नवी मुंबई : हार्बर रेल्वेमार्गावरील सीवूड्स स्थानकात सोमवारी (३० जून) दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला. सीएसएमटीहून पनवेलकडे जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या एका अनोळखी महिलेने अवघ्या १५ दिवसांच्या तान्ह्या बाळाचा परित्याग करत पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील असून, तिने मदतीच्या बहाण्याने बाळ दोन तरुणींना सोपवले आणि सीवूड्स स्थानकावर न उतरता पसार झाली.
जुईनगर येथे राहणाऱ्या दिव्या नायडू (१९) आणि तिची मैत्रीण भूमिका माने या दोघी चेंबूरहून घरी जात असताना सदर महिला त्यांना सानपाडा स्थानकात भेटली. “माझ्याकडे बाळ आणि सामान आहे, मला सीवूड्स स्थानकात उतरायचं आहे,ह कृपया मदत करा,” असे सांगत तिने त्या दोघींची सहमती मिळवली. सीवूड्स स्थानक आल्यावर महिलेने बाळ त्यांच्या हातात दिले आणि स्वतः मात्र लोकलमधून खाली उतरलीच नाही.
प्रथमदर्शनी अधिक सामान असल्याने ती उतरू शकली नसावी, असा समज या दोघींनी केला. मात्र, बराच वेळ वाट पाहूनही महिला परतली नाही. त्यामुळे त्यांनी बाळासह घरी जात त्याची काळजी घेतली आणि त्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
वाशी रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी सांगितले की, “सदर महिलेविरोधात भारतीय दंड संहिता कलम ९३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळ सध्या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात असून, त्याची प्रकृती स्थिर आहे.”
पोलिसांनी चार शोधपथके तयार केली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महिलेचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासात संबंधित महिला खानदेश भागातील असल्याची शक्यता आहे. मात्र, स्थानकांवरील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित नसल्याने तपासाला अडथळा येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बाळाच्या आईविषयी कुणाकडे माहिती असल्यास वाशी रेल्वे पोलीस ठाण्याशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.