Zero waste initiative campaign by Navi Mumbai Municipal Corporation ssb 93 | Loksatta

नवी मुंबई महापालिकेकडून शून्य कचरा उपक्रम मोहीम, नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत सातत्य निर्माण करणार

नवी मुंबईकरांमध्ये स्वच्छतेविषयी सातत्य राखून ठेवण्यासाठी, स्वच्छतेची सवय अंगवळणी पडण्यासाठी महानगरपालिकेने आता सामाजिक कार्यक्रमातून शून्य कचरा उपक्रम मोहीम राबवण्याचे नियोजन आखले आहे.

navi mumbai
नवी मुंबई महापालिका(संग्रहित छायाचित्र)

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता सर्वेक्षणअंतर्गत विविध कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी त्या-त्या विभागात सुट्टीच्या दिवशी नागरिकांच्या माध्यमातून विभागाची स्वच्छता देखील केली जात आहे. त्याच अनुषंगाने कचरा वर्गीकरण, स्वच्छता तसेच प्लास्टिकचा वापर न करणे, यासाठी नवी मुंबईकरांमध्ये स्वच्छतेविषयी सातत्य राखून ठेवण्यासाठी, स्वच्छतेची सवय अंगवळणी पडण्यासाठी महानगरपालिकेने आता सामाजिक कार्यक्रमातून शून्य कचरा उपक्रम मोहीम राबवण्याचे नियोजन आखले आहे.

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छता कार्यात शहरातील जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग वाढवण्यावर भर देत आहे. स्वच्छता सवयी घरोघरी पोहोचण्यासाठी शहरातील नागरिकांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान, शालेय विद्यार्थ्यांमार्फत कचरा वर्गीकरण संदेश पोहोचविणे, तसेच या माध्यमातून स्वच्छतेत जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग वाढवला जात आहे. आता नागरिकांच्या विविध सामाजिक-कौटुंबिक जसे की, वाढदिवस, लग्न, मुंज, बारसे किंवा सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांतून नागरिकांच्या स्वच्छतेविषयक वर्तणुकीमध्ये बदल घडविण्याकरीता प्रयत्न करण्यात येत आहेत. असे सामाजिक-कौटुंबिक कार्यक्रम समाज मंदिर किंवा हॉलमध्ये साजरे करण्यात येतात. या ठिकाणी कार्यक्रमादरम्यान कचरा वर्गीकरण व प्रक्रिया, तसेच इतर स्वच्छता विषयक उपक्रम राबविण्यास प्रोत्साहन देणे व प्लास्टीक वस्तूंचा वापर टाळणे व यामध्ये सातत्य ठेवून रहिवाश्यांच्या सवयीत बदल घडविण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत ‘शून्य कचरा उपक्रम’ राबविण्यात येत आहे. या ठिकाणी नागरीकांनी शून्य कचरा उपक्रम राबविल्यास महानगरपालिकेमार्फत आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये २५ टक्के इतकी सूट देण्यात येणार आहे.

हेही वाचा – बेलापूर ते गेट वे इंडियाचा प्रवास फक्त ६० मिनिटांत, नवी मुंबई, मुंबईकरांसाठी ‘वॉटर टॅक्सी’ची सफर सुरू

असा आहे शून्य कचरा उपक्रम

या शुन्य कचरा उपक्रमात कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकचा वापर न करणे, पाणी आणि सरबत पिण्याकरीता कागद, काचेच्या ग्लासचा वापर, जेवणाकरीता पर्यावरण पुरक प्लेटचा वापर सजावट, फ्लेक्स, बॅनर्सकरिता रंगीत कागदाचा, कापडाचा वापर करणे, मुलांना रिटर्न गिफ्ट देताना ज्यूट बॅग, रिसायकल पद्धतीने केलेल्या डायऱ्या किंवा स्टिलच्या पाण्याच्या बाटल्या अशा प्रकारच्या वस्तूचा वापर करणे, पाणी जपून वापरणे, ओला व सुका कचरा टाकण्याकरीता वेगवेगळ्या कचरा कुंड्यांचा वापरआणि स्वच्छता जनजागृती करणे या गोष्टींचा समावेश आहे.

हेही वाचा – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ‘सुकन्या समृध्दी योजना’ गुरुवारी दि ९ व १० फेब्रूवारी दोन दिवस मोहीम राबविण्यात येणार

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता सर्वेक्षणात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी, तसेच स्वच्छतेमध्ये सातत्य राखण्यासाठी सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमातून शून्य कचरा उपक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत आतापर्यंत ७ ठिकाणी कार्यक्रम झाले असून, नागरिकांमधून उत्तम प्रतिसाद मिळत आहे, असे बाबासाहेब राजळे, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन यांनी सांगितले.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 14:19 IST
Next Story
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ‘सुकन्या समृध्दी योजना’ गुरुवारी दि ९ व १० फेब्रूवारी दोन दिवस मोहीम राबविण्यात येणार