक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी विजय जगताप, समीर दुंदरेकर, दत्तात्रय चव्हाण यांनी व्यक्त केली. 

हेही वाचा – नवी मुंबई : पालिका विद्यार्थ्यांना यंदा वेळेवर गणवेश

हेही वाचा – उरणमध्ये १५ गावांना पुराचा धोका, आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा जाहीर

माजी सैनिकांसाठी पनवेल पालिकेची कोणती योजना होती?

पनवेल महापालिका परिसरात राहणाऱ्य़ा माजी सैनिकांना यापुढे मालमत्ता करातील सामान्य करातून शंभर टक्के सवलत देण्याबाबतचा निर्णय पनवेल पालिकेने घेतला होता. यामुळे पालिका क्षेत्रातील माजी सैनिकांना मोठा कर दिलासा मिळणार होता. “माननीय बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी या योजनेमार्फत हा निर्णय पनवेल पालिकेचे तत्कालिन आयुक्त गणेश देशमुख यांच्या कारकिर्दीत घेण्यात आला होता. यामुळे राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या सर्व माजी सैनिकांना आणि त्यांच्या विधवा पत्नींना सामान्य करातून शंभर टक्के सुट मिळणार होती. संबंधित करसवलत १ एप्रिल २०२३ पासून लागू करण्यात आल्याचे पालिकेने त्यावेळेस प्रसारमाध्यामांसमोर स्पष्ट केले होते. यापूर्वी पालिका क्षेत्रातील माजी सैनिकांना सामान्य करामध्ये ८ टक्क्यांची सवलत होती. माजी सैनिकांना १ एप्रिल २०२३ पासून सामान्य कर पूर्ण माफ करण्यात येणार असल्याचे पालिकेने जाहीर केले होते. ज्या माजी सैनिकांनी १ एप्रिल २०२३ ते १ ऑगस्ट २०२३ यादरम्यानचा मालमत्ता कराचा भरणा केला होता, त्यांचा सामान्य करात भरणा केलेली रक्कम पुढील वर्षाच्या मालमत्ता कराच्या बिलामध्ये समायोजित करण्यात येईल असेही पालिकेने त्यावेळेस जाहीर केले होते. संबंधित सवलतीचा लाभ घेण्यासाठी माजी सैनिकांनी १४ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज मागविले होते. 

योजनेचे लाभार्थी कोण?

– महाराष्ट्र राज्यात जन्मलेल्या किंवा राज्याचा किमान १५ वर्षे सलग रहिवासी असण्याचे सक्षम प्राधिकाऱ्याकडून अधिवास प्रमाणपत्र

– संबंधित जिल्हाच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याकडील प्रमाणपत्र 

– राज्यातील एकाच मालमत्तेकरिता कर माफीस पात्र राहतील. तसे घोषणापत्र त्यांनी संबंधित जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांना सादर करणे आवश्यक राहील

– या योजनेचा लाभ संबंधित माजी सैनिक आणि सैनिक पत्नी / विधवा हयात असेपर्यंतच देय राहील. तसेच अविवाहीत शहीद सैनिकांच्या बाबतीत त्यांचे आई वडील हयात असेपर्यंत हे लाभ देय राहतील. 

–  माजी सैनिक याचा अर्थ माजी सैनिक (केंद्रीय नागरी सेवा व पदांवर पुर्ननियुक्ती) सुधारणा नियम २०१२ मध्ये विहीत केलेल्याप्रमाणे