सोलापूर जिल्ह्यातील अनगर गावातील दादासाहेब बोडके हे एक कर्तबगार शेतकरी. दादा अल्पशिक्षित असले तरी शेतीच्या विद्यापीठात पीएच.डी. शोभतील असे त्यांचे कर्तृत्व आहे. त्यांनी आपल्या शेतीत असंख्य प्रयोग केले. अनेक पिकांची लागवड केली. शेडनेट, पॉलीहाऊस आदी तंत्रे आत्मसात केली. अत्यंत सामान्य स्थितीतल्या या शेतकऱ्याने आपल्या कष्ट व ज्ञानाच्या बळावर पुणे-हैदराबाद रस्त्याला लागून वडवळच्या शिवारात दहा हेक्टर शेती घेऊन ती बारमाही बनवली. त्यांच्या या अद्ययावत शेतात दररोज १५० मजुरांना रोजगार मिळतो. दररोज २०० ते ५०० शेतकरी शेती पाहाण्यासाठी व रोपे घेण्यासाठी भेटी देतात.
दादांनी शेवग्याच्या काही वाणांवर तीन वष्रे अभ्यास करून झाडानुसार शेंगा किती, हंगाम किती, वजन किती या सर्व नोंदी विद्यापीठ संशोधकाप्रमाणे अद्ययावत ठेवल्या. वापरलेल्या सर्व वाणांत पीकेएम-१ हे शेवग्याचे वाण पुढे सर्वश्रेष्ठ ठरले. दादा हे निरीक्षण व अभ्यासातही पुढे असत. तवान पपईच्या बीवर काम करून त्यांनी महाराष्ट्र, गुजरात, झारखंड या राज्यांत त्याचा प्रसार केला. भारतातील हे काम पाहून तवानच्या नोन यू कंपनीने जागतिक पातळीवरचा बी विक्रीचा पुरस्कार बोडके यांना त्यांच्या गावी अनगरला येऊन दिला. दादा बोडके यांच्या रोपवाटिकेची  वार्षकि उलाढाल सध्या दीड कोटी रुपये इतकी आहे.
रोपवाटिका व रोप विक्रीवर जरी त्यांचा भर असला तरी शेती क्षेत्रात ते अनेक नवे प्रयोग करत असतात. भारतभर प्रवास करून विद्यापीठांतील नामांकित, दर्जेदार व प्रसिद्ध वाण ते आणतात आणि सोलापूरच्या हवामानात ते कसे येतात, हे अभ्यासतात. त्यांचे क्रांतिकारक व यशस्वी प्रयोग म्हणजे स्वतंत्र शेवगा शेती, जी राज्यभर गेली २५ वष्रे होत आहे. त्याचे मूळ काम दादांनी केले. बोर कलमी करण्याबरोबर दादांनी ‘चेस्टनट बोर’ नावाची नवी जात आणली व त्याची बाग करून या वाणाची बोरे निर्यात केली. वडवळ फार्मवरील त्यांची द्राक्षांची बाग ही आदर्श द्राक्षबागच आहे.
