सुधा सोमणी

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात किरणोत्सारिता या क्षेत्रात बरेच संशोधनकार्य सुरू होते. या संशोधनादरम्यान १९४४ साली सीबोर्ग व त्यांच्या सहकाऱ्यांनी बर्कले (कॅलिफोर्निया) येथे अमेरिशिअमचा शोध लावला. अमेरिशिअम हे युरेनिअमोत्तर तिसरे मूलद्रव्य असले तरी त्याचा शोध मात्र चौथा लागला. अमेरिशिअमच्या नंतर येणाऱ्या क्युरिअमचा शोध अमेरिशिअमच्या अगोदर लागला. महायुद्धाच्या परिस्थितीमुळे हे संशोधन लगेच जाहीर करता आले नाही. १९४५मध्ये युद्ध संपल्यावर ते जाहीर करण्यात आले.

युरेनिअम किंवा प्लुटोनिअमवर न्युट्रॉनचा मारा करून अमेरिशिअम तयार करतात. अशा प्रकारे तयार केलेल्या अमेरिशिअमची मात्रा ही काही मायक्रोग्रॅम इतकीच होती. सन १९५१मध्ये अमेरिशिअम फ्लोराइडचे क्षपण करून ४०-२०० मायक्रोग्रॅम अमेरिशिअम मिळविण्यात आले. पृथ्वीच्या उत्पत्तीच्या वेळी अमेरिशिअम-२४१ आणि अमेरिशिअम-२४३ अस्तित्वात असले तरी त्यांचे अर्धायुष्यकाल अनुक्रमे ४३२.२ आणि ७३७० वर्षे असल्याने आज ते पृथ्वीवर आढळत नाहीत. केवळ केंद्रकीय विखंडन किंवा अणुबॉम्बच्या चाचण्या झालेल्या ठिकाणी अमेरिशिअम आढळते. चेर्नोबिल अणु-ऊर्जा केंद्रातील दुर्घटनेनंतर तिथे अमेरिशिअम सापडले होते. हे मूलद्रव्य सर्वप्रथम अमेरिकेत तयार केल्याने याचे नाव अमेरिशिअम असे ठेवण्यात आले. बरेचसे गुणधर्म सारखे असल्याने याला युरोपिअमचा जुळा भाऊ असे संबोधण्यात येते.

अतिशय किरणोत्सारी असलेला अमेरिशिअम हा पांढऱ्या चंदेरी रंगाचा आहे. हवेच्या संपर्कात याचा रंग बदलतो. अमेरिशिअम हा मृदू धातू असून याचा आकार सहज बदलता येतो. अमेरिशिअमचा उत्कलनांक २०११ अंश सेल्सिअस तर वितलनांक ११७६ अंश सेल्सिअस आहे. सर्व सामान्य द्रावकांमध्ये हा विद्राव्य नाही पण आम्लामध्ये विरघळतो. अमेरिशिअमच्या ऑक्साइडाचा वापर स्मोक डिटेक्टर (धूर-शोधक) यंत्रामध्ये केला जातो. स्मोक डिटेक्टरमध्ये केवळ ०.२९ मायक्रोग्रॅम अमेरिशिअमचा वापर होतो. त्यामुळे विपरीत परिणाम होत नाहीत. अशा प्रकारे हे मूलद्रव्य आग लागण्याची पूर्वसूचना देऊन लोकांचे प्राण वाचवते. अमेरिशिअम वापरून ताप-विद्युत जनित्र (थर्मो-इलेक्ट्रिक जनरेटर) बनविण्याचे संशोधन सुरू आहे. थर्मो-इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये सध्या प्लुटोनिअमचा वापर होतो. त्याऐवजी अमेरिशिअम वापरून कृत्रिम उपग्रह, अवकाश यान यांना ऊर्जा पुरविण्याच्या दृष्टीने संशोधन सुरू आहे.

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org