Yashashree Shinde Murder Case : उरण येथील यशश्री शिंदे हत्याकांडाने महाराष्ट्राच नाही तर संपूर्ण देश हादरला आहे. दाऊद शेखने तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले, तिची हत्या केली. यशश्री शिंदे ( Yashashree Shinde ) लग्नाला नकार देत होती आणि लग्न करुन बंगळुरुला येण्यासही तिने नकार दिला होता म्हणून दाऊदने तिची हत्या केली. २५ जुलै रोजी नवी मुंबईत ही घटना घडली. त्यानंतर २७ जुलै या दिवशी यशश्रीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. तिच्या मृतदेहाचे लचके कुत्र्यांनी तोडले होते अशीही माहिती समोर आली. इतकंच नाही तर तिचे अवयवही कापण्यात आले होते. अत्यंत निर्घृण पद्धतीने तिची हत्या करण्यात आली. आता या हत्या प्रकरणात टॅटूचा अँगल समोर आला आहे. यशश्री शिंदेच्या ( Yashashree Shinde ) अंगावर दोन टॅटू होते. त्यापैकी एकावर दाऊदचं नाव होतं आणि ही बाब पोलीस रेकॉर्डवर आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

२५ जुलैला दाऊद शेख बरोबर चाकू घेऊनच आला होता

उरण येथे राहणारी तरुणी यशश्री शिंदेची ( Yashashree Shinde ) अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. तिच्या शरीरावरचे अवयव कापण्यात आले. तिचा छिनविछिन्न मृतदेह पोलिसांना २७ जुलै रोजी आढळून आला. उरण मध्ये राहणारी ही तरुणी यशश्री शिंदे आणि तिची हत्या करणारा दाऊद शेख हे एकमेकांच्या संपर्कात होते. यशश्री शिंदे शाळेत असल्यापासून दाऊद शेख तिला ओळखत होता. यशश्री शिंदे हत्या प्रकरणात दाऊद शेखला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दाऊदने यशश्री शिंदेला जेव्हा २५ जुलैच्या दिवशी भेटायला बोलवलं तेव्हा तो चाकू बरोबर घेऊनच आला होता अशी माहिती पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी माध्यमांना दिली.

यशश्री शिंदेच्या अंगावर दोन टॅटू, एका टॅटूमध्ये दाऊदचं नाव

“यशश्री शिंदेच्या हत्या प्रकरणाच्या घटनेत प्रेमाचा त्रिकोण होता की नाही हे सांगता येणार नाही. पण दाऊद शेख लग्नाचा आग्रह धरत यशश्री शिंदेच्या मागे लागला होता. दाऊदच्या नावाचा टॅटू यशश्री शिंदेच्या ( Yashashree Shinde ) अंगावर होता ही बाब पोलीस रेकॉर्डवर आहे. लव्ह ट्रँगलबाबत आत्ता सध्या काही सांगता येणार नाही. दोघांमध्ये वाद झाला की दोघंही एकमेकांना ब्लॉक करायचे. मौसिनच्या माध्यमातून त्यांचा संवाद होता” अशी माहिती पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली आहे.

हे पण वाचा- Yashashree Shinde Murder Case: दाऊद शेखने यशश्री शिंदेची हत्या का केली? ‘हे’ कारण आलं समोर

यशश्रीने स्वखुशीने टॅटू गोंदवला होता?

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दाऊदच्या समोर यशश्रीच्या अंगावर हा टॅटू गोंदण्यात आला होता अशी माहिती मिळते आहे. त्यामुळे, यशश्रीने स्वखुशीने टॅटू गोंदवला होता की, दाऊदने जबरदस्तीने हा टॅटू गोंदवायला भाग पाडले होते? शिवाय दुसरा टॅटू कोणाचा? याचा तपास केला जात आहे. हा टॅटू कोठे काढला, कोणी काढला आणि याबाबत पोलीस सखोल तपास करणार आहेत. त्यावरुन, टॅटू आर्टीस्ट पोलिसांच्या रडावर आहे.

यशश्री शिंदेचा मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत सापडला (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मौसिन आणि दाऊद यांची मैत्री होती

“दाऊद आणि मौसिन यांची मैत्री चांगली होती. त्याच्या मोबाइलवरुन दाऊद शेख यशश्रीशी संपर्क साधायचा. या दोघांचं भांडण झालं किंवा त्यांनी एकमेकांना ब्लॉक केलं तर दाऊद शेख मौसिनच्या फोनवरुन यशश्रीशी ( Yashashree Shinde ) संपर्क करायचा. मात्र प्रेमाचा त्रिकोण किंवा तसा काही अँगल समोर आलेला नाही. दाऊदने आम्हाला इतकंच सांगितलं की मी यशश्रीला सांगितलं होतं की माझ्यासह लग्न कर आणि बंगळुरुला चल मात्र तिने नकार दिला. २०१९ मध्ये जेव्हा दाऊदला पॉक्सो अंतर्गत अटक झाली त्यानंतर काही कालावधीनंतर तो जामिनावर सुटला. त्यानंतर त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यानंतर अनेक दिवस तो यशश्रीच्या संपर्कात नव्हता. मात्र त्यानंतर काही महिन्यांनी मित्राच्या माध्यमातून तो २०२० च्या नंतर तो पुन्हा यशश्रीच्या संपर्कात आला होता” असंही काळे यांनी सांगितलं.