प्राचीन आणि मध्ययुगीन रोमन समाजात सध्याच्या हॅण्डबॉलप्रमाणे चेंडूचा खेळ लोकप्रिय होता. वैयक्तिक क्रीडा प्रकारात धावण्याच्या शर्यती, विविध प्रकारच्या उडय़ा, कुस्ती लोकप्रिय होती. रोमन लोकांच्या विशेष पसंतीचे खेळ आणि मनोरंजनाचे साधन होते रथांच्या किंवा घोडय़ांच्या शर्यती आणि ग्लॅडिएटर्सच्या झुंजी. सर्कस मॅक्झिमस या विशाल मदानावरील रथांच्या शर्यती मोठय़ा आवडीने पाहिल्या जात, रथांवर आणि घोडय़ांवर सट्टा खेळला जाई. या शर्यती इ.स. ५४९ मध्ये बंद झाल्या. ग्लॅडिएटर या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे तलवारबाज असा. ग्लॅडिअस म्हणजे तलवार. देहान्ताची शिक्षा झालेल्या आठ-दहा गुन्हेगारांना एकाच वेळी शस्त्र घेऊन एकमेकांवर सोडले जाई. शेवटी जो कोणी एक जिवंत राहील तो विजयी आणि मुक्त होत असे. पुढे पुढे इ.स.पूर्व दुसऱ्या आणि पहिल्या शतकात हा शिक्षा प्रकार लहान अ‍ॅम्फिथिएटरमध्ये होऊ लागला आणि एक मनोरंजनाचा प्रकार म्हणून रोमन प्रजाही ते पाहायला येऊ लागली. पुढे ग्लॅडिएटरची झुंज हा शिक्षेचा प्रकार न राहता मनोरंजक खेळ झाला. झुंजीचे शिक्षण देणाऱ्या संस्था निघाल्या, व्यावसायिक ग्लॅडिएटर्स तयार झाले. रोममध्ये या मनोरंजनासाठी ६० हजार प्रेक्षक बसतील असे भव्य कलोझियम बांधले गेले. एखादा उत्सव असल्याप्रमाणे लोक नटूनथटून या झुंजी पाहण्यासाठी येत. पुढे या झुंज खेळात काही प्रकार निघाले. पहिल्या प्रकारात दोन ग्लॅडिएटर्स एकमेकांवर वार करून त्यातील एक मरेपर्यंत ही झुंज चाले. दुसऱ्या प्रकारात त्यातील एका ग्लॅडिएटरला जखम होऊन त्याचे रक्त निघाले की झुंज संपत असे. एक सशस्त्र ग्लॅडिएटर आणि जंगली श्वापदाची झुंज हा तिसरा प्रकार. ४०४ साली ग्लॅडिएटरची झुंज चालली असताना ख्रिश्चन भिक्षू टेलिमॅक्सला हा रक्तरंजित खेळ सहन न होऊन त्याने तो थांबविण्याचा प्रयत्न केला. पण त्यामुळे संतप्त प्रेक्षकांनी त्या भिक्षूलाच कलोझियममध्ये दगडांनी ठेचून मारले. तेव्हापासून सम्राट हनोरियसने या खेळावरच बंदी आणली.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

ओझोन आणि तंबाखू

भूपृष्ठापासून उंच पन्नास किलोमीटरवर असलेल्या स्थितांबर थरात  ऑक्सिजनपासून जंबूपार किरणामुळे ओझोनची निर्मिती होते. या ओझोनच्या थरामुळे जंबूपार किरण जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत व पृथ्वीवरील जीवसृष्टीचे रक्षण होते. परंतु भूपृष्ठाजवळ म्हणजे दहा किलोमीटर उंचीपर्यंत क्षोभावरणात ओझोनची निर्मिती व त्याचा जीवसृष्टीवरील परिणाम मात्र एकदम वेगळे असतात. औद्योगिक क्षेत्रात जेथे उच्च तापमानात ज्वलनक्रिया होत असतात तेथे नायट्रोजनडाय ऑक्साइड या वायूचे प्रदूषण होते. या वायुतील ऑक्सिजनचा एक रेणू ओझोनमुळे डागाळलेली घेवडय़ाची पाने सूर्यप्रकाशामुळे वेगळा होतो. आणि हवेतील ऑक्सिजनला मिळतो आणि ओझोन हा दुसरा प्रदूषक तयार होतो. या प्रदूषकाच्या संपर्कात येणाऱ्या प्राणिमात्रांच्या पेशींना तो घातक असतो. मानवामध्ये श्वसन विकार होतात, अस्थमाचा त्रास होतो. तसेच वनस्पतींच्या श्वसनेंद्रियांवरही परिणाम होतो. ओझोन रंध्रांद्वारे पानांच्या  अंतरभागात शिरतो. आसपासच्या नाजूक पेशीत शिरतो. हरितद्रव्यांचा नाश करतो. याचे पहिले लक्षण म्हणजे रंध्रांच्या आतील पेशी फिकट पिवळ्या पांढऱ्या होतात. आणि रंध्रांच्या ठिकाणी पानावर सूक्ष्म पिवळट ठिपके दिसतात. ओझोनची तीव्रता वाढल्यास संपूर्ण पान करपल्यासारखे पिवळे तपकिरी होऊन गळून पडते. उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो.

तंबाखूच्या पानांना त्याच्या विशेष स्वादामुळे किंमत असते. करोलिना राज्यांतील तंबाखूच्या मोठाल्या शेतांचे ओझोनमुळे मोठे नुकसान झाल्याने तेथे मोठय़ा प्रमाणावर संशोधन झाले आहे.

तंबाखूची पाने ओझोनला संवेदनशील असतात असे लक्षात आले त्यामुळे तंबाखूच्या बेल डब्लू थ्री या जातीवर बरेच संशोधन झाले आहे. त्याचप्रमाणे भारतातही गहू ,वाल, मूग, मटार, बटाटा, मोहरी, सोयाबीन या पिकाचे ओझोनमुळे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. दिल्ली, वाराणसी, पुणे, चेन्नई, अहमदाबाद, अलाहाबाद  येथील गव्हाच्या पिकांचे ओझोन प्रदूषणामुळे एका वर्षांत पन्नास लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे एका अहवालात म्हटले आहे. अ‍ॅस्कोरबिक आम्ल हे जीवनसत्त्व फवारून पिकाचे नुकसान कमी करता येते. असेही प्रयोगांती सिद्ध झाले आहे.  ओझोन प्रदूषणामुळे होणारे नुकसान आटोक्यात आणण्यासाठी गहू, मूग या पिकांच्या पानावरची ओझोन प्रदूषणाची सुरुवातीच्या लक्षणावर बारीक लक्ष ठेवल्यास जरूर ती उपाययोजना करून पिकांचे उत्पादन सुरक्षित ठेवता येईल.

–  प्रा. शरद चाफेकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org