लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई: नेरुळ येथील वंडर्स पार्क हे नवी नवी मुंबई शहरातील लँडमार्क असून नवी मुंबई शहराबरोबरच उरण, पनवेल, ठाणे मुंबई या परिसरातील शहरातील अबाल वृद्धांचे महत्वपूर्ण प्रेक्षणीय ठिकाण आहे.सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या पार्कमध्ये विविध दुरुस्तीची तसेच नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या आकर्षक खेळांची व्यवस्था करण्यात आली आहे. करोनाकाळापासून जवळजवळ अडीच वर्षापेक्षा अधिक काळापासून सर्वसामान्यांसाठी बंद आहे. त्यातच विविध शाळांच्या परीक्षा संपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे हे पार्क कधी सुरु होणार याची उत्सुकता बच्चेकंपनीसह पालकांना आहे.त्यामुळे अडीच वर्षापासून बंदच असलेले हे पार्क उन्हाळी सुट्टीच्या आधी सुरु करण्याची मागणी होऊ लागली आहे.

नवी मुंबईतील नेरुळ येथील वंडर्स पार्कचे संपूर्ण मेक ओव्हर करण्यात आले असले तरी या पार्कसाठी आवश्यक असलेल्या विद्युत पुरवठ्यासाठीच्या सबस्टेशनच्या कामाच्या खोळंब्यामुळे अद्याप सुरु करण्यात आले नाही.सबस्टेशनचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे व पार्क तात्काळ सुरु करण्यात यावे यासाठी महापालिकेचे माजी महापौर सागर नाईक यांच्यासह माजी सभागृह नेते रविंद्र इथापे व अनेक माजी नगरसेवकांनी या पार्कची नुकतीच पाहणीही केली. सबस्टेशनचे बांधकाम करण्यात आले असून आता विद्युत विभागाचे काम करण्यात येत आहे. विद्युत विभागाकडून वीजव्यवस्थेसाठी साहित्यही प्राप्त झाले असून आता वेगाने विद्युत विभागाचे काम होणे आवश्यक आहे.अनेक वर्ष हे पार्क सुरु होण्याच्या प्रतिक्षेत असलेले हे पार्क उन्हाळी सुट्ट्यांच्यापूर्वीतरी सर्वांसाठी खुले करण्याची मागणी होऊ लागली आहे.

आणखी वाचा- नेरुळ रॉक गार्डन असुविधांच्या विळख्यात

वंडर्स पार्कचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते पार्कचे उद्घाटन करण्यात आले होते.वंडर्स पार्कमध्ये असलेली आकर्षक खेळणी, जगातील सात आश्चर्य दाखवणाऱ्या प्रतिकृती यासह अँम्पीथिएटर याबरोबरच आकर्षक तलाव खेळण्यासाठी असलेली प्रशस्त खेळण्याची जागा यामुळे येथे नेहमीच गर्दी पाहायला मिळत होती.

नव्याने करण्यात आलेल्या कामामध्ये वंडर्स पार्कमध्ये म्युझिकल फाऊंटन लेझर शोसहित,ऑडिओ व्ह्युजअल यंत्रणा नविन बसविणे,तलावांची दुरूस्ती,वॉक वे सुधारणा,नव्याने विविध खेळांच्या साहित्याचे प्रकार बसवणे,खेळण्यांखालील रबर मॅट बदलणे,सर्व ठिकाणी सी.सी.टि.व्ही कॅमेरा बसविणे,प्रवेशद्वारावर बायोमॅट्रीक मशीन लावणे,नवीन विद्द्युत दिवे लावणे. उद्द्यानात आकर्षक कारंजे सुधारणा अशी जवळजवळ २३ कोटी पेक्षा अधिकच्या खर्चातून वंडर्स पार्कचे मेकओव्हर करण्यात आले आहे. नेरुळमधील वंडर्स पार्कला नेहमीच मोठी गर्दी पाहायला मिळते.या उद्यानात नवी मुंबईसह ठाणे,खारघर,उरण,पनवेल येथुन टॉय ट्रेन तसेच विविध खेळण्यांची मजा घेण्यासाठी नागरीक येतात.परंतू आता पार्कमधील खेळण्यांमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नव्याने सुरु होणाऱ्या वंडर्स पार्कची उत्सुकता सर्वांनाचं लागली आहे.

आणखी वाचा- पाडव्याच्या मुहूर्तावर नवी मुंबई पोलीसांकडून सोनसाखळी चोरी प्रकरणातील पिडीत महिलांना दिलासा

नवी मुंबई शहरात वंडर्स पार्क बरोबरच रॉक गार्डन निसर्ग उद्यान ,घणसोली पार्क, संवेदना उद्यान अशी अनेक उद्याने नागरिकांना आकर्षित करीत आहे. शाळांच्या अंतिम परिक्षा संपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे बच्चेकंपनींसाठी आकर्षण असलेले हे पार्क सुरु करण्यासाठी पालकांची मागणी वाढू लागली आहे.याच वंडर्स पार्कच्या शेजारी आकर्षक ठरणारे सायन्स सेंटरही अस्तित्वात येत आहे त्याचे कामही वेगाने सुरु असून या दोन्ही ठिकाणच्या वीजव्यवस्थेसाठी लागणारे सबस्टेशनच्या कामामुळे वंडर्स पार्कचा खोळंबा झाला आहे. या दोन्ही ठिकाणांची सबस्टेशन एकाच ठिकाणी करण्यात येत असल्याने वंडर्स पार्क सुरु करण्यास उशीर होत आहे. वंडर्स पार्क लवकरात लवकर सुरु करण्यासाठी नुकतीच माजी महापौर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी पाहणी केली असून उन्हाळी सुट्ट्यांच्या आधीच हे पार्क सुरु करण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे करण्यात आल्याची माहिती माजी सभागृह नेते रविंद्र इथापे यांनी दिली.

चौकट- नवी मुंबईकरांसाठी आकर्षण असलेले वंडर्स पार्क लवकरात लवकर सुरु करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या ठिकाणी वीजव्यवस्था पुरवण्यासाठीचे अभियंता विभागाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. विद्युत विभागाचे काम लवकरच पूर्ण होईल.त्याला वेळ लागणार नाही. त्यामुळे या पार्कचा लवकरच सर्वांना लाभ घेता येईल. -राजेश नार्वेकर,आयुक्त,नवी मुंबईमहापालिका

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will wonders park be buzzing again before the summer holidays mrj
First published on: 22-03-2023 at 19:37 IST