अनेकदा परिस्थिती आपल्या मनासारखी नसते. कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, मानसिक अशी कोणतीही परिस्थिती- जशी आपल्याला हवी- तशी नसते. अशा वेळी आपण परिस्थितीशी झगडत राहतो. अशी परिस्थिती असेल, तर काही माणसं सगळा दोष नशिबावर ढकलतात; पण काही माणसं अवघड असलेल्या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतात. खूप झटतात. मेंदूला सतत नकारात्मक भावनांच्या रसायनांमध्ये ठेवलं, तर त्यातून ताणतणाव – सर्व प्रकारे भावनिक असंतुलन – नराश्य – खचलेपण – निद्राविकार – औषधांच्या आहारी जाणं – निर्णयक्षमता संपून जाणं – दिवसा उत्साह न वाटणं – त्यामुळे कामावर परिणाम होणं – नातेसंबंधांवर परिणाम होणं – परिणामी जगण्यातला रस संपून जाणं.. अशा क्रमाक्रमानं माणूस मनानं संपत जातो.  हे टाळायचं असेल, तर अनपेक्षित घटनांचा स्वीकार  करण्याची वृत्ती बाळगायला हवी.

नको असलेल्या परिस्थितीला शक्यतो टाळणं, तिला पुढे पुढे ढकलणं हे फारच सरळसाधे उपाय झाले. या उपायामुळे परिस्थिती बदलत नाही. फक्त ती तशी नाही, याचा आभास निर्माण होतो. हा आभास थोडय़ा काळासाठी आनंद देत असेल, पण आपली सुटका करत नाही.

त्यापेक्षा आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करायला हवा. अशा प्रकारे स्वीकार करणं हे आपल्याला वाटतं तेवढं अवघड नसतं. ही एकदाच ठरवण्याची गोष्ट असते. ते झालं की, सगळे आभास संपतात. समोर फक्त वास्तव परिस्थितीच उरते.

एकदा का परिस्थितीचा स्वीकार करता आला, की त्यातून मार्ग काढणं शक्य होतं. नाही तर परिस्थितीशी मेंदूचा झगडा सतत चालू राहतो. यात मेंदूची खूपच ऊर्जा वाया जाते. नकारात्मक वातावरणात मेंदूला काम करणं, निर्णय घेणं, कार्यवाही करणं जड जातं. मात्र आहे त्या गोष्टींचा स्वीकार केला, की मार्ग काढणं तुलनेनं सोपं जातं.

त्याकडे सापेक्षतेनं बघायला हवं. आधी कधीही बघितलं नाही अशा नजरेनं बघायला हवं. दु:ख, संकटं, भीती यांना टाळता येत नाही; ते आजवर कोणालाही टळलेले नाहीत. पण त्यांना भिडलं, तर ते निघून जाण्याची शक्यता तरी निर्माण होते! – श्रुती पानसे

contact@shrutipanse.com