चारुशीला जुईकर

निहोनिअम हे ११३ अणुक्रमांकाचं सातव्या गणातलं, अतिशय जड (सुपरहेवी), किरणोत्सारी असं मूलद्रव्य! आणि त्याचं आयुष्य तर अतिशय क्षणभंगुर. निहोनिअमच्या सर्वात स्थिर असलेल्या NH -286  या समस्थानिकाचं अर्ध आयुष्य किती? ..तर अवघी दहा सेकंद! आणि हे मूलद्रव्य हवं असेल तर प्रयोगशाळेतील अथक प्रयत्नांनंतर जेमतेम चार-पाच अणू एका वेळेस मिळू शकतात.

हे मूलद्रव्य शोधलं असं म्हणण्यापेक्षा ते निर्माण केलं असं म्हणायला हवं. आणि ते निर्माण करण्याचं श्रेय जातं ते जपानच्या रिकेन इन्स्टिटय़ूटमधील डॉ. कोसुके मोरिता आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या गटाला. या गटाने दहा वर्षे खपून हे ११३ क्रमांकाचं मूलद्रव्य प्रयोगशाळेत २००४ साली तयार केलं. जस्ताची वेगवान शलाका प्रकाशाच्या एक दशांश वेगाने बिस्मथवर आदळवल्यानंतर त्यांना या मूलद्रव्याचे काही अणू मिळवता आले.

हे मूलद्रव्य मिळण्यापूर्वी त्याला तात्पुरतं नाव अनुनट्रिअम आणि तात्पुरती संज्ञा U-43  दिलेली होती. त्याला इका-थॅलिअम असंही नाव होतं. लॅटिन भाषेत अनुनट्रिअम म्हणजे ११३. मूलद्रव्य शोधणाऱ्याला त्या  मूलद्रव्याला नाव देण्याचा अधिकार दिला जातो. त्यानुसार त्याला जापोनिअम, रिकेनिअम ही नावं सुचवण्यात आली होती. पण शेवटी डॉ. कोसुके मोरिता यांनी या मूलद्रव्याला निहोनिअम आणि त्याची संज्ञा NH असावी, असं सुचवलं. २०१६च्या नोव्हेंबरमध्ये आयुपॅकने निहोनिअम या नावावर शिक्कामोर्तब केले.

निहोनिअम हे आशिया खंडात तयार केलेलं आवर्तसारणीतील पहिलं मूलद्रव्य. ‘निहॉन’ म्हणजेच जपानी भाषेत ‘उगवत्या सूर्याचा प्रदेश!’ जपान म्हणजेही उगवत्या सूर्याचा प्रदेशच! जपान हा आशिया खंडातील एकमेव देश आहे, की ज्याचे नाव एखाद्या मूलद्रव्याला देण्यात आलं आहे.

निहोनिअम हा धातू सामान्य तापमानाला स्थायुरूपात असावा असा अंदाज आहे. त्याचा वितलनांक, उत्कलनांक, घनता अशा गुणधर्माबद्दल सध्यातरी काहीच माहिती नाही. प्रयोगशाळेत मिळालेल्या दोन चार अणूंतून या मूलद्रव्याचे गुणधर्म ते अणू निसटून जाण्याच्या आत जाणून घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. निहोनिअमची ज्ञात असलेली सहा समस्थानिके आहेत. त्यापकी निहोनिअम-२८६ हे सर्वात स्थिर मानलं जातं. या स्थिर समस्थानिकाचा संदर्भ घेऊन या मूलद्रव्याबाबत माहिती मिळवली जात आहे.

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org