‘युरेका’ हा शब्द उच्चारताच आठवतो तो आर्किमिडीज! प्राचीन गणितज्ञांच्या नामावळीतील हे एक प्रसिद्ध नाव! सिसिलीमधील सीरक्यूझ बेटावर जन्मलेला आर्किमिडीज (इ.स. पूर्व २८७ ते २१२) ग्रीक गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होता. शालेय पाठय़पुस्तकातील ‘आर्किमिडीजचा सिद्धांत’ आणि ‘आर्किमिडीजचा स्क्रू’ यांतूनही त्याची ओळख होते.

‘‘योग्य टेकू मिळाल्यास मी तरफेच्या जोरावर पृथ्वी उचलून दाखवीन,’’ असे म्हणणाऱ्या आर्किमिडीजची खरी आवड गणितातच होती. तरफेचे निरनिराळे प्रकार व नियम त्याने गणित वापरून लिहिले. त्याच्या ‘मेथड’ या पुस्तकात त्याने वक्र आकृतीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी ‘मेकॅनिकल मेथड’ नावाची पद्धत दिली. काळाच्या ओघात अज्ञात राहिलेले हे पुस्तक संपूर्ण उपलब्ध नाही; पण त्याचा काही भाग १९०८ साली मिळाला. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र देताना ‘एखाद्या वर्तुळात अनंत बाजू असलेली बहुभुजाकृती आंतरलिखित केली, तर त्या बहुभुजाकृतीचे क्षेत्रफळ वर्तुळाच्या क्षेत्रफळाइतके असेल’ हे त्याचे विधान सध्याच्या कलनशास्त्रातील ‘सीमा (लिमिट)’ या संकल्पनेच्या जवळ जाते. वक्राची स्पर्शिका ही छेदिकेची अंतिम सीमा असते या कल्पनेचे विकलनाशी, तर वक्र आकृतीचे क्षेत्रफळ काढताना त्या आकृतीचे असंख्य लहान भाग करून त्यांच्या क्षेत्रफळांची बेरीज करायची, या कल्पनेचे संकलनाशी साधम्र्य दिसते. यावरून त्याच्या गणिती ज्ञानाची झेप काळाच्या पुढे होती हे जाणवते.

peter higgs death marathi news, peter higgs god particle marathi news
‘देव कणा’चा सिद्धान्त मांडणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड… पीटर हिग्ज यांच्या ‘हिग्ज बोसॉन’ संशोधनाचे मोल काय?
Apple ReALM, Apple
यूपीएससी सूत्र : न्यूझीलंडच्या व्हिसा नियमांमधील बदल अन् ॲपलचे ReALM , वाचा सविस्तर…
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)

‘एक गोल (स्फिअर) आणि एक दंडगोल (सिलिंडर) यांचा व्यास समान असेल आणि दंडगोलाची उंची व्यासाइतकी असेल, तर त्या दंडगोलात आंतरलिखित केलेल्या गोलाचे घनफळ दंडगोलाच्या घनफळाच्या २/३ पट असते,’ हा त्याचा शोध महत्त्वाचा ठरला. आपल्या मृत्यूनंतर ही आकृती आपल्या थडग्यावर कोरावी अशी त्याची इच्छा होती. त्याने ‘ऑन स्पायरल्स’ या पुस्तकात वर्तुळाच्या क्षेत्रफळाइतक्या क्षेत्रफळाचा चौरस काढणे, कोनाचे तीन समान भाग करणे या रचना दिल्या आहेत.

आर्किमिडीज अद्वितीय गणितज्ञ तसाच उत्तम तंत्रज्ञही होता. रोमन सम्राट मार्सेल्सने सीरक्यूझवर हल्ला केला तेव्हा, त्याने शोधलेल्या मोठय़ा गोफणीतून शत्रूवर मोठमोठय़ा दगडांचा मारा करता येत असे. त्याने बनवलेल्या क्रेनसारख्या यंत्रामुळे शत्रूच्या बोटी खाली-वर करता येत असत. त्याशिवाय त्याने निर्माण केलेल्या इतर यंत्रांनीही रोमन सैन्याला जेरीस आणले होते असे म्हणतात.

आर्किमिडीजच्या सन्मानार्थ चंद्रावरील एका विवराला त्याचे नाव दिले आहे. गणितातील नोबेल पारितोषिकसम समजल्या जाणाऱ्या फील्ड्स पदकावर आर्किमिडीजचे चित्र आहे (पाहा : गोलातले छायाचित्र) हा त्याचा सर्वोच्च बहुमानच!

– शोभना नेने  

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org