– शुभदा वक्टे , मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..  – वयोमान
तुम्ही किती जगता हे तुमच्या जनुकांवर ठरते हे सत्य असले तरी अर्ध सत्यही आहे. गेल्या शतकाच्या पूर्वार्धात आणि आधी साथीच्या रोगांचे प्रमाण इतके प्रचंड होते की, खूप टिकाऊ जनुके मान टाकत असत. बदललेल्या जमान्यात आता वयोमानाबद्दलचे जनुकांचे सत्य उघड झाले आहे. त्यातून काही ज्येष्ठ नागरिक मी कसा ठणठणीत आहे, असे म्हणतात आणि जेव्हा त्यातले श्रेय जनुकांना देत नाहीत, तेव्हा त्यांना गर्विष्ठ समजावे. शरीरातल्या व्याधी अनुवंशिकता आणि सवयी यावर ठरते. सर्वात महत्त्वाची आणि चांगली सवय म्हणजे दोन घास कमी खाणे ही आहे. हे दोन घास म्हणजे काय हे प्रत्येकाला कळते, पण वळत नाही. वय वाढते तसे उष्मांक (ूं’१्री२) कमी लागतात. पण आयुष्यात धावपळ कमी असल्यामुळे जेवण हा एक महत्त्वाचा कार्यक्रम ठरतो आणि आपले भावनिक पोषण कमी होत आहे, अशा खोलवर दडलेल्या समजुतीमुळे खाण्यातून ही कमतरता पुरी करण्याची कृती वाढते. कमी खाणारे लोक जास्त जगतात आणि निरोगी असतात हे आता सर्वमान्य आहे. कंटाळा ही गोष्ट म्हातारपणाचे आणखी एक लक्षण. पुरुषांमध्ये जास्त बायकांमध्ये कमी. त्या काहीतरी करीत राहतात. जेवढा अहंकारी पुरुष तेवढा कंटाळा जास्त असतो. कारण पुरुष सत्तेवर पोसले जातात. हतबलता आल्यावर जगाचा द्वेष वाढतो. तेव्हा जे लोक चाळिशीच्या आसपास असतील त्यांनी तयारी सुरू केलेली बरी. काहीतरी नाद आतापासूनच लावून घ्या. नाद या शब्दात आल्हाद देणारी पुनरुक्ती दडलेली आहे. या नादात जग मागे पडते आणि माणूस स्वयंपूर्ण होतो. कंटाळा आणणाऱ्या चार-पाच गोष्टी असतील तर सर्वात कंटाळवाणी गोष्ट आधी करावी. एकदाच करून बघा. असे वाटेल की आपण सगळ्यात उंच डोंगर चढलो आता राहिल्या त्या टेकडय़ा आहेत. आत्मविश्वास वाढतो. तुमचे आयुष्य निराळे आहे हा विचार टाळा. सगळ्यांच्या आयुष्यात अडचणी आलेल्या असतात त्या तुम्हाला माहीत असतात किंवा त्यांच्यावर काय बेतली असेल, असा विचार करा म्हणजे परदु:ख शीतल हा अनुभव घ्या. दुर्दैवी, खडतर, अवघड चरित्र वाचा म्हणजे तुमच्या सुदैवाचा अनुभव येईल.
स्वत:बद्दल कमी बोला, दुसऱ्यांचे ऐका, त्याच्यात समरस व्हा. त्यामुळे तुम्हाला जगात स्थान मिळेल आणि एकलकोंडेपणा कमी होईल. आदल्या रात्रीच उद्याचा कार्यक्रम ठरवा म्हणजे सकाळी उठल्यावर आता काय असे वाटणार नाही. वेळ असेल तर स्वत:चे कपडे धुवा, स्वत:चे ताट उचलून ठेवा, कपबशी विसळून पालथी करा. मधूनमधून कपडय़ांना इस्त्री करा. काही तरी करीत राहा, वाचा, रोजनिशी लिहा. ती दुसऱ्यांना वाचून दाखवू नका. मी माझाच नियम मोडून माझ्या रोजनिशीबद्दल उद्या लिहिणार आहे. आधीच क्षमा मागतो.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस  –  डिमेन्शिया : गांभीर्याने घ्यावयाचा आजार (भाग-२)
डिमेन्शिया या विकाराची तुलना पार्किन्सन्स, अल्झायमर जबरदस्त स्मृतिभ्रंश, म्हातारचळ अशा विकारांशी केली जाते. तुमचा-आमचा सर्वाचा मेंदू आकाराने खूप छोटा असला तरी आपल्या ७०-८० वर्षांच्या आयुष्यातील खूप खूप लहानसहान आठवणी, तपशिलासह, फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये सांगू शकतो. या उलट हाच ‘हेल्दी मेंदू’ दर क्षणाला अनावश्यक अशा लक्षावधी मुद्दय़ांकडे दुर्लक्ष करून एकाच मुद्दय़ावर ठाम राहून सर्वोत्तम बौद्धिक क्षमता दाखवू शकतो. मेंदू सदैव तरुण असतो. तो सहसा गंजत नाही.
