News Flash

जे आले ते रमले.. : वेरियर एल्विन- एक महान भारतीय (2)

वेरियरनी आदिवासींच्या जीवनावर एकूण ३६ पुस्तके लिहिली. त्यापैकी ‘द फिशर गर्ल अँड क्रब’ हे विख्यात आहे.

१९२७ साली ख्रिस्ती मिशनरी म्हणून भारतात आलेले ब्रिटिश नागरिक वेरियर एलवीन यांनी धर्मप्रसाराचे काम सोडून मध्य आणि ईशान्य भारतातील आदिवासी आणि वन्य जमातींच्या उत्कर्षांसाठी स्वतला वाहून घेतले, गांधीवादी बनून स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाले हा त्यांचा जीवनप्रवास अद्भुत आहे! मध्य भारतातील गौंड आणि बगा या वन्य जमातींच्या पाडय़ातच राहून संपूर्णपणे आदिवासींमध्ये समरस झालेल्या या ख्रिश्चन माणसाने पुढे हिंदू धर्म स्वीकारला. महात्मा गांधींच्या संपर्कात आल्यावर स्वातंत्र्य चळवळीतील गांधींच्या असहकार, सत्याग्रह, उपोषण यांसारख्या कार्यक्रमांमध्येही वेरियर एलवीन यांचा सहभाग होता. गांधीजींनी तर वेरियरना आपला मुलगाच मानले होते. आदिवासींचा मानववंशशास्त्रीय अभ्यास करताना वेरियर एलवीन रवींद्रनाथ टागोरांच्या संपर्कात आले आणि त्यांचे साहित्य, त्यांची विचारप्रणाली यांनीही वेरियरना भुरळ घातली.

वेरियर या आदिवासी लोकांमध्ये मिळून मिसळून राहत. पूर्व मध्यप्रदेशातील पठाणगढच्या एका पाडय़ातील पारधी गौंड जमातीची तरुणी लीला हिच्याशी वेरियरनी लग्न केले. वसंत, नकुल आणि अशोक हे त्यांचे तीन मुलगे! भारतीय स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी वेरियरना ईशान्य भारतातील अरुणाचल, मेघालय, मणिपूर या प्रदेशांतील आदिवासींच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाय, तोडगा सुचविण्याची सूचना केली, नॉर्थ ईस्ट फ्रंटीयर एजन्सीचे त्यांना सल्लागार नेमले. या कामासाठी वेरियर आपल्या कुटुंबासह शिलाँग येथे स्थलांतरित झाले. या प्रदेशातल्या आदिवासींचा सखोल अभ्यास करून वेरियरनी सरकारला अनेक प्रस्ताव मांडले. अनेकांची अंमलबजावणीही झाली.

वेरियरनी आदिवासींच्या जीवनावर एकूण ३६ पुस्तके लिहिली. त्यापैकी ‘द फिशर गर्ल अँड क्रब’ हे विख्यात आहे. भारत सरकारने त्यांच्या कार्याबद्दल १९६१ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा बहुमान केला. वेरियरनी लिहिलेल्या ‘दी ट्रायबल वर्ल्ड ऑफ वेरियर एलवीन’ या त्यांच्या आत्मचरित्राला १९६५ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. पूर्णपणे भारतीय झालेल्या या महान परकियांचे निधन १९६४ साली दिल्लीत झाले तर त्यांची पत्नी लीला हिचे निधन मुंबईत २०१३ मध्ये झाले.

सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 1:01 am

Web Title: a great indian verrier elwin
Next Stories
1 ऑस्मिअम-१
2 वेरियर एल्विन (१)
3 ‘मौल्यवान धातू’
Just Now!
X