19 October 2019

News Flash

कुतूहल : अश्मयुगीन हत्यारे

सुरुवातीला नैसर्गिकरीत्याच टोकदार असलेले दगड वापरून झाल्यानंतर, त्याने गारगोटीसारख्या दगडावर तासकाम चालू केले असावे.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. नंदिनी नेरुरकर-देशमुख

निसर्गाने मानवाला एक अतिविकसित मेंदू दिला, परंतु स्वसंरक्षणासाठी इतर प्राण्यांप्रमाणे वेगाने पळणे, जबडय़ाची ताकद, दात, नख्या अशा कोणत्याच रचना दिल्या नाहीत. त्यामुळे शस्त्र वापरणे हे मानवजातीसाठी अनिवार्य झाले. शिवाय दोन पायावर चालणे सुरू झाल्यामुळे, मोकळ्या झालेल्या हातांनी निरनिराळे दगड, गारगोटय़ा, खडे असे काहीबाही हाताळताना आणि फेकून मारताना शस्त्र वापरायच्या कल्पनेचा उदय झाला असावा. एखादा दगड भक्ष्याच्या मर्मस्थानी लागून शिकार साधली गेल्यावर आदिमानवाला ‘शस्त्र’ या संकल्पनेची उकल झाली असावी. भविष्याचा विचार करण्याच्या प्रवृत्तीमुळे त्याने उद्याचे भक्ष्य मिळवण्यासाठी आजच दगड घासणे सुरू केले. अगोदर स्वसंरक्षणासाठी आणि नंतर दुसऱ्या जिवांचा अंत करण्यासाठी शस्त्र वापराचा हा सिलसिला तेव्हापासून सुरू झाला. सुरुवातीला नैसर्गिकरीत्याच टोकदार असलेले दगड वापरून झाल्यानंतर, त्याने गारगोटीसारख्या दगडावर तासकाम चालू केले असावे.

ऑस्ट्रेलोपिथेकस अफ्रान्सिस या प्रजातीतील केन्यापिथेकस या आदिमानवाने बत्तीस लाख ते पस्तीस लाख वर्षांपूर्वी अश्महत्यारे वापरली होती, असे दिसून आले आहे. सन १९३५ मध्ये, मूळ ब्रिटिश असणाऱ्या लुईस लिकी आणि मेरी लिकी या पुरातत्त्वशास्त्रज्ञ जोडप्याला वीस लाख वर्षांपूर्वीची अश्मयुगीन शस्त्रे टांझानिया देशातील ओल्डूवाई नावाच्या एका घळीत सापडली. ही शस्त्रे ‘ओल्डोवन टूलकीट’ म्हणून ओळखली जातात. आफ्रिकेत आणि युरोपमध्ये जिथे जिथे आदिमानवाचे अवशेष सापडले आहेत, तिथे तिथे अश्म हत्यारे सापडली आहेत. (अलीकडेच मुंबईनजीक मनोरी येथे दहा हजार ते पंधरा हजार वर्षांपूर्वीची अश्म हत्यारे सापडल्याचे समजते.)

हातोडीसारखे दगड, अणकुचीदार दगड, दगडाच्या धार असलेल्या कपच्या, अशी अनेक प्रकारची हत्यारे उत्खननात शोधली गेली आहेत. होमो इरेक्टस या आदिमानव प्रजातीच्या वापरात दुधारी दगड आल्याचे आढळून आले आहे. दोन बाजूंना धार असणाऱ्या या प्रकारच्या हत्यारांना ‘बायफेस’ म्हटले जाते. असे बायफेस बनवण्यात पंधरा लाख वर्षांपूर्वी आदिमानव पारंगत झाला होता. मुळात मोठय़ा प्राण्याच्या शिकारीसाठी अशी आयुधे उपयोगी पडत नव्हती. पण मेलेल्या जनावरांच्या हाडांतून अस्थिमज्जा काढण्यासाठी असे दगड वापरले गेले. जसजसा काळ पुढे सरकला, तसतशी हत्यारे बनवण्यात मानवाने आपली कल्पकता अधिकाधिक वापरली. म्हणून पुढे, आतापासून सुमारे वीस ते पंचवीस हजार वर्षांपूर्वी, करवती, कुऱ्हाडी, हातोडी, तीर-कमठा यांसारख्या हत्यारांनी मानवी जीवनात प्रवेश केला.

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

First Published on January 4, 2019 1:12 am

Web Title: article about ashmyugin hatyare