19 October 2019

News Flash

मेंदूशी मैत्री : व्यायामाचे विरलेले संकल्प

शाळेत आनंददायी वातावरण असावं असं तज्ज्ञ सांगतात. कारण शिकणं ही आयुष्यातली आवश्यक गोष्ट असते.

(संग्रहित छायाचित्र)

अनेक जण १ जानेवारीपासून व्यायामाला लागण्याचा संकल्प सोडतात. पहिले काही दिवस व्यायाम केल्यावर हा उत्साह मावळतो. असं होऊ  नये म्हणून संकल्प करतानाच असा करावा की जो पाळता येईल. दुसरं असं की, किमान १५ दिवस आपण क्रमाने वाढवत नेत व्यायाम केला पाहिजे. व्यायामामुळे मेंदूमध्ये सेरोटोनिन हे आनंद निर्माण करणारं रसायन निर्माण होतं. पंधरा दिवसांनंतर जर आपण एखाद्या दिवशी व्यायाम केला नाही तर चुटपुट लागते. याचं कारण हेच सेरोटोनिन. ते शरीरात आनंद निर्माण करण्यासाठी उत्सुक असतं. अशा वेळेला थोडा वेळ का होईना आपण व्यायाम केला पाहिजे.

अनेकदा दोन-चार दिवस व्यायाम करून व्यायाम करणं अचानक बंद पडतं. दोन-चार दिवस हे सेरोटोनिनची शरीराला सवय होण्यासाठी पुरेसे नाहीत. मग व्यायाम कायमचाच बंद पडतो. म्हणून किमान १५ दिवस तरी व्यायाम कराच, म्हणजे निदान या वर्षीचा संकल्प विरून जाणार नाही!

अभ्यास आनंददायी?

शाळेत आनंददायी वातावरण असावं असं तज्ज्ञ सांगतात. कारण शिकणं ही आयुष्यातली आवश्यक गोष्ट असते. शिकण्याचे अनुभव भावनांमध्ये गुंफलेले असतील तर त्याचा नक्कीच चांगला उपयोग होतो असं मेंदू विज्ञान सांगतं. अशा वेळी रागावून, चिडून, धाक दाखवून एखादी गोष्ट शिकवली तर तीदेखील लक्षात राहीलही; पण अभ्यास असा नकारात्मक पद्धतीने लक्षात राहायला नको. मन स्थिर असेल, उत्साही आणि आनंदी असेल तर मुलं जास्त चांगल्या प्रकारे शिकू शकतात.

शिकणाऱ्याच्या मनात कोणत्या भावना आहेत, त्यावर शिकण्याकडे लक्ष (attention) आहे का, ते अवलंबून असतं. जर लक्ष (अटेन्शन) असेल तरच ते आपल्या लक्षात (मेमरी) राहतं. पॅट्रिशिया वुल्फ या न्यूरोसायंटिस्ट आहेत. त्यांनी भावनांवर संशोधन केलं आहे. त्या म्हणतात, भावना या दुधारी तलवारीसारख्या असतात. त्यांच्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने शिकू शकतो. किंवा मग आपलं लक्ष पूर्णच उडतं. पण मन जर स्थिर असेल तर उत्साहाने चांगलं शिकता येतं.

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com

First Published on January 9, 2019 1:54 am

Web Title: article about expiration of exercise