डॉ. श्रुती पानसे  contact@shrutipanse.com

बुद्धी मोजण्यासाठी जी चाचणी करतात त्याला सोप्या भाषेत आपण आय.क्यू. टेस्ट म्हणतो. इंग्रजीतला शब्द आहे- इंटेलिजन्स कोशंट. अल्फर्ड बिने यांनी या विषयात महत्त्वाचं काम केलं आहे.

मानसशास्त्रज्ञ, शास्त्रज्ञ, साहित्यिक अशा अनेकांनी आजवर बुद्धी म्हणजे काय, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. माणूस बुद्धिमान असतो हे खरं. पण कोणत्या माणसाला किती बुद्धी आहे, हे समजून घेण्याची कितपत गरज असते, एखाद्याला जास्त बुद्धी आहे आणि एखाद्याला कमी बुद्धी असं मोजावं का लागतं?

खूप वर्षांपूर्वी फ्रान्सिस गॅल्टन यांना हे बुद्धीविषयक प्रश्न पडले. त्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी त्यांनी प्रयोगशाळाच उभारली. त्यामुळे बुद्धीचं मोजमाप करता येईल का, या कल्पनेचं श्रेय यांच्याकडे जातं. सुरुवातीच्या काळात माणूस बुद्धिवान आहे की नाही, हे शोधण्यासाठी अनेकांची धडपड चालू होती. त्या काळात बुद्धी आहे की नाही हे ठरवण्यासाठी त्यांनी डोक्याची मोजमापं घेतली. हा प्रयोग फारसा यशस्वी ठरलाा नाही. बुद्धी म्हणजे नक्की काय याविषयी ज्या व्याख्या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या आहेत, त्या साधारणपणे अशा आहेत-

‘बुद्धी म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेण्याची व समस्या सोडवण्याची क्षमता’, ‘मागील अनुभवांवरून शिकण्याची क्षमता म्हणजे बुद्धी’, ‘कोणतीही क्षमता प्राप्त करून घेण्याची क्षमता म्हणजे बुद्धी’, ‘अमूर्त संकल्पना ’, ‘बुद्धी म्हणजे गतानुभव, अध्ययन, कल्पना, विचार इ.च्या साहाय्याने समस्या सोडवण्याची व परिस्थितीशी समायोजन करण्याची जन्मजात क्षमता होय’.   ज्यांचा बुद्धिगुणांक १४०च्या वर असतो, ते अतिबुद्धिमान (जीनिअस) असं समजलं जातं. तर ज्यांचा बुद्धिगुणांक ९० ते १०० यांमध्ये असतो ते सरासरी असतात. तर यापेक्षा कमी अंक आला तर त्यांना सरासरीच्या खाली समजलं जातं. बुद्धिगुणांक कमी आला तर ‘आपल्याला बुद्धी कमी आहे’ असा लोकांचा समज व्हायचा.  अनेक वर्ष या ‘आयक्यू’चं गारूड लोकांवर होतं. पण आता मेंदू संशोधनांमध्ये प्रगती झाल्यामुळे ‘आयक्यू’ म्हणजेच फक्त बुद्धिमत्ता हा समज मागे पडतो आहे.