सुधा सोमणी

सन १९८२ मध्ये डर्मास्टॅड (जर्मनी) येथील जी.एस.आय. जड आयन संशोधन प्रयोगशाळेत पीटर आर्मबस्टर आणि गॉटफ्रिड मुंझनबर्ग यांनी सात दिवस प्रयत्न करून माइटनेरिअम हे मूलद्रव्य  मिळविले. बिस्मथच्या अणूंवर अतिशय वेगवान लोह मूलद्रव्याचा मारा केल्यावर माइटनेरिअम मिळाले. या जी.एस.आय. प्रयोगशाळेतील प्रयोगानंतर तीन वर्षांनी डब्ना येथील जे.आय.एन.आर प्रयोगशाळेत पुन्हा हाच प्रयोग करून माइटनेरिअम मिळविण्यात आले.

मेंडेलीवने प्रस्थापित केल्याप्रमाणे याचे नाव इका-इंडिअम ठेवले गेले असते. आयुपॅकने ठरविलेल्या नवीन मूलद्रव्यांच्या नामकरणाच्या पद्धतीनुसार या मूलद्रव्याचे नाव अन्निलेनिअम असे संबोधले गेले. नावाची निश्चिती करण्यासाठी जी.एस.आय. प्रयोगशाळेत शोध लागल्यामुळे या मूलद्रव्याचे नाव तेथील शास्त्रज्ञांनी द्यावे असे ठरले. डॉ. लिझा माइटनर या डॉक्टरेट पदवी मिळविलेल्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ, त्यांच्या नावावरून या मूलद्रव्याला माइटनेरिअम असे नाव देण्यात आले.

केंद्रकीय विखंडनाच्या शोधात ओटो हान आणि ओटो फ्रिट्झ स्ट्रासमॅनसह लिझा माइटनेर या ऑस्ट्रियन शास्त्रज्ञाचाही महत्त्वाचा वाटा होता. लिझा माइटनर ही ज्यू शास्त्रज्ञ होती, त्याकाळी हिटलरच्या ज्यू  द्वेषामुळे तिच्या जिवाला धोका होता. असे असूनही जर्मनीत राहून तिने आपले  शोधकार्य चालू ठेवले. १९३८मध्ये युद्धपरिस्थिती विकोपाला गेली व इतर शास्त्रज्ञांच्या मदतीने ती स्वीडनला गेली. महायुद्धाच्या परिस्थितीत त्याकाळी झालेल्या शोधकार्याचे अवलोकन नीट होऊ शकले नाही. परिणामी केंद्रकीय विखंडनाच्या शोधाचे नोबेल पारितोषिक ओटो हान व ओटो फ्रिट्झ यांना देण्यात आले. या शोधाचे श्रेय लिझा माइटनरला मिळाले नाही. तिच्या कार्याचा गौरव म्हणून या मूलद्रव्याचे नाव माइटनेरिअम असे ठेवण्यात आले.

या मूलद्रव्याची सर्वच समस्थानिके अस्थिर आहेत. सर्वात स्थिर असणाऱ्या माइटनेरिअम-२७८चा अर्धायुष्यकाल ७.६ सेकंद आहे. त्यामुळे माइटनेरिअमचा जास्त अभ्यास करता आला नाही. सामान्य तापमानाला हा धातू स्थायुरूप असावा असे मानले जाते. आतापर्यंत या मूलद्रव्याचे दहापेक्षा कमी अणू तयार केले गेल्याची नोंद आहे. माइटनेरिअमची घनता ३७.४ ग्रॅम प्रति घन सेमी असावी असा अंदाज आहे. असे असले तरी हासिअमच्या खालोखाल (४१ ग्रॅम प्रति घन सेमी) माइटनेरिअम हे सर्वात जड मूलद्रव्य ठरते.

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org