News Flash

नादिरा

नादिरा ही अभिनेत्री मूळची बगदादी ज्यू होती.

‘मुड मुड के ना देख गर्ल’ या नावाने हिंदी चित्रपटसृष्टीत ओळखली जाणारी नादिरा ही अभिनेत्री मूळची बगदादी ज्यू होती. १९३२ साली बगदादमध्ये जन्म झालेल्या नादिराचे पूर्ण नाव  फ्लोरेन्स इझिकेल नादिरा. अरेबिकमध्ये नादिरा या शब्दाचा अर्थ होतो दुर्मीळ आणि अनमोल. लहानपणी आईवडिलांबरोबर भारतात आलेली नादिरा ही प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक मेहबूब खान यांची पत्नी सरदार बेगम हिची मत्रीण. या मत्रिणीनेच नादिराला १९५२ साली प्रदर्शित झालेल्या ‘आन’ मध्ये काम दिले.

त्या काळात भारतीय हिंदू स्त्रिया चित्रपटांत काम करीत नसत. फक्त अँग्लो इंडियन, ज्यू, पारशी समाजाच्या स्त्रिया हे काम स्वीकारत. ‘आन’ मधील तिच्या राजपूत राजकुमारीच्या भूमिकेने पुढे तिला चित्रपटांतून भराभर कामे मिळू लागली. तिची युरोपियन चेहेरेपट्टी आणि पाश्चिमात्य व्यक्तिमत्त्वामुळे तिला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये कामे मिळाली. नादिराने एकूण ६३ चित्रपटांत कामे केली. १९५० ते १९६० चे दशक हा नादिराचा सुवर्णकाळ होता. आन (१९५२), श्री ४२० (१९५५), पाकिझा (१९७२), ज्यूली (१९७५) हे तिचे गाजलेले चित्रपट. आन हा तिचा पहिला तर मन्सूर खान निर्मित २००० साली प्रदर्शित ‘जोश’ हा अखेरचा चित्रपट. श्री ४२० मधील ‘मुड मुड के ना देख मुड मुड के’ या तिच्या तोंडी असलेल्या गाण्याने आणि तिच्या अभिनयाने तिला एका उंचीवर नेले. या सिनेमातल्या तिच्या अविस्मरणीय भूमिकेने नादिरा एक दंतकथा बनली. हॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माते सेसिल बी डिमेलोंनीही तिच्या कलागुणांचे कौतुक केलंय.

ज्यूलीमधील नादिराने साकारलेल्या भूमिकेला त्या वर्षीचे सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. रोल्स राइस गाडी विकत घेणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री! तिने दोन वेळा विवाह केले; पण ते काही फार काळ टिकले नाहीत. पेडर रोडवर एका टुमदार निवासस्थानात तिच्या दोन भावांबरोबर ती राहत असे. पण तिच्या अखेरच्या दिवसात ते भाऊ परदेशात स्थायिक झाले. २००६ साली वयाच्या ७४ व्या वर्षी दीर्घकालीन आजारामुळे भाटिया इस्पितळात तिचा मृत्यू झाला.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2018 3:39 am

Web Title: actress nadira
Next Stories
1 कार्ल विल्यम शील
2 कुतूहल : क्लोरिन – शाप की वरदान
3 जे आले ते रमले.. : ‘जॉन चाचा’ – अभिनेता डेव्हिड
Just Now!
X