05 December 2020

News Flash

जे आले ते रमले.. : ख्रिस्तोफर बेनिंजर (१)

ख्रिस्तोफर चार्ल्स बेनिंजर यांचा जन्म १९४२ सालचा अमेरिकेतील हॅमिल्टन, ओहायो इथला.

ख्रिस्तोफर बेनिंजर

मूळचे अमेरिकन असलेले ख्रिस्तोफर बेनिंजर हे नामवंत वास्तुरचना तज्ज्ञ भारतात गेली ४० वर्षे कार्यरत आहेत. वास्तु-स्थापत्य आणि नगररचना या व्यवसायक्षेत्रात नवनवीन प्रयोग करणारे बेनिंजर सध्या जागतिक पातळीवरील अग्रगण्य दहा आर्किटेक्ट्सपैकी एक समजले जातात. त्यांच्या ‘सी.सी.बी.ए.’ म्हणजे ख्रिस्तोफर चार्ल्स बेनिंजर आर्किटेक्ट्स या व्यवसाय संस्थेचे प्रमुख (केंद्रीय) कार्यालय पुण्यात आहे.

ख्रिस्तोफर चार्ल्स बेनिंजर यांचा जन्म १९४२ सालचा अमेरिकेतील हॅमिल्टन, ओहायो इथला. वडील फ्लोरिडा विद्यापीठात प्रोफेसर आणि ख्रिस्तोफर हे त्यांचे दुसरे अपत्य. बालपण फ्लोरिडात गेल्यावर ख्रिस्तोफर ‘एमआयटी’ म्हणून जगभर ओळखल्या जाणाऱ्या ‘मसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’त नियोजन आणि नगररचना शिकले व पुढे हार्वर्डच्या गॅ्रज्युएट स्कूल ऑफ डिझाइनमधून त्यांनी आर्किटेक्चरचा अभ्यासक्रम पूर्ण केला. हार्वर्डमध्येच दोन वर्षे अध्यापन करताना त्यांचा संबंध जोसेफ लुईस या आर्किटेक्टशी झाल्यावर त्यांनी जोसेफ यांच्या स्टुडिओत काही काळ कामाचा अनुभव घेतला.

पुढे अहमदाबाद येथील बाळकृष्ण (बी.व्ही.) दोशी यांच्या आमंत्रणावरून ख्रिस्तोफर यांनी हार्वर्डमधील अध्यापक पदाचा राजीनामा दिला आणि १९७१ साली ते अहमदाबादेस आले. अहमदाबादमध्ये दोशी यांच्या ‘स्कूल ऑफ आर्किटेक्चर’मध्ये काही संशोधन करण्यासाठी  त्यांची नियुक्ती झाली आणि फोर्ड फाउंडेशनच्या वतीने अहमदाबाद एज्युकेशनल सोसायटीसाठी सल्लागार म्हणूनही त्यांना नियुक्त केले गेले. तिथे त्यांनी काही काळ ‘स्कूल ऑफ प्लॅनिंग’ चालविले. अहमदाबाद वास्तव्यातच, १९७२ साली भारत सरकारच्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी गृहनिर्माण योजनेअंतर्गत ५०० घरांचा आराखडा आणि बांधकाम करण्याचे जामनगर येथील काम ख्रिस्तोफर बेनिंजर यांनी पूर्ण केले. त्यांनी पूर्ण केलेला हा पहिला मोठा प्रकल्प. एक प्रतिभावान आर्किटेक्ट म्हणून ख्रिस्तोफर यांचे नाव या प्रकल्पामुळे झाल्यावर १९७३  मध्ये दुसरा मोठा प्रकल्प त्यांच्याकडे चालत आला. वर्ल्ड बँक आणि मद्रास अर्बन डेव्हलपमेंट ऑथोरिटीसाठी आर्थिक दुर्बल घटकांकरिता दोन हजार घरांच्या प्रकल्पाची आखणी करण्याचा हा प्रकल्प होता.

सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2018 3:19 am

Web Title: architecture christopher benninger part 1
Next Stories
1 थोरिअम आणि अणुऊर्जा
2 ब्राह्मी लिपी संशोधक जेम्स प्रिन्सेप (२)
3 जे आले ते रमले.. : जेम्स प्रिन्सेप (१)
Just Now!
X