सुनीत पोतनीस

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पोर्तुगीजांनी अंगोलाच्या बहुतांश क्षेत्रात वसाहती स्थापल्या. या वसाहती पूर्वेला कांगो नदीपर्यंत विस्तारल्याने संपूर्ण अंगोला पोर्तुगीज अमलाखाली आला. साधारणत: १९२० नंतर पोर्तुगीजांनी अंगोलात स्थलांतर करून स्थायिक होण्याचे प्रमाण वाढले, त्यांचा व्यापारही वाढला. पुढे १९५१ साली पोर्तुगाल सरकारने अंगोलातील त्यांचा वसाहतीचा सर्व प्रदेश स्वत:च्या शासकीय प्रदेशांत समाविष्ट करून अंगोला हा पोर्तुगालचाच एक प्रांत असल्याचे जाहीर केले.

विसाव्या शतकात पोर्तुगाल सरकारला अंगोलातून हस्तिदंत, रबर आणि शेतमालाच्या होणाऱ्या निर्यातीवर चांगले उत्पन्न मिळत होते. तरीही त्यांनी जनतेवर कर वाढवले. इथून अंगोलियन जनतेत कुरबुर सुरू झाली. १९५६ मध्ये, पोर्तुगीजांच्या कारभारावर असंतुष्ट असलेल्या मंडळींनी गुप्तपणे ‘द पीपल्स मूव्हमेंट फॉर द लिबरेशन ऑफ अंगोला’ ही चळवळ उभारून पोर्तुगीज अधिकाऱ्यांवर गनिमी हल्ले सुरू केले. पुढे चार वर्षांनी आणखी दोन स्वातंत्र्यवादी गुप्त संघटना अंगोलात तयार होऊन पोर्तुगीज वस्त्यांमधील पुरुष, स्त्रिया व मुलांवरही हल्ले सुरू झाले. पोर्तुगीज शासकांनी मग हे आंदोलन दडपण्यासाठी कॉफी, कोकोच्या मळ्यांतील मजुरांचा छळ सुरू केला. याची प्रतिक्रिया म्हणून स्वातंत्र्य चळवळीचे स्वरूप अधिकाधिक हिंसक बनले.

याच काळात तिकडे पोर्तुगालमध्येही राजकीय अस्थिरता वाढत होती. १९७४ साली पोर्तुगालच्या लष्कराने तिथल्या राजवटीविरुद्ध उठाव करून ती राजवट बरखास्त केली आणि पोर्तुगालमध्ये लष्करी सरकार स्थापन केले. त्या राजवटीने पोर्तुगालमध्ये अनेक निर्णयांत लोकशाहीवादी धोरण अवलंबले आणि त्यांच्या वसाहतींना सार्वभौमत्व देण्याचा निर्णय घेतला. ११ नोव्हेंबर १९७५ रोजी पोर्तुगाल सरकारने अंगोलाला स्वातंत्र्य देऊन तो एक स्वायत्त, सार्वभौम नवदेश म्हणून अस्तित्वात आल्याचे जाहीर केले. १९६१ ते १९७४ या काळातला अंगोलाचा इतिहास हा हिंसक उठाव, गनिमी हल्ले, साम्राज्यवाद्यांची दडपशाही यांनी भरलेला आहे. स्वातंत्र्य देताना, पोर्तुगालने अंगोलातली राजकीय सत्ता अंगोलाच्या तीन स्वातंत्र्यवादी संघटनांच्या युतीकडे सोपवली.

sunitpotnis94@gmail.com