‘३२-ग’च्या जमिनी : कूळ कायद्यान्वये ज्या जमिनी कुळांच्या मालकीच्या झालेल्या आहेत, त्या जमिनींना ‘३२-ग’ च्या जमिनी म्हणतात. एक एप्रिल १९५७ पूर्वी जी जमीन कूळ स्वत: कसत होते, त्या कुळास आपोआप खरेदीचे कायदेशीर अधिकार मिळाले. अशा जमिनी कुळांच्या नावे करून देताना सरकारने ठराविक नजराणा घेऊन कुळांनी त्या जमिनीचा वार्षकि शेतसारा सरकारकडे भरण्याचे बंधन घातले. सरकारने या कुळांना सनद देऊन मालकीहक्क प्रदान केलेले आहेत.
अशा भूधारकांना म्हणजेच कुळांना जरी तो ताबेदार असला तरी ठरलेला नजराणा भरलेला आहे, नियमित शेतसारा सरकारजमा केला आहे असे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळाल्याशिवाय शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय ‘३२-ग’ च्या जमिनी विकता येत नाहीत. जमिनीवर नजराण्याचा अथवा शेतसाऱ्याचा बोजा असेल तर सातबाराच्या उताऱ्यावर इतर हक्कांत त्यांची नोंद केलेली असते. तसेच सत्ता प्रकारात ‘३२-ग’ असा उल्लेख केलेला असतो.
सरकारी मालकीच्या जमिनी : खासगी मालकीहक्काच्या जमिनी सोडून उरलेल्या जमिनी, घोषित वने, समुद्राच्या, खाडीच्या, नदीच्या, ओढय़ाच्या, नाल्याच्या, सरोवराच्या तळाची जमीन सरकारी मालकीची असते. त्यात मळई जमीन ( किंवा मळी जमीन : नदी, नाले, ओढा यांच्या काठावर असलेल्या जमिनी, पावसाने अथवा पाण्याचा प्रवाह बदलण्याने गाळामुळे तयार होणारी जमीन) सुद्धा समाविष्ट असते. राज्य सरकार अशा जमिनी समाजकार्यासाठी विविध संस्थांना अथवा व्यक्तींना ठराविक अटींवर प्रदान करू शकते.
सरकारी मालकीच्या जमिनी खालील प्रकारच्या असतात :
इनामी जमीन : फार पूर्वी धार्मिक संस्था, धर्मादाय संस्था, मंदिरे अथवा एखाद्या प्रसिद्ध अथवा नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तीस जमिनीतून मिळणारे उत्पन्न ठराविक विधायक कार्यासाठी अथवा सार्वजनिक कामासाठी खर्च करावे लागेल, या अटीवर सरकारने प्रदान केलेल्या जमिनी इनाम जमिनी, वतनी जमिनी म्हणून ओळखल्या जातात. अशा संस्थांना अथवा व्यक्तींना अशा जमिनी सरकारची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय विकता येत नाहीत. कायद्याने असे सत्ताप्रकार रद्द झाल्याने पूर्वापार चालत आलेल्या फार थोडय़ा इनामी अथवा वतनी जमिनी सध्या अस्तित्वात आहेत.
– भरत कुलकर्णी (पुणे) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..-  संस्कृत
गणितात गणंग, संगीतात गती नाही आणि संस्कृतसाठी मति अपुरी असा मी. तरीही हे विश्व मिटून पुन्हा होईल तेव्हा गणित असेल. त्या विश्वाच्या निसर्गात संगीत उमटेल आणि जर पृथ्वी परत अवतरली तर मानवी मनबुद्धीची संस्कृत नावाची उत्तम देण जन्मूदे असा विचार मनात येतो. संस्कृत अवघडच. सुटय़ा शब्दांची फेक करत वक्तृत्व स्पर्धा जिंकणाऱ्या मला ह्या भाषेतल्या असंख्य जोड शब्दांनी किंबहुना जोड शब्दांच्या समासांनी एकाच शब्दाच्या अनेक अर्थानी आणि वर रविन मुंबईत राहतो हे वाक्य ‘राहतो मुंबईत रविन’ किंवा ‘मुंबईत रविन राहतो’ अशा फेरफारामुळे संस्कृतने थोपवले. डोळे मिटून संस्कृत मंत्रघोष ऐकण्यासारखे किंवा आकाशवाणीवरून उर्दू ऐकण्यासारखे सुख नाही. (उर्दूचा उल्लेख मुद्दामच. माझी Secular प्रतिमा उजळण्यासाठी).
