या वर्षी पावसाळ्यात बटाट्याचे दर वाढतच आहेत. गेल्या आठवड्यात वाढ होत बटाटे प्रतिकिलो १८ ते २० रुपये दर झाले होते. यात आता आणखी दोन रुपयांची वाढ झाली आहे. याचा फायदा घेत किरकोळ बाजारात ग्राहकांची लूट सुरू असून ३० ते ३५ रुपयांनी विकला जात आहे.

एपीएमसीतील कांदा, बटाटा बाजारात सध्या गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या परराज्यातून बटाट्याची आवक सुरू आहे. मात्र सणांमुळे आवक कमी झाली आहे. आधी ३६ ते ४० गाड्या दाखल होत होत्या. आता २० ते २५ गाड्या आवक होत आहे. दिवसेंदिवस आवक कमी होत असल्याने दरात वाढ होत आहे. मागील आठवड्यात घाऊक बाजारात प्रतिकिलो १८ ते २० रुपयांनी उपलब्ध असलेले बटाटे आता २० ते २२ रुपयांवर गेले आहेत.
सध्या बाजारात बटाटा महाग व कांदा स्वस्त अशी परिस्थिती आहे. गेल्या वर्षी कांदा दरात या काळात मोठी वाढ झाली होती. सप्टेंबरमध्ये राज्यातील नवीन बटाटा दाखल होईल. परंतु राज्यातील नवीन बटाट्याचा हंगाम सुरू झाला तरी दर चढेच राहतील अशी शक्यता व्यापरी व्यक्त करीत आहेत.