वयाच्या बाराव्या वर्षी दिल्लीतल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात आपल्या सरोदवादनाने संगीताच्या जाणकारांनाही थक्क करणारे अमजद अली खान हे आता सरोदवादनातील मापदंड बनले आहेत. बंगश पठाण समाजातले अमजद अली हे संगीताच्या सेनिया बंगश या घराण्याच्या सहाव्या पिढीतले सरोदवादक. सरोद या वाद्याच्या निर्मितीचे श्रेयही अमजद अलींच्या पूर्वजांनाच जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केवळ अठरा वर्षांचे असताना, १९६३ मध्ये अमजद अलींनी पं. बिरजू महाराजांच्या नृत्यवृंदासह अमेरिकेचा दौरा केला. या दौऱ्यात महाराजांच्या कथ्थक संरचनेत अमजद अलींच्या सरोदवादनाची साथसंगत हे एक आकर्षण होते. रॉयल अल्बर्ट हॉल, केनेडी सेंटर, शिकागो सिंफनी सेंटर वगैरे ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांत त्यांनी  श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. १९६३ पासून भारतात आणि परदेशातही अनेक मफिलींमध्ये कला सादर करणारे अमजद अली जसे संगीतात अभिनव प्रयोग करीत असतात तसेच सरोद या वाद्यातही सुधारणा, बदल करीत असतात. सुप्रसिद्ध भरतनाटय़म् नृत्यांगना शुभलक्ष्मी या अमजद अलींच्या पत्नी, अमान अली आणि अयान अली हे त्यांचे दोन पुत्र. हे दोन पुत्रही सरोदवादनात निपुण आहेत.

अमजद अलींनी सरोदवादनासाठी नवराग निर्मितीही केली. शिवांजली, हरिप्रिया कानडा, किरण रंजनी, सुहाग भरव, ललितध्वनी, श्याम श्री, जवाहर मंजिरी ही त्यांनी निर्मिलेल्या काही रागांची नावे. इंदिरा गांधींच्या स्मृतीनिमित्त सर्जनशील अमजद अलींनी प्रियदर्शिनी तर राजीव गांधींच्या स्मरणार्थ कमलश्री या रागांची निर्मिती केली. सध्या न्यू मेक्सिको विद्यापीठात व्हिजिटिंग प्रोफेसर असलेले अमजद अली हाँगकाँग फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रामधून सरोदवादन करतात.

अमजद अलींच्या असामान्य कलाकारीबद्दल त्यांना मिळालेल्या असंख्य पुरस्कारांपैकी पद्मश्री (१९७५), पद्मभूषण (१९९१), पद्मविभूषण (२००१), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९८९), फुकुओका एशियन कल्चरल प्राइज (२००४), बंग विभूषण (२०११) हे महत्त्वाचे आहेत. अमेरिकेतील ह्यूस्टन (टेक्सास) शहर तसेच ओवलहोमा, टेनेसी या राज्यांनी अमजद अलींना त्यांचे मानद नागरिकत्व दिले आहे.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amjad ali khan
First published on: 19-06-2018 at 03:11 IST