24 February 2019

News Flash

जे आले ते रमले.. : गांधीवादी अब्दुल गफार खान

१९२८ मध्ये त्यांनी ‘पख्तून’ हे पुश्तो भाषेतले राजकीय विषयावरील मासिक सुरू केले.

खुदाई खिदमतगार संघटनेचे स्वयंसेवक

स्वातंत्र्य आंदोलन काळातील ‘सरहद गांधी’ या नावाने लोकप्रिय झालेले अब्दुल गफार खान हे मूळचे पेशावरचे पठाण जमातीतले गांधीवादी. पठाण समाजाचा शैक्षणिक उत्कर्ष, समाजसेवा आणि देशभक्ती यासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले होते. अब्दुल खाननी १९१० साली आपल्या गावी मशिदीत शाळा सुरू केली आणि पुढच्या वर्षी हाजीसाहेब यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. त्यांच्या ब्रिटिश द्वेषामुळे आणि आंदोलनकारी तरुणांच्या बरोबर असलेल्या संबंधांमुळे १९१५ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांच्या शाळेवर बंदी घातली. त्यामुळे खानसाहेबांनी काही काळ पठाण समाजासाठी सामाजिक सुधारणांचे कार्य करायचे ठरवून त्यासाठी ‘अंजुमन-ए-इस्लाह-ए-अफगानिया’ म्हणजे अफगाण नवनिर्माण समितीची आणि १९२१ मध्ये पश्तुन तरुणांसाठी ‘पश्तुन जिगरा’ अशा संघटना स्थापन केल्या. १९२८ मध्ये त्यांनी ‘पख्तून’ हे पुश्तो भाषेतले राजकीय विषयावरील मासिक सुरू केले.

यापूर्वीच महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाने, अिहसक आंदोलनांमुळे प्रभावित झालेल्या अब्दुल गफार खानांनी १९१९ साली रोलेक्ट अ‍ॅक्टविरोधात झालेल्या आंदोलनात भाग घेऊन ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीत क्रियाशील झाले. अब्दुल गफार खान एक स्वतंत्र आणि धर्मनिरपेक्ष भारताची स्थापना होण्याचा ध्यास घेऊन त्या दृष्टीने कार्यरत होते. महात्मा गांधींच्या अिहसा आणि सत्याग्रह यांसारख्या सिद्धांतांनी प्रेरित होऊन अब्दुल खाननी १९२९ साली ‘खुदाई खिद्मतगार’ नावाची संघटना स्थापन केली. खुदाई खिदमतगार म्हणजे देवाचा सेवक. या संघटनेला ‘सुर्ख पोश’ म्हणजे लाल कुर्ता असेही म्हणत.

अब्दुल खान यांच्या करिष्माई नेतृत्वामुळे या संघटनेत अल्प काळातच साधारणत: १० हजार तरुण पठाण अनुयायी सदस्य झाले. या संघटनेच्या लोकांनी सत्याग्रह, राजनैतिक संघटन या मार्गानी ब्रिटिश सरकारच्या पोलीस आणि लष्कराला विरोध करून सळो की पळो करून सोडले. लवकरच खुदाई खिदमतगार ही संघटना वायव्य सरहद्द प्रांत म्हणजे सध्याच्या पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील एक प्रमुख राजनैतिक शक्ती बनली.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

First Published on May 30, 2018 3:07 am

Web Title: abdul ghaffar khan