 संस्कृत माझ्या मायमराठीची आई म्हणजे आजी. आई कुब्जा असली तरी तिच्या डोळ्यातले प्रेम जसे सरळ असते या ओवीप्रमाणे सरळपणे आपले कर्म करावे अशी ओवी आहे, त्या धर्तीवर ही क्लिष्ट (होय क्लिष्टच) भाषा माझ्या नव्हे, अनेक भाषांची जननी आहे. हिने विज्ञान आणि ज्ञान, परंपरा आणि प्रगती, गद्य आणि काव्य, व्याकरण आणि छंद, नीती आणि कायदा ह्य़ांना सामावून घेत दोन तीन हजार वर्षांच्या संस्कृतीला पोसले, त्या भाषेचा दुस्वास तरी कसा करावा? परंतु काही लोक करतात आणि ही पुरुषप्रधान ब्राह्मण संस्कृतीची प्रतिनिधी आहे असे म्हणतात. शेवटी संस्कृतात लिहिले. माणसानेच. तोच सुसंस्कृत नसेल तर भाषेचे काय चुकले?
प्रादेशिक भाषेचा अभिमान असावाच, मलाही आहे. तामिळ संस्कृतपेक्षा जुनी आहे, निराळी आहे हे शतश: कबूल; पण मग एकीला पाडून दुसरीची उंची वाढणार आहे का? त्या प्रदेशात आलटून पालटून निवडून येणाऱ्या पुढाऱ्यांपैकी एकाचे नाव करुणानिधी आणि दुसरीचे जयललिता. दोन्ही नावे संस्कृत आहेत. आटोपशीर रचना आणि महाकाय आवाका असलेली संस्कृतसारखी दुसरी भाषा नसावी. योजक: तंत्र दुर्लभ: आणि वक्ता दशसहस्त्रेषु ह्य़ा शेवटच्या ओळी वाचून त्या चारपाच ओळीच्या सुभाषितांचा अर्थ लागेल अशा ताकदीची ही भाषा आणि स्त्रियांना संस्कृतने वगळले हा दोष भाषेचा नाही समाजाचा आहे आणि तोही खोटा आहे. संस्कृतमध्ये एक दुसरीला म्हणते, काय गप्पा मारतेस की प्रणयाच्या वेळेला तुम्ही गप्पागोष्टी करता? त्याचा हात माझ्या वस्त्राला लागताक्षणी माझे भानच मुळी हरपते. एक विवाहित स्त्री नववधूला सांगते. नाजूकपणाचा आव आणू नकोस, अगं भुंगा बसला म्हणून आंब्याचा मोहर तुटतो का?
स्त्रियांनी संस्कृतमध्ये लक्ष घातले तर ते आणखीन वस्तुनिष्ठ आणि सुंदर होऊ शकेल.‘शीला की जवानी’पेक्षा हे जास्त सरस.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना

वॉर अँड पीस – कॅलशियम, व्हिटॅमिन कमतरता
आजमितीला भारतात विविध वनस्पतीशास्त्रज्ञांनी नोंद केलेल्या वनस्पतींच्या किमान ऐंशी हजार जाती-प्रजाती आहेत. त्यात किमान एक हजार औषधी उपयोगाकरिता वापरल्या जाणाऱ्या बहुमोली बहुगुणी औषधी वनस्पतींचा समावेश आहे. जीवनाला अत्यावश्यक असणाऱ्या विविध धान्ये, कडधान्ये, फळे, भाजीपाला, फळभाज्या, मसाल्याचे पदार्थ यांचा समावेश आहे.
जसजशी तथाकथित मानवी संस्कृतीची प्रगती होत आहे, उत्क्रांतीकडून सुखी, अतीसुखी संस्कृतीकडे वाटचाल होत आलेली आहे, तसतशी गरीब-श्रीमंतांपासून शहरी ग्रामीण राहणीमध्ये जमीन अस्मानाचे बदल घडत आहेत.
