शेतीत काम करणाऱ्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण जास्त आहे. पुष्पाताई मिठारी, बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या अशाच एक महिला शेतकरी. २० वर्षांपूर्वी लग्नानंतर सांगली जिल्ह्य़ातील बुर्ली गावात आल्यानंतर त्यांनी आपल्या पतीसोबत शेती करायला सुरुवात केली. त्यांच्या पाच एकर शेतात ऊस हे मुख्य पीक आहे. अनेक वर्षांपासून उसाचे पीक घेतल्याने त्यांचे एकरी उत्पादन ३० टनांपर्यंत खाली घसरले होते.
उत्पादन वाढविण्यासाठी पुष्पाताईंनी एकाआड एक वर्ष उसाचे पीक घेण्याचा निर्णय घेतला. शेतीला पाण्यासाठी कृष्णा नदीवरून लिफ्ट इरिगेशनची सोय केली. हे पाणी साठवण्यासाठी कृषी विभागाच्या मदतीने तीन लाख लिटर क्षमता असलेलं शेततळं खोदलं. पाण्याची बचत व्हावी म्हणून पुष्पाताईंनी चक्क ठिबक सिंचनाचा वापर करून उसाची शेती करण्यास सुरुवात केली. पाच एकरांवर ठिबकचा संच बसविण्यासाठी पुष्पाताईंना कृषी विभागाने आणि राजारामबापू साखर कारखान्याने अनुदान दिलं. त्यामुळे ठिबकचा वापर सुरू झाल्यापासून खत-पाणी वेळेवर देता आलं. सोयाबीन आणि भुईमुगाचे आंतरपीक घेतलं. परिणामी, उसाचं उत्पादन एकरी ३० टनांवरून ६० टनांपर्यंत वाढलं. याबरोबरच उसाच्या पट्टय़ात कोिथबिरीचे पीक घेतल्याने धन्याचं उत्पादन मिळालं.
शेतीबरोबरच त्यांनी आपल्या परसबागेत शेवगा, भेंडी, गवारी, वांगी, मेथी, कोिथबीर आणि तुरीची लागवड केली आहे. शिवाय पपई, चिक्कू, पेरू, सीताफळ यासारखी फळझाडंही लावली आहेत.
कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी बहुआयामी असायला हवं, असं पुष्पाताई मिठारींचे मत आहे. म्हणूनच शेतीबरोबर त्यांनी गावामध्ये बचत गटाचं अभियानदेखील सुरू केलं आहे. घर आणि शेतीबरोबर पाच वष्रे गावाच्या सरपंचपदाची धुरादेखील त्यांनी सांभाळली आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. येणाऱ्या काळात नव्या पिढीला सुपीक जमीन आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणं ही आपली जबाबदारी आहे, असं  पुष्पाताईंचं म्हणणं आहे. या कामात जास्तीत जास्त महिलांना सामावून घेतल्यास क्रांतिकारक बदल होऊ शकतात, असा त्यांचा विश्वास आहे.
– हेमंत लागवणकर (डोंबिवली) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..  – लेमार्क, डार्विन, लेमेट्रे आणि मेंडेल
डार्विनने पृथ्वीतलावरच्या पशु-पक्ष्यांचे निरीक्षण करीत उत्क्रांतीबद्दल प्रबंध लिहिला; परंतु जमिनीच्या पोटातही उत्क्रांतीच्या खुणा आहेत हे दाखविले लेमार्क आणि इतरांनी.
