नवी मुंबई : पाणथळ भागांमध्ये थव्याने दिसणारे फ्लेमिंगो त्यांच्या आकर्षक गुलाबी छटेमुळे नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेतात. मात्र हा रंग त्यांना जन्मतः मिळालेला नसून त्यांच्या शरीरात होणाऱ्या जैविक प्रक्रियांमुळे कालांतराने विकसित होतो. त्यामुळे फ्लेमिंगोंचा रंग हा केवळ त्यांचे सौंदर्यच खुलवत नसून पक्ष्यांचे त्यांच्या अधिवासाशी असलेल्या नात्याबरोबरच निसर्ग आणि विज्ञानाचा सुंदर मेळही दाखवून देतो.

रोहित पक्षी म्हणजेच फ्लेमिंगो पक्ष्यांची पिल्ले जन्मताना पांढुरकी किंवा राखाडी रंगाची असतात. त्या अवस्थेत त्यांच्या शरीरात कोणतेही रंगद्रव्य सक्रिय नसते. वाढत्या वयानुसार त्यांच्या आहारात बदल होऊ लागतो आणि त्यातूनच त्यांना त्यांचा लक्षवेधी, आकर्षक रंग प्राप्त होतो. हे पक्षी प्रामुख्याने शैवाल, लहान कोळंबी आणि सूक्ष्म जलचरांवर उपजीविका करतात. या अन्नामध्ये ‘कॅरोटेनॉइड्स’ नावाचे नैसर्गिक रंगद्रव्य आढळते. पचनानंतर हे घटक शरीरात शोषले जाऊन हळूहळू पंख, त्वचा आणि चोचीत साठतात. परिणामी, सुरुवातीला फिकट असलेली छटा गुलाबी रंगाकडे झुकू लागते आणि पुढे अधिक ठळक होते.

हा बदल टप्प्याटप्प्याने घडत असल्याने पूर्णपणे विकसित रंग दिसण्यासाठी काही महिने ते काही वर्षांचा कालावधी लागतो. प्रौढ अवस्थेत हा रंग अधिक गडद आणि एकसंध दिसतो. आहारातील या घटकांची कमतरता भासल्यास रंग फिका पडण्याची शक्यता असते, त्यामुळे अधिवासातील अन्नसाखळीचे महत्त्व अधोरेखित होते. नवी मुंबईतील पाणथळ प्रदेश या पक्ष्यांसाठी पोषक ठरत असल्याने येथे त्यांची उपस्थिती नियमितपणे दिसून येते. या पार्श्वभूमीवर फ्लेमिंगोंचा रंग हा त्यांच्या आहार, पर्यावरण आणि जैविक प्रक्रियांचा एकत्रित परिणाम असल्याचे स्पष्ट होते.

दरम्यान, पाणथळ भागांवर वाढता प्रदूषणाचा ताण, प्लास्टिक कचरा आणि आसपासच्या बांधकामांचा दबाव यामुळे भविष्यात पक्ष्यांच्या अधिवासावर परिणाम होण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर अशा नैसर्गिक अधिवासांचे संवर्धन करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची गरज पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

रंगबदलामागील वैज्ञानिक प्रक्रिया

‘फ्लेमिंगो’ हे नाव स्पॅनिश ‘फ्लामेंको’ या शब्दावरून आले असून त्याचा अर्थ ‘अग्नीचा रंग’ असा होतो. त्यांच्या लालसर छटेशी साधर्म्य साधणारे हे नाव त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रूपाचे प्रतीक मानले जाते. फ्लेमिंगो हे जन्मतः पांढरे किंवा राखाडी असतात. वाढत्या वयानुसार ते शैवाल, कोळंबी आणि सूक्ष्म जलचरांचा आहार घेतात. या अन्नामध्ये ‘कॅरोटेनॉइड्स’ हे नैसर्गिक रंगद्रव्य असते, ज्यामध्ये बीटा-कॅरोटीन आणि अॅस्टॅक्सॅन्थिनसारखे घटक समाविष्ट असतात. पचनप्रक्रियेनंतर हे रंगद्रव्य शरीरात साठत जाऊन पंख, त्वचा आणि चोचीत जमा होते आणि त्यातून गुलाबी रंग विकसित होतो. ही प्रक्रिया दीर्घकालीन असून त्यांच्या आहारावर अवलंबून असते.