एक काळ आयुर्वेदीय तत्त्वज्ञानाप्रमाणे वाताचे ऐंशी, पित्ताचे चाळीस, कफाचे वीस असे ढोबळमानाने रोगांचे एकशेचाळीस प्रकार सांगितले गेले. आता तुमच्या-आमच्या सर्वाच्या जीवनात, बालगोपाल स्त्री-पुरुष, म्हातारे कोतारे, दमदार तरुण-तरुणींच्या जीवनात नवनवीन रोगांचे आक्रमण होत आहे. पुण्यात, मुंबईत माझ्यापेक्षा दीर्घकाळ हजारो रुग्णांना चोख वैद्यकीय सेवा दिलेले अनेकानेक थोर वैद्यकीय तज्ज्ञ आहेत. आम्हा छोटय़ा मजदूर वैद्यांचे सोडा पण या थोर डॉक्टरांनीही त्यांच्या वैद्यकीय शिक्षणात एचआयव्ही एड्स, पीसीओडी, आयबीएस अशा विविध टरमिनॉलॉजीचे शब्द ऐकले होते का?
आता खेडोपाडीच्या अशिक्षित महिला, शेतकामगार, शहरातील झोपडपट्टीतील, हातावर पोट असणारे स्वयंरोजगारवाले बडय़ाबडय़ा फायली घेऊन येतात. ‘डॉक्टरांनी कॅल्शियम, बी.अे.डी. अशा विविध व्हिटॅमिनची कमतरता सांगितली आहे.’ मंडळी रंगीबेरंगी गोळ्या दाखवतात.. ‘ गुण नाही काय करू?’
दूध, पालेभाज्या, विविध फळे, कडधान्यांची टरफले यात भरपूर कॅल्शियम, व्हिटॅमिन असतात. ती चटकन शरीर स्वीकारते. चंद्रप्रभा, शृंग, शंख, शिंपा, कवडी, मोती, प्रवाळयुक्त औषधे घ्या. कॅल्शियम, व्हिटॅमिन समस्यांवर मात करा. जय आयुर्वेद!
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत   – २४ ऑक्टोबर
१८६८> औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार तसेच व्यायामविषयक पुस्तकांचे कर्ते भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांचा जन्म. ‘कीर्तनसमनहार’ या पुस्तकात त्यांनी १४ पौराणिक व १४ ऐतिहासिक आख्याने संग्रहित केली. सचित्र आहार, चिकित्साशिक्षक, सचित्र नेत्रबल संवर्धन आदी पुस्तकेही त्यांनी लिहिली होती.
१८९० > वैद्यकीय ग्रंथांचे लेखक व निष्णात शल्यचिकित्सक (सर्जन) डॉ. गोपाल शिवराम लागवणकर यांचे निधन. मराठीत ‘शस्त्रवैद्यक’ आणि ‘न्यायवैद्यक’ ही पुस्तके त्यांनी लिहिली, तसेच ‘दंभहारक’ या टोपण नावाने अनेक लेख लिहिले.
१८९८ > ‘हिंदुस्थानचा सांपत्तिक इतिहास’ तसेच अन्य महाविद्यालयीन पुस्तकांचे कर्ते रामचंद्र विनायक ओतुरकर यांचा जन्म.
१९९२> ख्यातनाम कथाकार अरविंद विष्णू गोखले यांचे निधन. नजराणा, माहेर, व्रती, नकोशी आदी २५ कथासंग्रह, ‘माणूस आणि कळस’ हे चित्रीकरण वा तालीमकाळात घडणाऱ्या नाटय़ाचा वेध घेणारे पुस्तक, पाकिस्तानी-बांग्लादेशी कथाकारांचे अनुवाद, कथा कशी घडते याचा शोध घेऊन अनेक मराठी लेखकांबद्दल लिहिलेल्या कथा अशा कथेच्या अनेक वाटा अरविंद गोखल्यांनी धुंडाळल्या.. ‘परमनप्रवेशाची किमया’ त्यांना साधली होती!
– संजय वझरेकर