सतत येणाऱ्या खोकल्यामुळे व फुफ्फुसावर आलेल्या किटणामुळे शरीराला कमी प्राणवायू मिळतो. शरीर खंगत जाऊन मृत्यू येतो. या धूलिकणांमुळे शरीरावर खाज सुटते. त्वचारोग होतो. काही ठिकाणी ओलसर धान्यांवर बुरशी वाढते. परिणामी खोकला होऊन थुंकीवाटे ही बुरशी बाहेर पडते. धान्यावरील बुरशी, शेतात पडलेल्या कचऱ्यावरची बुरशी ज्ञासावाटे फुफ्फुसात जाते. तिथून वायुकोषात जाऊन दाह निर्माण करते. या दाहामुळे निर्माण झालेल्या स्थितीला ‘फार्मर्स लंग्ज’ म्हणतात. असेच कण कौलारू घरांवर टाकलेल्या वाळलेल्या गवतातून सारखे पडत व पसरत असतात.
कापणी केल्यावर धान्य तसेच शेतात टाकले तर जमिनीच्या ओलीमुळे त्याला चटकन बुरशी लागते व ती वाळवल्यावर नंतरची प्रक्रिया करताना ही बुरशी सूक्ष्म कणरूपात हवेत उडून फुफ्फुसात जाऊन वायुकोष दाह निर्माण होतो. हा दाह सातत्याने होत राहिल्यास वायुकोषांतील नेहमीच्या निरोगी पेशींची जागा दोरखंडासारख्या बिनउपयोगाच्या पेशी घेतात. कमकुवत वायुकोषांमुळे फुफ्फुसाची क्षमता कमी होते व दम लागतो. कालांतराने फुफ्फुसाचा बराचसा भाग निरुपयोगी होऊन अकार्यक्षम होतो. त्याचे परिणाम शरीरावर सर्वत्र होतात व अकाली मृत्यू येतो.
 तंतू, धूळ फुफ्फुसात जाऊ नयेत म्हणून अशा ठिकाणी काम करताना नाकावर व तोंडावर मलमलसारखे एक पातळ फडके बांधावे. चार बाय चार इंच आकाराचे फडके घेऊन त्याच्या कोपऱ्यांना नाडीची टोके शिवावीत. सुटी टोके कानाच्या व गळ्याच्या मागे बांधावीत. विशेषत: शेतात, धुळीत काम करताना, कापणी, झोडपणी करताना, धान्य चाळताना, साफ करताना, गोदामात काम करताना, रासायनिक द्रव्य हाताळताना याचा खूप उपयोग होतो. कण या कापडात अडकतात. हे कपडे रोज स्वच्छ धुवावेत व वापरावेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सकस आहार खावा. भरपूर पाणी प्यावे. हात स्वच्छ धुवून मगच खाण्यासाठी वापरावेत.
– डॉ. शशिकांत प्रधान,  मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी.. – आधुनिक
पूर्वी, फार पूर्वी मी लहान होतो, तेव्हा तुझे नाव काय विचारल्यावर स्वत:च्याच तंद्रीत असलेल्या ‘मी’ने फक्त माझेच नाव सांगितले, तर ‘नीट उभा राहा आणि सबंध नाव सांग’ असे सांगितले जाई. वडिलांचे नाव आणि आडनाव सांगितल्यावर ‘शाळा सांग, इयत्ता सांग’ असे यथासांग पार पडत असे.
