केरळच्या मलबार किनारपट्टीवर डच ईस्ट इंडिया कंपनीच्या मसाल्याच्या पदार्थाच्या व्यापाराचे बस्तान चांगले बसले असताना त्रावणकोरच्या राजा मरतड वर्माने त्यांच्या व्यापारावर बंदी घातली. त्यामुळे त्रावणकोर राज्य आणि डच कंपनीत वितुष्ट येऊन एकमेकांच्या फौजांमध्ये चकमकी झडू लागल्या. या गोष्टीचा एकदा सोक्षमोक्ष लावण्यासाठी डच कंपनीने डी लॅनॉयच्या नेतृत्वाखाली आपले नौदल आणि लष्कर त्रावणकोरकडे पाठविले. १७४१ मध्ये डी लॅनॉयचे आरमार आणि सैनिक मलबारच्या किनाऱ्याजवळ कोलाशेल येथील एका जुन्या किल्ल्यात येऊन मरतड वर्माशी युद्ध करण्याच्या तयारीला लागले. या गोष्टीची कुणकुण मरतड वर्माला लागलेली होतीच आणि तोही त्यांच्याशी दोन हात करायच्या तयारीत होताच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१७४१ च्या अखेरीस कोलाशेल येथे युद्धाला तोंड फुटले. सुरुवातीला सरशी डच कंपनीच्या फौजेचीच होती. परंतु डी लॅनॉयच्या किल्ल्यातील अन्नधान्याच्या साठय़ापैकी तांदळाच्या साठय़ावरच शत्रूच्या स्फोटकाचा उद्रेक होऊन भडका उडाला आणि सर्व धान्य उद्ध्वस्त झाले. तरीही अन्न पोटात नसताना डी लॅनॉयनी उपाशी सनिकांसमवेत दोन आठवडे लढत दिली आणि अखेरीस समर्पण केले. मरतड वर्माने डी लॅनॉय आणि इतर साठ सनिकांना पकडून तिरुवनंथपूरम-नागरकोईल रस्त्यावरील उदयगिरी या त्याच्या जुन्या किल्ल्यात बंदिवासात ठेवले. पुढे चाणाक्ष मरतड वर्माने लॅनॉयला मुक्त करून राज्याच्या दर्यासारंगपदी नियुक्त केले आणि आपले नौदल आणि लष्कराचेही आधुनिकीकरण करून घेतले.

मरतड वर्माने लॅनॉयच्या मार्गदर्शनाखाली पडीक झालेल्या उदयगिरीच्या किल्ल्याच्या दुरुस्त्या करून तिथे आपल्या सन्याला युरोपीय पद्धतीचे लष्करी शिक्षण देऊन आधुनिकीकरण करून तोफा आणि दारूगोळा तयार करण्याचा कारखाना सुरू केला. यामुळे प्रबळ बनलेल्या सन्याच्या जोरावर मरतड वर्माने सर्व लढाया जिंकून उत्तरेस कोचिनपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत राज्यविस्तार केला, डच कंपनीचे केरळातून पूर्ण उच्चाटन केले. लॅनॉयने सहा नवीन किल्ले आणि तटबंदी बांधून त्रावणकोर राज्य अधिक सुरक्षित केले. एका िहदू स्त्रीशी लग्न करून तो उदयगिरीतच स्थायिक झाला, ३७ वर्षे केरळमध्ये राहून तिथेच १७७७ मध्ये त्याचा मृत्यू झाला.

सुनीत पोतनीस –sunitpotnis@rediffmail.com

 

 

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Admiral de lenoy article
First published on: 11-09-2018 at 00:35 IST