‘काही उरत नाही’ असे एक उदासवाणे वाक्य आहे, पण नैसर्गिक तऱ्हेने गाडल्या गेलेल्या वनस्पती, प्राणी, कीटक किंवा इतर अगदी लहान जीव जमिनीच्या पोटात खुणा ठेवतात त्यांचे शिक्के किंवा अवशेष मिळतात आणि त्याला जीवाष्मशास्त्र असे नाव आहे. पृथ्वीवरच्या वरच्या थरांची हवापाण्यामुळे धूपही होते आणि गाळ साचल्यामुळे त्याचे थरही तयार होतात. या थरांना वय असते आणि आता तर त्या थरातल्या अणूंवर प्रक्रिया करून त्यांचा काळ निश्चित ठरविता येतो, असे स्पष्ट दिसते की, जितका थर जुना तितकाच जीवाष्म अगदी साधा किंवा कमी गुंतागुंतीचा आढळतो. पुढे निरनिराळे गुंतागुंत असलेले प्राणी आढळतात. काही ठिकाणी माणसाचा पूर्वज असलेले माकड सापडते. अगदी सलग अशी शिडी नेहमी दिसतेच असे नाही, पण मधूनच एखादी नसलेली पायरी मिळतेही आणि मग उत्क्रांती सिद्धांताला बळकटी येते.
 जे जमिनीत खोदून सापडते ते अंतराळात डोकावले तरी दिसते. प्रकाशाचा वेग कितीही असेना का, अंतराळातली अंतरे इतकी प्रचंड आहेत की प्रकाश आपल्या डोळ्यापर्यंत मजल-दरमजल करीत यायला लाखो वर्षे लागतात. मग दुर्बिणीतून काही दृश्ये बघताना आपल्याला लाखो वर्षांपूर्वीचा काळ दिसतो आणि त्या घडामोडीतल्या तारकापुंजातून आपला सूर्य झाला असे अनुमान काढता येते.
तसले अनुमान लेमेट्रे नावाच्या शास्त्रज्ञाने १९२७ साली काढले. तो म्हणाला होता, काहीतरी फुटले आणि त्यातून सर्वत्र काहीतरी भिरकावले गेले तेच आपले विश्व. पृथ्वीच्या पोटात किंवा अंतराळात काळ दडला आहे आणि या काळात अनुक्रमणिका आहे आणि अनुक्रमणिका सिद्ध झाल्यामुळे कोणीतरी एकदमच सगळे सर्व घडविले किंवा आपल्या हातातून ग्रह-तारे फुंकर मारून उडविले असे म्हणणे फोल ठरते.
१८६०, १८७० च्या दरम्यान जेव्हा डार्विनचा सिद्धांत मांडला गेला तेव्हाच मेंडेल नावाच्या मठकऱ्याने (monk) आपल्या अंगणात वाटाण्याच्या निरनिराळ्या जातींच्या संकराचा अभ्यास करून त्यांच्यातल्या जनुकांच्या मिश्रणाचे शास्त्र मांडून वनस्पतीमधल्या बदलांचा शोध लावला तो डार्विनच्या सिद्धांताला पोषकच होता, पण दोघांना एकमेकांचा पत्ता नव्हता आणि शाळेत मेंडेल वनस्पतीशास्त्रात (Botany) नापास झाला होता, अशा गमती आहेत. विज्ञान आणि धर्माबद्दल उद्या.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस –  रसायनप्रयोग : भाग-५
प्राणवह स्रोतसाचे, फुफ्फुसाच्या विकृतीचे रोग वाढत आहेत. सर्दी, पडसे, खोकला, दमा, नाक चोंदणे, नाक वाहणे, सायनोसायटिस अशा विकारांकरिता सर्व चिकित्सक कफघ्न उपचार करत असतात. त्या उपचारांना ‘शत्रुवत चिकित्सा’ असे संबोधले जाते. कफविकारात कफाच्या प्रमुख स्थानी म्हणजे फुफ्फुसातील द्राक्षासारख्या घोसात कफ जमा होऊ नये म्हणून प्राणवायूचे संचरण नीट व्हावे म्हणून अनेकानेक औषधे वापरली जातात. लक्ष्मीनारायण, दमागोळी, ज्वरांकुश, लवंगादी गुग्गुळ, अभ्रकमिश्रण, रजन्यादिवटी, एलादिवटी, नागरादिकषाय, अशा विविध औषधांनी वरील लक्षणे आटोक्यात आल्यावर पुढे ज्वरांकुश, दमागोळी, अभ्रकमिश्रण, एलादिवटी यातील एखादी गोळी व नागरादिकषाय एवढय़ाच औषधांची योजना करून पाहावी. विकार पुन्हा होऊ नयेत म्हणून पुदिना, आले, लसूण, ओली हळद, तुळशीची पाने, मिरेपूड व चांगल्या दर्जाच्या काळ्या मनुका यांचा युक्तीने वापर करून पाहावा. छाती, पाठीला किमान एक वेळ महानारायणतेल जिरवावे. नाकात अणूतेल वा नस्यतेलाचे थेंब सोडावे. तीन-चार लेंडीपिंपळी १ कप दूध व पाणी एकत्र उकळून, आटवून ते दूध सकाळी प्यावे. सूर्यास्ताअगोदर व कमी जेवावे. हे सर्व पथ्यापथ्याचे उपचार रसायनप्रयोग म्हणूनच गणले जातात.
