scorecardresearch

किडके हापूस ओळखण्यासाठी एपीएमसीत ‘क्ष-किरण’ चाचणी

उत्तम हापूस आंब्याची निर्यात व्हावी म्हणून हे यंत्र एका अभियंत्याकडून बनवून घेतले आहे.

हापूस आंब्याची पाहणी बारकाईने केली जाते. छाया : नरेंद्र वास्कर

आतापर्यंत केवळ प्राण्यांचे अंतरंग तपासणारे स्कॅनिंग मशीन आता फळांचा राजा असलेल्या हापूसच्या निमित्ताने एका निर्यातदाराने फळांसाठी बनवून घेतले असून सध्या ते दुबईत दिवसाला पाठविणात येणाऱ्या ७०० ते ८०० किलो हापूस आंब्यांचे स्कॅनिंग करून पाठविले जात आहे. एपीएमसी बाजारातील फळ घाऊक बाजारात फक्त एका मराठी निर्यातदाराकडे हे यंत्र असून त्यांनी या यंत्राचे छायाचित्र घेण्यास नकार दिला. सुमारे तीस लाख रुपये खर्चून त्यांनी उत्तम हापूस आंब्याची निर्यात व्हावी म्हणून हे यंत्र एका अभियंत्याकडून बनवून घेतले आहे. हापूस आंब्याचाही ‘क्ष-किरण’ निघू शकतो का, त्याच्या अंतरंगात डोकावून पाहता येईल का या कल्पनेतून या यंत्राचा शोध लागल्याचे या व्यापाऱ्याने सांगितले.
दोन वर्षांपूर्वी हापूस आंबा व पाच भाज्यांमध्ये फळमाश्या सापडल्याने युरोपीयन महासंघाने या फळ व भाज्यांना युरोप प्रवेश बंदी केली होती. उष्ण जल, उष्ण तापमान आणि किरणोत्सार प्रक्रिया केल्यानंतरच फळे व भाज्या युरोपमध्ये पाठविल्या जातील, असे स्पष्ट आश्वासन दिल्यानंतर ही बंदी उठविण्यात आली आहे. त्यामुळे चांगल्या व कीटकमुक्त फळ व भाज्यांसाठी परदेश आग्रही असल्याचे नेहमीच स्पष्ट झाले आहे. दुबई, सिंगापूर, मलेशिया यांसारख्या आशियाई देशात फळ व भाज्या चिकित्सेचे इतके कडक नियम नसले तरी मात्र या देशांना पाठविण्यात येणारा हापूस आंबा चांगल्या प्रतीचा पाठविण्यात यावा या उद्देशाने एपीएमसी बाजारातील एक मराठी फळ निर्यातदाराने श्रीकृष्ण पर्वते (नाव बदलण्यात आले आहे) हे यंत्र मोठय़ा जिद्दीने स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्वखर्चाने बनवून घेतले आहे. या यंत्रात एक एक हापूस टाकला जात असून तो निर्यातीसाठी पाठविला जात आहे. आतून खराब आंबा असल्यास या यंत्रात गेल्यानंतर मशीनवर असलेला लाल दिवा प्रज्ज्वलित होत असल्याने त्याला बाजूला काढला जात आहे. एक एक आंब्याची परीक्षा करणे तसे कठीण काम असून हापूस बाबत असलेली भारताची प्रतिमा परेदशात टिकून राहावी आणि खव्वये असलेल्या अरबांना चांगला आंबा मिळावा यासाठी पर्वते यांनी पदरमोड करून हे यंत्र विकसित केले आहे. त्यामुळे दुबईत सध्या पाठविण्यात येणारा व अरबांच्या दिवाणखान्याची शान वाढविणारा हापूस स्कॅनिंगची परीक्षा देऊनच पाठविला जात आहे. यामुळे हापूस आंब्याची निर्यात बाजारातील विश्वासार्हता वाढविली गेली आहे. या निमित्ताने येणारे परकीय चलन हे शंभर टक्के फळ व्यापाऱ्यांच्या पदरात पडत आहे.
सध्या आखाती देशात मोठय़ा प्रमाणात हापूस आंबा पाठविला जात असल्याने उत्तम, विश्वासार्ह हापूस आंबा पाठविण्यात या मराठी निर्यातदाराची मक्तेदारी आहे. ती कायम राहावी यासाठी या यंत्राबाबत काहीशी गुप्तता पाळण्यात आली आहे. त्यामुळे त्याची माहिती किंवा छायाचित्र घेण्यास नकार दिला जात आहे.
चार दिवसांपूर्वी नवी मुंबईत पणन महामंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या किरणोत्सार प्रक्रिया केंद्रामुळे हापूस आंबा थेट अमेरिकेत रवाना झाला आहे. यापूर्वी अमेरिका वारीसाठी हापूस आंब्याला किरणोत्सारासाठी नाशिक वारी करावी लागत होती. एपीएमसीत सुरू झालेल्या या किरणोत्सार प्रक्रिया केंद्रामुळे परदेशात निर्यात करणाऱ्या निर्यातदारांना फार मोठा दिलासा लाभला आहे. आता हापूस आंब्याचे अंतरंग तपासून पाहणारे यंत्र उपलब्ध झाल्याने हापूस आंब्याची एकूणच निर्यात बाजारपेठे सुखावली आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: X ray can detect mango pest infestation

ताज्या बातम्या