हल्ली तो जमाना गेला.  हल्ली फक्त स्वत:चे नाव सांगतात. आडनाव,  उपनाम किंवा सरनेम सांगण्याची पद्धत गेली. कारण आडनावावरून जात कळते आणि जात ही गोष्ट हल्ली प्रत्येक गोष्टीला उपयोगी पडत असली तरी ती फक्तो१े भरताना. मौखिक संबंधात जुन्या तऱ्हेने नाव विचारणे हल्ली व्यक्तीवर हल्ला समजला जातो, तसेच एखादे जोडपे मुलाला घेऊन आले तर तुमच्या लग्नाला किती वर्षे झाली, हा वैद्यकीय दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न बिचकून विचारावा लागतो, कारण लग्न झालेलेच असतेच असे नाही. एकटीच स्त्री आली तर तुमचे लग्न झाले का? हा प्रश्न विचारताना खबरदारी घ्यावी लागते, कारण त्याचा आणि माझ्या आजाराचा काय संबंध? असा उपप्रश्न तयार होतो. तुम्ही कोठल्या पुरुषाच्या संबंधात आहात का? असा प्रश्न विचारायला अजून मी धजावलेलो नाही.
लग्न, लैंगिक संबंध आणि त्यातून होणाऱ्या मुलांमधल्या विकृती हा माझा वैज्ञानिक विषय असूनही हे लचांड निर्माण झाले आहे. तुम्ही काय करता, हा प्रश्न अजून पुरुषाला विचारता येतो, पण त्याचे कळेल असे उत्तर मिळेल असे नाही. इन्फोटेक वगैरे शब्द फारच व्यापक असतात. तुम्हाला मेडिकल इन्शुरन्स आहे का? हा प्रश्न अ‍ॅटमबॉम्बसारखा फुटू शकतो. खर्चाची काळजी करू नका, असे उत्तर मिळते तेव्हा डॉक्टर लोक खोऱ्याने पैसा कसा ओढतात याचे उत्तर मिळते.
स्त्रियांना तुम्ही काय करता, हा प्रश्न विचारताना शस्त्रक्रियेनंतर बाळाबरोबर राहणार का याच्याशी संबंधित असतो. पण गृहिणी मी काहीच करीत नाही, असे उदासवाणे उत्तर देतात, तेव्हा उगीचच वाईट वाटते. उलट काही बायका मी माझा स्वत:चा व्यवसाय करते, असे उत्तर देतात, तेव्हा आणखी काही विचारणे अशक्य होते.  एकंदरच जी माहिती मिळाली तर शस्त्रक्रियेनंतरचे व्यवस्थापन करणे सुलभ होते, ती माहिती मिळविणे म्हणजे  ँफालतू चौकशा करणे आणि ती माहिती लपविणे म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य जपणे, असा आजचा जमाना आहे. माहिती इतरत्र सर्वत्र भल्या मोठय़ा प्रमाणात प्रसारित होत असताना जिथे आणि जी पाहिजे ती जर मिळत नसेल आणि त्याचा त्रास होत असेल, तर तुम्ही निष्णात असलात तरी एका अर्थाने कालबाह्य़ झालेले असता.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस – डिमेन्शिया: गांभीर्याने घ्यावयाचा आजार-१
माणसे आपल्या ऑफिसच्या, उद्योगधंद्याच्या, व्यापाराच्या रोजच्या गोष्टी पक्क्य़ा लक्षात ठेवून समर्थपणे काम करत असतात. पण त्याच वेळी भाजी आणायला,लाँड्रीत कपडे टाकायला विसरतात.  गृहलक्ष्मीच्या दृष्टीने हा विसराळूपणा मोठाच अपराध असतो. पण या स्वरूपाच्या किरकोळ विसराळूपणाने संबंधित व्यक्तीचे शारीरिक व मानसिक काहीच नुकसान होत नसते. याच्या पुढची पायरी म्हणजे काहींना अल्प प्रमाणात स्मृतिभ्रंश होतो. नेहमीचा ओळखीचा माणूस समोर आला तर पटकन नाव आठवत नाही. नेहमीचा फोन नंबर किंवा पत्ता सांगता येत नाही. काही वेळा बस वा लोकल ट्रेनमध्ये पर्स, छत्र्या, पिशव्या इत्यादी सामान विसरण्याच्या घटना खूप खूप क्लेश देतात. पण हा विसराळूपणा छोटा स्मृतिभ्रंश आहे. त्याने फार नुकसान होत नाही.
