अ‍ॅडमिरल ऑस्कर डॉसन हे भारतीय नौदलाचे चार तारांकन मिळवलेले म्हणजेच ‘फोर स्टार’ अ‍ॅडमिरल होते. १९८२ ते १९८४ या काळात त्यांनी नौदलप्रमुख म्हणून काम पाहिले. १९७१ साली झालेल्या भारत-पाक युद्धात त्यांनी डायरेक्टर ऑफ नेव्हल ऑपरेशन्स म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती.

ऑस्कर यांचा जन्म १९२३ सालचा, आलिव्हा डॉसन आणि ई. एस. डॉसन हे अँग्लो इंडियन दांपत्य त्यांचे आईवडील. ऑस्करचा जन्म ब्रह्मदेश वा ब्रिटिशकालीन ‘बर्मा’मधला (आताचा म्यानमार). जपानच्या बर्मा-आक्रमणावेळी डॉसन कुटुंब तामिळनाडूत नागरकोईल येथे येऊन स्थायिक झाले. ऑस्करचे शिक्षण स्कॉट ख्रिश्चन कॉलेजमध्ये झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते रॉयल इंडियन नेव्हीत दाखल झाले. १९४३ साली त्यांना रॉयल नेव्हीत कमिशन मिळाले. त्यानंतर ते रॉयल इंडियन नेव्हीतर्फे इंग्लंडमध्ये नॅव्हिगेशन/दिशादर्शनाचे उच्च शिक्षण घेऊन आले. दुसऱ्या महायुद्धात १९४४-४५ या काळात बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात गस्त घालण्याची कामगिरी करणाऱ्या पथकात ते होते.

त्यांच्या भारतीय नौदलाच्या कारकीर्दीत त्यांनी ‘आय.एन.एस. विक्रांत’चे नॅव्हिगेटिंग ऑफिसर, ‘आय.एन.एस. तलवार’चे कमांडिंग ऑफिसर, ‘आय.एन.एस.निलगिरी’चे कमांडिंग ऑफिसर, कोचीन जवळील टॅक्टिकल स्कूलचे संचालक आणि चीफ स्टाफ ऑफिसर इत्यादी पदांवर काम केले. १९७१च्या भारत-पाक युद्धात ऑस्कर डायरेक्टर ऑफ नेव्हल ऑपरेशन्स या पदावर होते. या युद्धात गाजलेल्या ऑपरेशन ट्रायडंट, ऑपरेशन पायथॉन या मोहिमांमध्ये ऑस्कर यांचे योगदान महत्त्वाचे होते. युद्धानंतर त्यांना भारत सरकारने अतिविशिष्ट सेवापदक देऊन त्यांचा बहुमान केला. १९८१ साली भारत सरकारने त्यांना परम विशिष्ट सेवा पदक देऊन गौरविले. १९८२ साली त्यांना नौदलातील अ‍ॅडमिरल या सर्वोच्चपदी बढती मिळाली. १९८४ साली भारतीय नौदलाच्या सेवेतून ते निवृत्त झाल्यावर सरकारने १९८५ ते १९८७ त्यांची नियुक्ती न्यूझीलंडमधील भारतीय उच्चायुक्तपदी केली.

एक उत्तम पियानोवादक म्हणूनही ओळखले जाणारे ऑस्कर डॉसन अविवाहित होते. वयाच्या ८७ व्या वर्षी, २०११ मध्ये बेंगळूरु येथे त्यांचे निधन झाले.

sunitpotnis@rediffmail.com