नवी मुंबई : करोना साथीनंतर व्यायामाचे महत्त्व अधोरेखित झाल्याने सायकल घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे काही विशिष्ट सायकलींसाठी ग्राहक प्रतीक्षा यादीवर असताना नवी मुंबईत सहज सोप्या उपलब्ध होणाऱ्या ‘युलू’ सायकल व मोटार सायकली सर्वाधिक वापरल्या जात आहेत. देशात सर्वाधिक या सायकलींचा वापर करणारे नवी मुंबई हे शहर आहे.
नवी मुंबईत १०० ठिकाणी या सायकल व मोटार सायकल उपलब्ध होत असून त्यांची संख्या चारशेपेक्षा जास्त आहे. नागरिकांचा हा प्रतिसाद पाहता पालिकेने दोन आसनी सायकल उपलब्ध व्हावे यासाठी नवीन निविदा काढली असून त्यालाही प्रतिसाद आला आहे. शहर पर्यावरण पूरक व्हावे यासाठी पालिका हे प्रयत्न करीत आहे.
कर्नाटकमधील बंगळूरु शहरातून सुरू झालेल्या या मोटार सायकल व सायकलींना मोठ्या शहरात चांगला प्रतिसाद लाभत आहे. तीन वर्षांपूर्वी नवी मुंबई पालिकेने या सायकलींसाठी सात ठिकाणी पसंती दिली होती. मात्र नागरिकांचा या सेवेला मिळणारा प्रतिसाद पाहता ही सेवा आता शहरातील १०० ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. प्रति तास दहा रुपये भाडे असलेल्या या सायकलींचा वापर नवी मुंबईतील पामबीच मार्गावर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. ६० किलोमीटरपर्यंत युलू विद्युत मोटार सायकल चालविता येत असून सायकलचा वापर हा दहा-पंधरा किलोमीटरसाठी केला जात आहे.
करोनानंतर व्यायामाचे महत्त्व अधिक जाणवू लागल्याने अनेक नागरिकांनी सायकल चालविण्यावर भर दिला आहे. नवी मुंबईत या सायकली सहज उपलब्ध होत असल्याने नवी मुंबकरांनी तीन लाखांपेक्षा जास्त धाव मागील तीन वर्षात नोंदविली आहे. त्यामुळे बंगळूरुपेक्षा जास्त नवी मुंबईत या सायकली वापरल्या जात आहेत. या सायकलींचा वापर वाढल्याने ‘कार्बन क्रेडिट’ वाढत आहे.
या सायकलींचा नागरिकांनी जास्तीत जास्त वापर करून पेट्रोल मोटार सायकलींचा वापर कमी करावा यासाठी सहप्रवाशांना सहज प्रवास करता येईल अशा विद्युत युलू दुचाकींची संख्या वाढवली जाणार आहे. त्यासाठी पालिकेने नवीन निविदा काढली असून त्याची अंमलबजावणी राहिली आहे.