पोट बिघडणे, वारंवार संडासची भावना, संडासला चिकट होणे, अशा रोगलक्षणांनी रुग्ण मंडळी नित्य डॉक्टर, वैद्य यांचा पिच्छा पुरवत असतात. अ‍ॅमिबायसिस, आयबीएस इमिजियेट बॉवेल सिंड्रोम अशा वेगवेगळ्या  नावाने संबोधिल्या जाणाऱ्या तक्रारींवर कुडा, कुचला व बिब्बा ही औषधे युक्तीने अनुक्रमे पित्त, कफ व वात प्रकृतीच्या रुग्णांकरिता फलदायी रसायन उपचार आहेत. कुडा घटकद्रव्य असलेले कुटजारिष्ट, कुटजवटी, कुटजपर्पटी, कुचलायुक्त विषतिन्दुकवटी, बिब्बा असणारी संजीवनीवटी भल्लातकहरीतकी, भल्लातकासव यांची किंवा बिब्ब्याचे शेवते, अपवाद म्हणून अमृतधारेची योजना करावी.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – १५ ऑक्टोबर
१९२६> श्रमाला आणि संघर्षांला प्रतिष्ठा देणारी कविता लिहिणारे कविवर्य नारायण गंगाराम सुर्वे यांचा जन्म. ‘ऐसा गा मी ब्रह्म’, ‘माझे विद्यापीठ’, ‘जाहीरनामा’, ‘सनद’ हे त्यांचे गाजलेले काव्यसंग्रह. पद्मश्री, जनस्थान पुरस्कार, ‘कबीर सम्मान’ हे बहुमान त्यांना मिळालेच आणि अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही (१९९५, परभणी) प्राप्त झाले. ‘डोंगरी शेत माझं गं, मी बेणू किती..’ या लोकप्रिय गीताचे कवी सुर्वेच, पण गाणी त्यांनी फार लिहिली नाहीत. ‘मर्ढेकर’, ‘तुमचंच नाव लिवा मास्तर’, ‘हा माझाही देश आणि त्यातील हे ओकेबोकेसे लोक’, ‘कामगार आहे मी तळपती तलवार आहे’ अशा त्यांच्या अनेक कविता गाजल्या. सुर्वे यांचे गद्यलेखन हे मुख्यत: अनुवादित आहे.
२००२> ‘लोकनाटय़कार’, ग्रामीण कथेला विनोदी बाज देणारे कथाकार, नाटककार आणि पटकथालेखक वसंत सबनीस यांचे निधन. त्यांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘अदपाव सुतार..’ आदी लोकनाटय़ांनी मराठी रसिकांतला शहरी-ग्रामीण भेद मिटवला. गेला माधव कुणीकडे, सौजन्याची ऐशीतैशी, घरोघरी ही बोंब, कार्टी श्रीदेवी ही त्यांची नाटके गाजली. याखेरीज कथासंग्रह, ललित लेखसंग्रह, बालकथा, बालनाटय़ेही त्यांनी लिहिली.
– संजय वझरेकर