इटलीत जन्मलेला मिखाइल स्वेट्ट हा विद्यार्थी-संशोधक, विसाव्या शतकाच्या सुरुवातीस जिनेव्हा विद्यापीठात पीएच.डी.साठी संशोधन करत होता. हे संशोधन निष्कर्षणाद्वारे (एक्स्ट्रॅक्शन) वनस्पतींतील रंगद्रव्ये वेगळी करण्याबद्दलचे होते. या निष्कर्षणात, वनस्पतींतील रंगद्रव्ये ही वेगवेगळ्या द्रावकांना वेगवेगळ्या प्रकारचा प्रतिसाद देत असल्याचे त्याने नोंदवले. उदाहरणार्थ, वनस्पतींतील हिरवे क्लोरोफिल हे इथेनॉल किंवा अ‍ॅसिटोनसारख्या द्रावकांत सहजपणे विरघळत होते. याउलट पिवळ्या रंगाचे कॅरोटेनॉइड विरघळण्यासाठी पेट्रोलियम इथरसारखी द्रावके आवश्यक ठरत होती. आतापर्यंत यामागचे कारण- रंगद्रव्यांची प्रत्येक द्रावकातील वेगवेगळी विद्राव्यता, हे मानले गेले होते. स्वेट्टचा तर्क मात्र वेगळा होता. कारण काही रंगद्रव्यांना वनस्पतींपासून वेगळे करण्यासाठी तीव्र द्रावके वापरावी लागली असली, तरी एकदा वनस्पतींपासून वेगळी झाल्यावर ही रंगद्रव्ये इतर क्षीण द्रावकांतही सहजपणे विरघळत होती. यावरून स्वेट्टने महत्त्वाचा निष्कर्ष काढला : एखाद्या रंगद्रव्याला वनस्पतीपासून वेगळे करण्यासाठी, त्याची द्रावकातली विद्राव्यताच फक्त महत्त्वाची नाही; तर या रंगद्रव्यांचे वनस्पतींतील रेणूंशी असलेले रासायनिक बंधही महत्त्वाचे ठरतात. जी रंगद्रव्ये वनस्पतींतील रेणूंशी रासायनिकदृष्टय़ा अधिक घट्टपणे बांधली गेली असतील, ती वेगळी करण्यास तीव्र द्रावके वापरावी लागतात.

वनस्पतींऐवजी वेगळे पदार्थ वापरून त्यावर जर रंगद्रव्यांचे मिश्रण शोषले, तरीही रासायनिक बंधांतील मजबूतपणाच्या फरकावरून ती एकमेकांपासून वेगळी करता येतील, याची स्वेट्टला आता खात्री पटली. स्वेट्टने यासाठी शंभराहून अधिक सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थाची चाचणी घेतली. एकेका पदार्थाची भुकटी त्याने काचेच्या अरुंद नळीत भरली. त्यानंतर सर्व रंगद्रव्यांचे लिग्रॉइन या द्रावकातले मिश्रण त्याने या नळीत सोडले. हे मिश्रण नळीतून पुढे सरकताना, त्यातील विविध रंगद्रव्ये ही पदार्थाच्या भुकटीशी असलेल्या रासायनिक बंधांनुसार वेगवेगळ्या वेगाने प्रवास करीत होती. परिणामी, प्रत्येक रंगद्रव्याचा वेगळा रंगीत पट्टा निर्माण होऊन तो पुढे सरकू लागला. त्यानंतर स्वेट्टने वेगवेगळी द्रावके नळीत सोडून, यातील प्रत्येक रंगद्रव्याच्या पट्टय़ाला नळीतून वेगवेगळे बाहेर काढले. स्वेट्टच्या या प्रयोगांत इल्यूनिन कॅल्शियम काबरेनेट आणि अ‍ॅल्युमिना या पदार्थाच्या मिश्रणाची भुकटी सर्वाधिक परिणामकारक ठरली. विविध पदार्थाच्या मिश्रणांतले घटक वेगळे करण्यासाठी वर्णलेखन (क्रोमॅटोग्राफी) ही एक नवी उपयुक्त पद्धत स्वेट्टच्या १९०६ सालच्या या संशोधनातून उपलब्ध झाली.

डॉ. राजीव चिटणीस

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org