20 January 2018

News Flash

अनंतमूर्ती यांचे कादंबरीलेखन

अनंतमूर्ती यांनी लेखनकार्य हे वास्तव यथार्थपणे अभिव्यक्त करण्याची प्रक्रिया मानले.

मंगला गोखले | Updated: August 10, 2017 6:09 AM

अनंतमूर्ती यांनी लेखनकार्य हे वास्तव यथार्थपणे अभिव्यक्त करण्याची प्रक्रिया मानले. प्रश्नांच्या जंजाळात स्वत:चा शोध घेण्याची त्यांची ही एक पद्धत होते. जीवनातील दु:खद व यातनादायक अनुभवांच्या माध्यमातून रूपक रचण्याचे जादूई कौशल्य त्यांच्याकडे होते. आतापर्यंत त्यांचे सहा कथासंग्रह, चार कादंबऱ्या, पाच समीक्षाग्रंथ, एक नाटक, चार काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. इंग्रजी वाङ्मयाच्या व्यासंगामुळे त्यांच्या समीक्षा लेखनाला नवे वळण मिळाले. त्यांच्या कादंबरीलेखनातून मानवी समस्यांबद्दलचे खोल चिंतन जाणवते. समीक्षक म्हणून अनंतमूर्ती यांनी साहित्याच्या सामाजिक, सांस्कृतिक अंगावर भर देऊन, कन्नड समीक्षेची दिशा बदलण्याची भूमिका पार पाडली. ती त्यांच्या पूर्वापार (१९८९)सारख्या समीक्षा ग्रंथातूनही आपल्याला जाणवते. एकूणच त्यांनी साहित्याचे नवे मानदंड दाखवून दिले आणि त्यांच्या या विचारसरणीचा प्रभाव नव्या कन्नड लेखकांवरही जाणवतो.

संस्कार (१९६५) या त्यांच्या पहिल्याच कादंबरीने समाजमनात खळबळ माजली. ‘भारतीपुरा’ (१९७३), ‘अवस्थे’ (१९७८) आणि ‘भव’ (१९९७) या त्यांच्या कादंबऱ्याही प्रसिद्ध आहेत. वाचकांना विचलित करण्याची क्षमता ज्या लेखकामध्ये असते, तो लेखक महान समजला जातो.  खऱ्या अर्थाने ते एक महान व आधुनिक लेखक ठरतात.

त्यांची ‘अवस्थे’ ही कादंबरी राजकारण या विषयावर आहे. यात एका गरीब, ठावठिकाणा माहीत नसलेल्या, महेश्वर यांच्या मदतीने, विद्यार्थी नेत्यापासून राजकारणातील विविध पदांचे टप्पे ओलांडत, मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचू पाहणारा, अत्यंत कोपिष्ट असा कृष्णाप्पा, हळूहळू राजकारणातील अधोगतीचेही टप्पे कसे ओलांडत जातो, त्याचा आलेख आहे.

सुरुवातीच्या लेखनावर समाजवादी विचारांचा प्रभाव दिसतो. त्यात जात/लिंग यांआधारे होणाऱ्या भेदभावावर प्रखर टीका आढळते, पण ‘अवस्थे’ कादंबरीपासून त्यांनी गांधीवादी विचारांचा आधार घेतलेला दिसतो. वास्तवात अनंतमूर्ती साकल्यवादी कल्पनेचे लेखक होते. त्यांनी आपल्या साहित्यात ज्या विषयांना, विचारांना आधारभूत मानले तेच त्यांच्या लेखनात प्रतिबिंबित झालेले पाहावयास मिळते.

नव आधुनिकवादाला आपल्या साहित्यातून व सांस्कृतिक गुणदोषांच्या विश्लेषणातून त्यांनी अभिजात रूप प्रदान केलेले दिसते. त्यामुळे असेही म्हणता येईल की, अनंतमूर्ती हे ‘कुवेंपु’ व शिवराम कारंत या ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त यशस्वी साहित्यिकांनी निर्माण केलेल्या आधुनिक कन्नड साहित्याच्या महान परंपरेचे खरे उत्तराधिकारी होते.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

विश्वकिरणांच्या भेदकतेचे मापन

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस, बाह्य़ अवकाशातून येणाऱ्या भेदक (पेनेट्रेटिंग) प्रारणांचे अस्तित्व, चार्लस विल्सन यांनी केलेल्या विद्युत-दर्शक-यंत्रांसहितच्या साध्या प्रयोगांतून संवेदले गेले. रॉबर्ट मिलिकन या अमेरिकन, नोबेल विजेत्या भौतिकशास्त्रज्ञाने, अतिशय ऊर्जस्वल भारित कणांच्या या प्रारणांना ‘विश्वकिरण’ हे नाव दिले. त्यात निरनिराळ्या प्रकारचे अणुगर्भ असतात, मात्र मुख्यत्वे धन कण असतात. प्राथमिक विश्वकिरण वातावरणाशी परस्पर-कार्यरत होऊन, दुय्यम किरणे निर्माण करतात.

दुय्यम किरणे ज्यांवर आदळतात त्या उदासीन अणू किंवा रेणुमधील ऋण कण ते काढून घेतात. अशा प्रकारे ते अणू-रेणूंना विद्युतभारित व क्रियाशील अवस्थेत आणून सोडतात. या प्रक्रियेला मूलकीकरण (आयोनायझेशन) असे म्हणतात आणि हा प्रभाव घडवून आणणाऱ्या उत्सर्जनाला मूलकीकारक उत्सर्जन (आयोनायिझग रेडिएशन) असे म्हणतात. मूलकीकरण करत असता उत्सर्जनातील ऊर्जा घटत जाते. त्यातील ऊर्जा पूर्णत: नाहीशी झाली की ते उत्सर्जन पदार्थात लुप्त होऊन जाते. त्यापूर्वी ते उत्सर्जन पदार्थात जे अंतर चालून जाते त्यावरून त्याची भेदकता समजत असते. या किरणोत्सारी उत्सर्जनाची भेदकता खालील कोष्टकाप्रमाणे असते. या अंतरास आपण ‘भेदनखोली’ म्हणू या. विश्वकिरणांची भेदनखोली ‘मीटर’मध्ये मोजली जाते.

अल्फा किरणे त्वचेने अथवा कागदानेही अडतात. बीटा किरणे हलक्या धातूच्या पातळ पत्र्यानेही अडतात. गॅमा किरणांना अडवायला शिशासारख्या अवजड धातूंच्या भती लागतात. तर अणुगर्भातील विरक्तक कण त्यांनीही अडत नाहीत. त्यांना पाणी, काँक्रीट वा मेणाचे अनेक मीटर जाड थरच अडवू शकतात.

First Published on August 10, 2017 6:09 am

Web Title: ananthamurthy books writing
  1. नितीन खंडाळे चाळीस
    Aug 10, 2017 at 7:57 am
    कुतूहल सदर आकृती पूर्ण दिले पाहिजे. तसेच त्यांची उपयुक्तता लक्षात घेता जुने भाग हटवू नये.
    Reply