‘एपीएमसी’तील आवक घटली; ग्राहकही गायब

नवी मुंबई : दोन दिवस पडत असलेल्या आवकाळी पावसामुळे गुरुवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजी बाजारात भाज्यांची आवक घटली. तर दुसरीकडे ग्राहकच न फिरकल्याने हा बहुतांश भाजीपाला पडून राहिला. परिणाम घाऊक दर २० ते ३० टक्के घसरले.

एपीएमसी बाजारातून भाजीपाला हा मुंबई उपनगरात विक्रीसाठी जात असतो. मात्र दोन दिवस अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे गुरुवारी भाजीपाला बाजारात खरेदीसाठी येणारा ग्राहक मोठय़ा प्रमाणात आलाच नाही. त्यामुळे आवक झालेल्या ३२० भाज्यांच्या गाडय़ांपैकी ५० गाडी भाजीपाला विकलाच गेला नाही. नाशवंत असल्याने पडून राहिल्यास तो खराब होतो. त्यामुळे आवकही घटली; ग्राहकही गायब व्यापाऱ्यांनी दर पाडून भाजीपाला विकला. त्यामुळे भाज्यांच्या दरात २० ते ३० टक्के इतकी घसरण झाली. वाटाणा, हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लावर, शिमला मिरची यांचे दर उतरले आहेत.

आवकही कमी

भाजीपाला बाजारात नियमित  ५५० ते ६०० गाडय़ा आवक होत असते. गुरुवारी ३२० गाडी आवक झाली. आवक कमी झाल्याने दर वाढणे अपेक्षित होते. मात्र खरेदीदारांनी एपीएमसीत येणे टाळल्याने ही दरवाढ झाली.

पावसामुळे बाजारात भाजीपाला आवक कमी झाली. मात्र बाजारात ग्राहक खरेदीला आले नसल्याने भाजीपाला शिल्लक राहिला. त्यामुळे दर घसरले. 

शंकर पिंगळे, संचालक, भाजीपाला एपीएमसी