‘बूटपॉलिश’ (१९५४) या चित्रपटातला मुलांचा आवडता ‘जॉन चाचा’ म्हणजे प्रसिद्ध अभिनेता डेव्हिड हा एक बेने इस्रायली ज्यू होता हे अनेकांना माहीत नसावे. त्यांचे पूर्ण नाव डेव्हिड अब्राहम चेऊलकर! चार दशके हिंदी चित्रपटसृष्टीत एक उत्तम चरित्र अभिनेता अशी ओळख असणारे डेव्हिड यांचा जन्म १९०९ सालचा ठाण्यातला.

मुंबई विद्यापीठातून १९३० साली बीए झाल्यावर डेव्हिड यांनी पुढची सहा वर्षे नोकरी मिळवण्यासाठी धडपड केली. नोकरी मिळाली नाही, पण या काळात त्यांनी वकिलीची परीक्षा दिली. मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना सिनेमा स्टुडिओमध्ये किरकोळ काम करणाऱ्या नायमपल्ली यांच्याशी डेव्हिड यांची मत्री जमली. त्याच्या ओळखीमुळे १९३७ साली डेव्हिडना ‘जम्बो’ या चित्रपटात काही किरकोळ भूमिका मिळाली. १९४१ साली प्रदर्शित झालेला ‘नया संसार’ हा खऱ्या अर्थाने त्यांचा पहिला चित्रपट.

डेव्हिड यांनी एकूण एकशे दहा चित्रपटांत भूमिका केल्या. त्या बहुतेक चरित्र अभिनेत्याच्या. बूटपॉलिश (१९५४), चुपके चुपके (१९७५), सत्यम् शिवम् सुंदरम् (१९७८), गोलमाल (१९७९), बातों बातों में (१९७९), खूबसूरत (१९८०) या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय झाल्या.

‘इप्टा’ (इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन) या नाटय़- सांस्कृतिक संस्थेशी निगडित असलेल्या डेव्हिड यांनी के. ए. अब्बास यांच्या ‘शहर और सपना’, ‘चार दिल चार राहें’ आदी चित्रपटांतूनही कामे केली. १९५९ ते १९७५ या काळात उत्तम सूत्रसंचालक म्हणून त्यांची प्रसिद्धी झाली. अनेक महत्त्वाच्या पुरस्कार वितरण, प्रकाशन, उद्घाटनाच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन त्यांनी केले.

डेव्हिड क्रीडाप्रेमी होते, त्यामुळे ऑलिम्पिक खेळाडूंसह भारतीय समूहात त्यांचीही निवड एकदा झाली होती. त्यांच्या अभिनयगुणांसाठी भारत सरकारने १९६९ साली ‘पद्मश्री’ने त्यांचा बहुमान केला. आयुष्यभर अविवाहित राहिलेल्या डेव्हिड यांचा मृत्यू टोरांटो येथे त्यांच्या पुतण्याच्या घरी १९८१ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने झाला.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com