‘अँटिगा अ‍ॅण्ड बार्ब्युडा ’ हा कॅरिबियन द्वीपसमूहातील एक छोटा देश. मध्य अमेरिकेत कॅरिबियन समुद्र आणि अटलांटिक महासागर यांच्या मध्ये वसलेल्या, लहान-लहान बेटांचा मिळून बनलेल्या या देशाची अँटिगा आणि बार्ब्युडा ही वस्ती असलेली दोन प्रमुख बेटे आहेत. या दोन बेटांशिवाय इतर लहान-लहान १८ बेटे समाविष्ट असलेला हा देश इतर कॅरिबियन देशांप्रमाणेच युरोपीय पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण आहे.

हा छोटा देश साडेतीन शतके ब्रिटिश साम्राज्याची एक वसाहत बनून राहिला. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, १ नोव्हेंबर १९८१ रोजी ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवून ‘अँटिगा-बार्ब्युडा ’ हे द्वीपराष्ट्र अस्तित्वात आले. राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असलेल्या या नवदेशाचे राष्ट्रप्रमुखपद ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीयकडे औपचारिकपणे देण्यात आले आहे.

या बेटांवर राहणाऱ्या सिबोनी या मूळच्या रहिवाशांनी या प्रदेशाचे नाव ‘वाडादली’ असे ठेवले होते. १४९३ साली या बेटांशेजारून जाताना दर्यावर्दी ख्रिस्तोफर कोलंबसने या बेटांचा नामनिर्देश ‘चर्च ऑफ सांता मारिया ला अँटिगा’ असा केला. कोलंबस आणि त्याच्या सहकाऱ्यांनी इथे अल्पकाळ वास्तव्य केले, पण स्पॅनिशांची वसाहत मात्र स्थापन केली नाही. परंतु त्यांनी ठेवलेले ‘अँटिगा’ हे नाव मात्र या प्रदेशास चिकटले ते कायमचेच. स्पॅनिश भाषेत ‘अँटिगा’ म्हणजे प्राचीन आणि ‘ बार्ब्युडा ’ म्हणजे दाढीवाले!

ब्रिटिशांनी सन १६३२ मध्ये प्रथम अँटिगा बेटावर वस्ती केली. ब्रिटिश राजवटीने तिथे थॉमस वॉर्नर यास गव्हर्नर म्हणून नियुक्त केले. तिथे वस्ती करणाऱ्यांनी या बेटावर तंबाखू, नीळ, आले आणि उसाची शेती सुरू केली. सतराव्या शतकाच्या शेवटाकडे गव्हर्नरपदी आलेल्या ख्रिस्तोफर कॉड्रिंग्टनने येथे मोठ्या प्रमाणात आणि शास्त्रोक्त पद्धतीने उसाची लागवड करून चांगला पैसा कमावला. त्याचे अनुकरण करत इतर मळेवाल्यांनीही अँटिगा आणि बार्ब्युडा या दोन्ही बेटांवर मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करून साखर उत्पादन सुरू केले. पुढच्या पन्नासेक वर्षांत साखर उत्पादन हेच या बेटांचे उत्पन्नाचे प्रमुख साधन बनले. या बेटांवरचे स्थानिक रहिवाशीच या ऊसमळ्यांमध्ये गुलाम म्हणून काम करीत. बऱ्याच वेळा इथून गुलामांची निर्यातही केली जाई. – सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com