19 September 2020

News Flash

मनोवेध : व्यक्ती तितक्या प्रकृती

वाल्याचा वाल्मीकी, अंगुलीमाल अरिहन्त होणे या कथा व्यक्तिमत्त्वातील बदल दाखवणाऱ्या आहेत.

डॉ. यश वेलणकर

एका कुटुंबात वेगवेगळी व्यक्तिमत्त्वे असलेली माणसे असतात. वडील बहिर्मुख आणि मुलगा अंतर्मुख असे असू शकते. व्यक्तिमत्त्वातील विकृती दूर करणे आवश्यक असले, तरी निरोगी व्यक्तिमत्त्वात आदर्श असे काही नसते. स्वत:ला आणि इतरांना त्रास देण्याची प्रवृत्ती नसेल, तर व्यक्तिमत्त्वाचे सारे प्रकार चांगलेच असतात. संघटन करण्यासाठी बहिर्मुखता आवश्यक असते, तसेच एखाद्या विषयाचा गांभीर्याने सातत्याने अभ्यास, चिंतन हे अंतर्मुख व्यक्ती चांगले करू शकते. स्वत:चा सर्वागीण विकास घडवू पाहणारी व्यक्ती या दोन्हीचाही समतोल साधू शकते. मानसशास्त्रात यास ‘अ‍ॅम्बिव्हर्ट’ म्हणतात.

म्हणजेच व्यक्तिमत्त्व प्रयत्नपूर्वक बदलता येते. सर्व संस्कृतींतील विविध कथा व्यक्तिमत्त्वबदलाचे दाखले देतात. वाल्याचा वाल्मीकी, अंगुलीमाल अरिहन्त होणे या कथा व्यक्तिमत्त्वातील बदल दाखवणाऱ्या आहेत. वयानुसारही व्यक्तिमत्त्व बदलते. लहानपणी चेष्टेखोर असणारी एखादी मुलगी तारुण्यात गंभीर होऊ शकते. आज्ञाधारक मुलगा उलट उत्तरे देऊ लागतो. हे बदल कुटुंबातील व्यक्तींच्या लक्षात येऊ शकतात. अशा वेळी त्या मुलांशी संवाद साधून या बदलाच्या मागे कोणती कारणे आहेत हे समजून घेणे आवश्यक असते. व्यक्तिमत्त्वात असे बदल होत असले, तरी नैसर्गिक प्रकृती फारशी बदलत नाही.

प्रत्येक माणसाची प्रकृती वेगळी असली, तरी आयुर्वेदानुसार कफ प्रकृती असलेली व्यक्ती स्थैर्य प्रिय असणारी असते. तिला सतत बदल आणि प्रवास करावे लागले, तर ती अस्वस्थ होते. वात प्रकृती असलेल्या माणसाला एकाच जागी एकच काम सतत करण्याचा कंटाळा येतो. व्यवस्थापन क्षेत्रात आता माणसाचे व्यक्तिमत्त्व ओळखून त्यानुसार त्याला काम देणे योग्य असे मानले जाते. व्यक्तिमत्त्वाच्या चाचण्या घेऊन हे ओळखता येत असले, तरी त्यासाठी साक्षीभाव ठेवून स्वत:च्या विचार आणि भावना पाहणे गरजेचे असते. स्वत:चे व्यक्तिमत्त्व लक्षात आले आणि त्यानुसार काम निवडता आले, तर काम हेच आनंदाचे साधन होते. मनाची स्थिती, मूड्स हे मेंदूतील रसायनांवर अवलंबून असतात. संमोहन, शिथिलीकरण तंत्रे, कल्पनादर्शन यामुळे मेंदूतील रसायने त्या वेळी बदलतात, मात्र स्वभावात बदल- म्हणजे मेंदूत रचनात्मक बदल घडण्यासाठी अधिक वेळ सजगतेचा सराव आवश्यक असतो.

yashwel@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2020 12:39 am

Web Title: about personality zws 70
Next Stories
1 मनोवेध : वेगळेपणाचा आदर
2 कुतूहल : संगीत.. पक्ष्यांचे!
3 मनोवेध : कुटुंब समुपदेशन
Just Now!
X