डिमेन्शिया या लॅटिन शब्दाचा अर्थ अलग होणे, मनापासून अलग होणे असा आहे. तुमचे-आमचे दागदागिने, बँक बॅलन्स, जमीनजुमला, घरदार, शेती ही खरी संपत्ती नव्हे. मेंदूचे कार्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे. ही संपत्ती कमी झाली की माणसं तास-अर्धा तासापूर्वी घेतलेला चहा-जेवण विसरतात व आसपासच्या मंडळींना दोष देतात. त्यांना काळ, वेळ याचे भान राहात नाही. तारतम्य नसते. इतरांच्या भावनांचा विचार, बौद्धिक क्षमता संपलेली असते. जवळच्या नातलगांनी स्वत:चा संयम न सोडता डिमेन्शियाग्रस्त मंडळींना सांभाळून घ्यायला लागते. अशा रुग्णांना माणसात ठेवून त्यांच्या जीवनातील काही उत्तम कार्याबद्दल सकारात्मक चर्चा करून थोडा आत्मविश्वास निर्माण करायला लागतो. थोडक्यात सांगायचे झाले तर त्यांना युक्तीने घोडय़ावर बसवावे लागते. त्यांना नाकारून, टाळून, त्यांची  निंदानालस्ती करून चारचौघांत पाणउतारा करून चालत नाही. अशा माणसांच्या दैवात असले तर जवळच्यांच्या प्रयत्नवादाच्या मदतीने बौद्धिक क्षमता पूर्णपणे संपलेली माणसे पुन्हा नव्याने सक्षम झालेली उदाहरणे अल्प प्रमाणात का होईना, पण आहेत. ब्राह्मीवटी मोठय़ा प्रमाणात, सारस्वतारिष्ट, ब्राह्मीघृत, सुवर्णमाक्षिकादिवटी, पंचगव्यघृत या औषधांबरोबर अणुतेलाचे नस्य, शिरोबस्ती, शिरोधारा यांचा युक्तीने वापर तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा. क्षमस्व.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – २ डिसेंबर
१८४८> कवी, वेदान्ताचे अभ्यासक आणि मराठी व कन्नड या दोन्ही भाषांतील लेखक खंडो कृष्ण गर्दे यांचा जन्म. विजनपुरी हे यांचे पहिले काव्य. श्रीगीतपंचदशी, गीतामृत-शतपदी या काव्यांसह सार्थ पंचदशी, लघुवासुदेव नमन व ब्रह्मसिद्धांतमाला हे गद्यग्रंथ होय.
 १९०५> आधुनिक कवी, लघुनिबंधकार, कथाकार व पत्रकार अनंत काणेकर यांचा जन्म.  १९३३ मध्ये चांदरात या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन. ‘चित्रा’ आणि ‘आशा’ या साप्ताहिकांचे काही काळ ते संपादक होते.  प्रभातच्या ‘माणूस’ चित्रपटाचे संवादलेखन त्यांनी केले होते. तुटलेले तारे, उघडय़ा खिडक्या हे लघुनिबंधसंग्रह, रुपेरी वाळू हा रूपकथांचा संग्रह, जागत्या छाया, मोरपिसे, दिव्यावरती अंधार आदी  कथासंग्रह, धुक्यातून लाल ताऱ्याकडे, आमची माती आमचे आकाश, निळे डोंगर तांबडी माती ही प्रवासवर्णने गाजली. १९५७ मध्ये औरंगाबाद येथे  भरलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
१९११> कथा-कादंबरीकार, ललित निबंधलेखक अनंत वामन वर्टी यांचा जन्म.  दंतकथा, अखेरचा आघात, गडगडाट आदी १३ कथासंग्रह प्रसिद्ध. अभिनय, नवाधर्म,  यांसारख्या  त्यांच्या कादंबऱ्या वाचकप्रिय ठरल्या.
– संजय वझरेकर