News Flash

अलेक्झांड्रियाची क्लिओपात्रा

अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर मॉसीडोनियाचा ग्रीक सेनानी टोलेमी सॉटर हा इजिप्तचा राजा झाला.

प्रसिद्ध क्लिओपात्रा सातवी या प्राचीन इजिप्तच्या राणीची कारकीर्द इ.स.पूर्व ५१ ते इ.स.पूर्व ३० अशी २१ वष्रे झाली. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर मॉसीडोनियाचा ग्रीक सेनानी टोलेमी सॉटर हा इजिप्तचा राजा झाला. त्याच्या टोलेमी घराण्याचे एकूण १२ टोलेमी राज्यकत्रे झाले. बाराव्या टोलेमीची कन्या ही पुढे आपल्या सौंदर्याने आणि कर्तृत्वाने प्रसिद्धी पावलेली क्लिओपात्रा सातवी. या टोलेमी राजघराण्यात वंशशुद्धीसाठी बहीण भावांमध्ये लग्न लावण्याची पद्धत ठेवली होती. ग्रीक शब्द क्लीओस म्हणजे वैभव आणि पॅटर म्हणजे वडील. यातून ‘क्लिओपात्रा’चा अर्थ होतो वडिलांचे वैभव! प्रबळ रोमन साम्राज्यापुढे आपला टिकाव लागणार नाही म्हणून क्लिओपात्राच्या वडलांनी रोमन गव्हर्नर ज्यूलिअस सीझरला मोठी रक्कम देऊन आपल्याला इजिप्तचा राजा म्हणून रोमन साम्राज्याची मान्यता घेतली. त्याच्या मृत्यूनंतर १८ वर्षांची क्लिओपात्रा आणि तिचा दहा वर्षांचा धाकटा भाऊ तेरावा टोलेमी संयुक्तपणे राज्यावर आले. धाकटा भाऊ परंपरेप्रमाणे क्लिओपात्राचा नवराही होता!

धाकटा भाऊ आणि त्याचा एक सरदार यांनी क्लिओपात्राला दूर करून एकटय़ाने राज्य करण्याचे कारस्थान रचले. त्याच काळात रोमन सम्राट ज्यूलिअस सीझर वसुलीसाठी इजिप्तमध्ये आलेला होता. त्याची मदत घेऊन क्लिओपात्राने आपला नवरा ऊर्फ भाऊ याचे कारस्थान आणि अंतर्गत बंडाळी मोडून काढली. पुढे सीझर आणि क्लिओपात्राचे प्रेमसंबंध जुळले आणि त्यांनी लग्न केले. सीझरपासून तिला मुलगा झाला. क्लिओपात्रा काही काळ रोममध्ये राहिली पण रोम शहराबाहेर एका राजवाडय़ात. सिझरच्या मृत्यूनंतर रोमन गव्हर्नर अँटनी याच्याशीही तिचे प्रेमसंबंध जुळले. या दोघांनी मिळून इजिप्त आणि रोमन साम्राज्य एकत्र बांधून राज्य करण्याचा डाव रचला. परंतु ऑक्टेव्हियन उर्फ ऑगस्टस या सीझरच्या पुतण्याने इ.स.पू. ३० मध्ये त्यांचा पराभव केल्यावर त्या दोघांनी आत्महत्या केल्या. क्लिओपात्राने स्वतला सर्पदंश करवून मरण स्वीकारले.

तिच्या सीझर आणि अँटनी यांच्याबरोबर असलेल्या संबंधांबाबत इतिहासकारांचे असे मत आहे की, आपल्या इजिप्तच्या राज्यावर रोमन साम्राज्याची गदा येऊ नये म्हणून तिने हे केले असावे.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

पर्जन्यवनांना शाप

पाणी आणि सूर्यप्रकाश यांच्यामुळे सर्वच जीव पर्जन्यवनात गर्दी करतात. जगण्यासाठी तीव्र चढाओढ चालू असते. दाटीवाटीने वाढणाऱ्या वृक्षांच्या फांद्या शेजारच्या वृक्षांमधून वाट शोधतात, एकमेकांची वाढ खुंटवतात, वृक्षांचा डेरेदारपणा बिघडवतात. फांद्यांचे आकार, डहाळ्यांची वाढ, फुला-फळांचे झुबके यांवर परिणाम करतात.

वन सदाहरित असले तरी झाडांवरील पानांचे आयुष्य वर्षां-दोन वर्षांचेच. पानझडीचा कचरा वनजमिनीवर भरपूर. त्यावर कवके, रंगीबेरंगी आळंबी, कीटक, कृमी, जळवा, बेडूक, सरडे, टोळ, साप, यांचीही गर्दी. रोगराईची सतत भीती – मोठय़ा प्राण्यांना, स्थानिक आदिवासींना.

ईशान्य भारतातील वनात इतक्या प्रकारची ऑर्किड आहेत, तेवढी इतर कोठेही नसतील. कीटक खाऊन जगणारी वनस्पतीही आढळते. सर्वच वनस्पती प्रकारांचे वैविध्य आढळते, परंतु एकाच जातीची संख्या कमी असल्याचे जाणवते. विविध वृक्ष जाती दाटीवाटीने वाढत असताना एकाच जातीचे दोन वृक्ष एकमेकांपासून दूर असणे साहजिकच. एका वृक्षापासून पराग घेऊन जाणारी जंगली मधमाशी त्याच जातीच्या दुसऱ्या वृक्षाकडे जाण्यात इतर जातींच्या अनेक वृक्षांची िभत आडवी येते. त्या जातीच्या वृक्षांच्या जननक्रियेत अडथळा येतो, त्यांची संख्या कमीच राहते. परिणामी, कोणत्याही कारणाने वनाचा एक भाग नाहीसा झाला तर काही वृक्षजाती नष्ट होण्याची भीती उद्भवते. ब्राझील, कोंगो येथे खाणकामामुळे ही समस्या भेडसावत आहे. केरळातील ‘सायलेंट व्हॅली’ वनात धरण-प्रकल्पाच्या वेळी हा प्रश्न चच्रेत आला होता.

जमिनीवर साचलेला पालापाचोळा कुजून पोषक द्रव्ये वनजमिनीच्या ओल्या पृष्ठावर साचतात, वाढणाऱ्या झाडांच्या मुळांना लगेच उपलब्ध होतात. त्यामुळे मुळे जमिनीत खोलवर जाण्याची जरुरी नाही. ३० ते ५० मीटर उंचीच्या वृक्षाची मुळे जमिनीत जेमतेम १ ते १.५ मीटरच खोल असल्याने उंच वृक्षांना स्थर्य देऊ शकत नाहीत. वादळी हवेत उथळ मुळे असलेले उंच वृक्ष उन्मळून पडताना शेजारच्या अनेक वृक्षांना पाडतात; वनात अचानक उघडय़ा जागा तयार होतात. पावसाच्या माऱ्यामुळे जमिनीची धूप होते, पोषक द्रव्ये वाहून जातात, निकस जमीन मागे राहते. वनाचे पुनरुज्जीवन अशक्य होते.

जीव-वैविध्य जपणे आणि ऑक्सिजन निर्मितीचा महत्त्वाचा स्रोत टिकवणे यासाठी ही वने महत्त्वाची आहेत.

प्रा. शरद चाफेकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 2:20 am

Web Title: alexandria cleopatra
Next Stories
1 आजचे अलेक्झांड्रिया
2 डॉ. त्रिलोक नाथ खोशू
3 झेंडू
Just Now!
X