15 December 2018

News Flash

कुतूहल : मूलद्रव्ये : अ‍ॅल्युमिनिअमचे नैसर्गिक कवच

या धातूचे इतर गुणधर्म म्हणजे तो विद्युत आणि उष्णतेचा सुवाहक, वजनाला हलका आहे

 

अ‍ॅल्युमिनिअम या मूलद्रव्याचा अणुक्रमांक १३ असल्याने आवर्तसारणीत १३ व्या गणात आणि दुसऱ्या आवर्तनात याला स्थान मिळालं आहे. अ‍ॅल्युमिनिअम धातूचे उत्पादन किफायतशीर असल्याने शिवाय खनिज स्वरूपात त्याची विपुल उपलब्धता आणि वैशिष्टय़पूर्ण गुणधर्मामुळे दैनंदिन जीवनात या धातूचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो.

क्षरणाच्या (corrosion) संदर्भात अ‍ॅल्युमिनिअम धातूचे एक वैशिष्टय़ म्हणजे त्याला मिळालेले अ‍ॅल्युमिनाचे नैसर्गिक कवच. हा धातू हवेच्या संपर्कात आला, की हवेतील ऑक्सिजनबरोबर संयोग पावून अ‍ॅल्युमिना (अ‍ॅल्युमिनिअम ऑक्साइड) तयार होऊन त्याचा अतिशय पातळ (साधारण ४ नॅनोमीटर = ४ ७ १०-९ मीटर जाडीचा), अदृश्य पण अभेद्य असा एकसंध थर म्हणजेच एक प्रकारे नैसर्गिक संरक्षक कवच धातूच्या पृष्ठभागावर जमा होतो. यामुळे हा धातू गंज-प्रतिरोधी बनतो. शिवाय अ‍ॅल्युमिना रासायनिकदृष्टय़ा अक्रियाशील असल्याने त्यावर अन्नद्रव्यातील सौम्य आम्लांचा आणि वातावरणाचा सहसा परिणाम होत नाही. हा थर आतील अ‍ॅल्युमिनिअम धातूला घट्ट धरून असल्याने थराखालील अ‍ॅल्युमिनिअमचा हवा आणि पाण्याशी संपर्क येत नाही, म्हणून अ‍ॅल्युमिनिअमची झीज होत नाही. या गुणधर्मामुळे अ‍ॅल्युमिनिअमचा अन्न साठविण्याकरिताही उपयोग केला जातो. मात्र, रासायनिकदृष्टय़ा उभयधर्मी असून हा क्रियाशील धातू आहे.

या धातूचे इतर गुणधर्म म्हणजे तो विद्युत आणि उष्णतेचा सुवाहक, वजनाला हलका आहे (घनता २.७ ग्रॅम/घ.सेंमी). सर्वसाधारण परिस्थितीत हा धातू टिकाऊ आहे. त्याची वर्धनीयता आणि तन्यताही उत्तम आहे. शुद्ध स्वरूपात अ‍ॅल्युमिनिअमला मजबुती मात्र कमी आहे. या धातूचा मजबूतपणा वाढवण्यासाठी १९०९ मध्ये जर्मन शास्त्रज्ञ आल्फ्रेड विल्म याने तांबे, मॅग्नेशियम व मँगॅनीज हे घटक वापरून मिश्र धातू तयार केला. हा मिश्र धातू ‘डय़ुराल्युमिनिअम’ या नावाने ओळखला जातो. वजनाने हलका पण मजबूत असल्यामुळे १९१९ मध्ये डय़ुराल्युमिनिअमपासून तयार करण्यात आलेली पहिली विमाने आकाशात झेपावली. तेव्हापासून विमान उद्योग आणि अ‍ॅल्युमिनिअम असं समीकरण तयार झालं, ते आजही कायम आहे. पाणी शुद्धीकरणासाठी जरी तुरटीचा वापर होत असला तरी पाण्यातील अ‍ॅल्युमिनिअमचे प्रमाण ०.२ मिलिग्रॅम प्रति लिटपर्यंत आरोग्यासाठी सुरक्षित आहे. श्वसनाद्वारे आणि तोंडावाटे जास्त प्रमाणात अ‍ॅल्युमिनिअम शरीरात गेल्यास श्वसनाचे आणि चेतासंस्थेचे आजार मात्र उद्भवतात.

शुभदा वक्टे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

First Published on March 13, 2018 2:08 am

Web Title: aluminum armor