News Flash

कुतूहल : आदर्श गणिताचार्य महावीर

भूमितीश्रेढीसंबंधी (जॉमेट्रिक प्रोग्रेशन) सर्व सूत्रे त्यांनी दिली आहेत.

मध्ययुगीन भारतीय गणिती फारशी वैयक्तिक माहिती आपल्या ग्रंथात देत नाहीत. याच परंपरेतील एक थोर व कळीचे गणिती महावीराचार्य! त्यांनी आपल्या ‘गणितसारसंग्रह’ या ग्रंथात अमोघवर्ष राजाचे गुणगान केले आहे, त्यावरून अनुमान करता येते की ते नवव्या शतकात दक्षिण भारतातील कर्नाटक प्रांतात अमोघवर्ष या सम्राटाच्या काळात होऊन गेले असावेत. ग्रंथात वर्धमान महावीरांना व अन्य जैन आचार्यांना वंदन केलेले आहे, त्यावरून ते जैनधर्मीय असावेत. महावीराचार्यांचे वैशिष्ट्य हे की, केवळ गणिताला वाहिलेला ‘गणितसारसंग्रह’ हा ग्रंथ लिहून त्यांनी तत्कालीन भारतीय गणिताला खगोलशास्त्रापासून स्वतंत्र केले. दक्षिण भारतातील संस्कृत पंडित एम. रंगाचार्य यांनी ताडपत्रांवरील पाच हस्तलिखितांच्या आधारे १९१२ मध्ये मूळ संस्कृत पद्ये, त्यांचे इंग्लिशमध्ये भाषांतर, आवश्यक स्पष्टीकरणे, परिशिष्टे यांसह हा ग्रंथ जगासमोर आणला.

महावीराचार्यांनी त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या गणितज्ञांनी मांडलेले सिद्धांत सुधारले, त्यांचा विस्तार केला व त्यांवर आधारित अनेक उदाहरणे तयार केली. गणितसारसंग्रहाची मांडणी पद्धतशीर आहे. सोप्याकडून कठीणाकडे अशी प्रकरणांची रचना आहे. अपूर्णांकांच्या आकडेमोडीत ‘निरुद्ध’ हा शब्द योजून लघुतम साधारण विभाज्य म्हणजे ल. सा. वि. ही संकल्पना मांडणारे महावीराचार्य हे पहिले भारतीय गणिती! एकक अपूर्णांक म्हणजेच अंशस्थानी १ असलेले अपूर्णांक त्यांनी विस्ताराने विशद केले. १ ही संख्या एकक अपूर्णांकांच्या बेरजेने मिळविण्याचे त्यांचे सूत्र पुढीलप्रमाणे आहे. १ = १/२+१/३+१/३२+१/३३ +… +१/३(न -२)+१/[२प्३(न – २)] येथे न = ५ घेतल्यास, १= १/२+१/३+१/९+१/२७+१/५४. बीजगणितातील काही विस्तारसूत्रेही त्यांनी दिली. उदाहरणार्थ, १) अ३= अ+३अ+५अ+७अ+…अ पदांपर्यंत. २) अ३ = अ२+(अ – १) प्(१ + ३ + ५ + ७+… अ पदांपर्यंत)

व्यवस्थित दिलेल्या व्याख्या व वर्गीकरण ही त्यांच्या भूमितीची वैशिष्ट्ये. त्रिकोणाची परिमिती व क्षेत्रफळ यांवरून त्याच्या आंतरवर्तुळाची त्रिज्या काढण्याचे सूत्र त्यांनी दिले आहे. भूमितीश्रेढीसंबंधी (जॉमेट्रिक प्रोग्रेशन) सर्व सूत्रे त्यांनी दिली आहेत. ग्रंथात व्याजआकारणी, सोन्याची शुद्धता, वस्तूंची खरेदी-विक्री असे व्यावहारिक विषय प्रामुख्याने येतात. व्यापारासाठी व यात्रेसाठी प्रवास करणारे जैनधर्मीय लोक या उदाहरणांमध्ये विशेषत्वाने आढळतात. महावीराचार्यांनी उत्तम गणिती होण्यासाठी आठ गुण सांगितले आहेत. ते असे : वेगाने प्रश्न सोडवण्याची क्षमता, योजलेल्या पद्धतीने योग्य निष्कर्ष मिळेल याचा अंदाज, चुकीचा निष्कर्ष मिळेल का याचा अंदाज, आळस नसणे, उत्तम आकलनशक्ती, स्मरणशक्ती, नवीन पद्धती शोधण्याची क्षमता आणि इष्ट उत्तर मिळेल अशी योग्य संख्या सुचणे. मग हे आठ गुण जोपासणार ना तुम्ही? –  डॉ. मेधा लिमये

 

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : www.mavipa.org    

ईमेल : office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2021 12:07 am

Web Title: adarsh ganitacharya mahavira akp 94
Next Stories
1 नवदेशांचा उदयास्त : बेल्जियन काँगो
2 कुतूहल : गणकचक्रचूडामणी ब्रह्मगुप्त
3 कुतूहल : खगोलज्ञ गणिती आर्यभट
Just Now!
X