वैफल्यग्रस्त झाल्याने व्यसनाधीनतेत वाढ; किराणा मालासाठी घरगुती भांडय़ांची विक्री

पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे देशात अभूतपूर्व चलनकल्लोळ निर्माण झाला असून त्याचा सर्वाधिक मोठा फटका नाका कामगारांना झाला आहे. मोलमजुरी केल्याने हातावर पोट असलेल्या या कामगारांना दिवसभर काम करून मिळणाऱ्या मजुरीवरच नोटाबंदीमुळे गडांतर आले आहे. गेले १५ दिवस हातांना काम नसलेले हे कामगार वैफल्यग्रस्त झाले असून अनेक जण व्यसनाधीन झाले आहेत तर काही जणांनी किराणा मालासाठी घरातील भांडीकुंडी विकण्यास सुरुवात केली आहे.

नवी मुंबईत सुमारे ३० हजार नाका कामगार दररोज विविध नाक्यावर कामाची आस लावून बसले आहेत. प्रत्येक शहरी भागात अशा नाका कामगारांची संख्या लक्षणीय असल्याने राज्यात लाखोच्या घरात हे कामगार आहेत.

केंद्र सरकारने चलनातून हजार पाचशेच्या नोटा बंद करुन शुक्रवारी  १७ दिवस झाले आहेत. अचानक झालेल्या चलन बदलामुळे बांधकाम व्यवसायिकांनी बांधकामांना स्थागिती दिली आहे. या बांधकाम क्षेत्रात नाका कामगारांची मोठी गरज मानली जाते. सकाळी गावांच्या नाक्यावर जाऊन मुकादम असलेले कामगार बांधकाम क्षेत्रासाठी लागणारे मजुर घेतो आणि त्यांच्याकडून मजुरी, मेस्त्री, आणि कुशल कारागीरीची कामे करुन घेतली जातात. एखाद्या घरात छोटी मोठी होणारी दुरुस्ती देखील या कामगारांच्या माध्यमातून केली जाते. नवी मुंबईत दिघा विष्णूनगर, ऐरोली नाका, नोसिल नाका, कोपरखैरणे तीन टाकी, वाशी सेक्टर नऊ, कोपरी पेट्रोल पंपाजवळ, तुर्भे नाका,शिरवणे बस डेपो, सिबिडी बस डेपो जवळ नाका कामगार रोजगारासाठी उभे राहात असतात.

या ठिकाणाहून मुकादम या कामगारांना कामाच्या ठिकाणी घेऊन जातो. या कामाच्या बदल्यात मुकादम या कामगारांना संध्याकाळी दिवसाची मजुरी देत असतो. यात मजुरीचे काम करणाऱ्या कामगारांना जास्तीत जास्त चारशे रुपये तर कुशल कामगारांना एक हजार रुपय पर्यंत मजुरी दिली जात आहे. ही रक्कम रोख देण्याची पध्दत गेली अनेक वर्षे प्रचलित असल्याने हजार पाचशेची नोट बाजारातून गायब झाल्याने या कामगारांच्या कामावर संक्रात आली आहे. गेली पंधरा दिवस हाताना काम नाही असे या कामगारांचे मत आहे. त्यामुळे उपासमार सुरु झाली आहे. इतर ग्राहकांना उधारीत किरणामाला देणारे दुकानदार मात्र या नाका कामगारांना दुकानासमोर उभे करीत नसल्याचे चित्र आहे.

त्यामुळे घरातील सामान विकून जीवनावश्यक वस्तू विकत घेण्याची वेळ या कामगारांवर आली आहे. त्यात एखाद्या कामगाराकडे हजार पाचशेची नवीन नोट असल्यास सुटय़ाच्या नावाने त्यांना मार्गाला लावले जात आहे. गेली पंधरा दिवस कामच नसल्याने तुर्भे येथील एका नाका कामगाराने आत्महत्या केल्याच समजते. पोलिसांनी या नोटांबंदीमुळे झालेल्या आत्महत्तेला दुजोरा दिला नाही. ही स्थिती पूर्वपदावर येण्यास आणखी किती काळ जाईल याची काहीच कल्पना या कामगारांना नाही.

नाका कामगारांची आजची आर्थिक स्थिती दययनीय आहे.  त्यांचा रोजगार बुडल्यात जमा आहे. त्यामुळे त्यांची उपासमार सुरु झाली आहे. अनेक कामगारांचे बँकेत खातेही नाही. त्यामुळे त्यांची पंचाईत झाली आहे.

ख्वाजा मिया पटेल, अध्यक्ष, रिपब्लिकन असंघटित कामगार सेना, नवी मुंबई

संध्याकाळपर्यंत मजुरी करुन मिळणाऱ्या पैशावर घरातील चुल पेटवली जात होती मात्र मागील पंधरा दिवस कामच मिळेनासे झाले आहे. त्यामुळे कुटुंबाला उपाशी झोपण्याची वेळ आली आहे. कधी हा आम्हाला रोजगार मिळणार हे पण माहित नाही.

रवि नाडर, नाका कामगार, कोपरी