डिमेन्शिया हा विकार एकूण माणसाच्या अस्तित्वासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करणारा; घरातल्या इतर माणसांची जबरदस्त कसोटी पाहणारा मेंदूचा आजार आहे. साठीनंतर या विकाराची सुरुवात चोर पावलाने होते. मेंदूच्या उतींचा/ पेशींचा हळूहळू ऱ्हास होतो. मेंदू सुकतो. एमआरआय केल्यास अ‍ॅट्रोपी असे निदान होते. नेहमीच्या कामात विस्कळीतपणा, कमतरता, वाढत्या चुका होतात. सुरुवातीची लक्षणे दुर्लक्षिली जातात. मग एकदम रोग बळावला की वयस्कर व्यक्तींमध्ये चिडचिडेपणा, नैराश्य, आक्रस्ताळेपणा येतो. त्यांचे स्वत:चेही नुकसान भावनिक व बौद्धिकदृष्टय़ा होत असते. घरातल्या इतरांचीही शांती नष्ट होते. जी मंडळी एके काळी आपल्या कुटुंबातील बायका-मुलांची, नातवंडांची, मित्रमंडळींची खूप खूप काळजी घेत असत. त्यांच्या दृष्टीने आसपासचे जग ‘शून्य’ होते. सगळ्याच प्रश्नांना ‘डिमेन्शियाग्रस्त माणूस’ नकारात्मक उत्तर देतो.  त्याचा स्वत:च्या जगण्यातला आनंद संपतो. मन अत्यंत खिन्न होते. अशा व्यक्तींच्या इतिहासात मद्यपान, धूम्रपान असे व्यसन असल्यास मेंदूतील उती/ पेशी झपाटय़ाने, भूमिती श्रेणीने नष्ट होतात. कारण मेंदूच्या छोटय़ा छोटय़ा केशवाहिन्या बंद पडतात.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत  –  ३० नोव्हेंबर
१८९८> कोशकार, भाषाविषयक लेखक, चरित्रकार, संपादक वासुदेव दामोदर गोखले यांचा जन्म. लेखनाची सुरुवात भाषा विषयाने. प्राथमिक शाळेत मराठी भाषा कशी शिकवावी, मराठी शुद्धलेखन साहाय्यक या पुस्तकांसह भासाच्या नाटकाचे मराठी भाषांतर मधला पाडाव, तसेच स्वराज्यातील गृहांगना यातून ऐतिहासिक स्त्रियांचे चरित्र. हिंदवी स्वातंत्र्याचे जनक अशी चरित्रमाला लिहिली.
१९३५> ख्यातनाम साहित्यिक आनंद रतन यादव यांचा जन्म. अस्सल ग्रामीण जीवन रेखाटण्याच्या ईर्षेने लेखनाला सुरुवात. हिरवे जग हा काव्यसंग्रह, मातीखालची नाती (ललित लेख), खळाळ हा कथासंग्रह प्रसिद्ध. गोतावळा या कादंबरीतून आधुनिकतेमुळे पारंपरिक संस्कृती कशी लोप पावत चालली आहे याचे ‘नारबा’ या मजुराच्या दृष्टिकोनातून चित्रण. ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव, मराठी साहित्य समाज आणि संस्कृती ही पुस्तके लिहिली. झोंबी, नांगरणी, घरभिंती हे आत्मचरित्रात्मक लेखन.
१९४६> होमिओपॅथीवरील पुस्तकाचे लेखक गोपाळ सदाशिव पळसुले यांचे निधन. जीवन रसायन चिकित्साशास्त्र अर्थात बाराक्षार चिकित्सा पद्धती, होमिओपॅथी बालयोग व होमिओपॅथिक चिकित्सा इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध.
– संजय वझरेकर